धक्कादायक! घर नावावर करण्यासाठी आईला मारहाण सोन्याचे दागिनेही केले लंपास; मुलगा व सुनेविरुद्ध गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
घर नावावर कर असे म्हणत बेलापूर (ता.श्रीरामपूर) येथील एका वृद्धेस मुलाने व सुनेने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच घरातील कपाट उघडून 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने कपाटातून काढून घेतले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलापूर गावात राहणार्या कौशल्याबाई रामदास कदम (वय 74) या वृद्ध महिलेचा मुलगा सतीश रामदास कदम (वय 58) व सून अलका सतीश कदम (वय 55) हे श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे राहत असून ते दोघेही बेलापूर येथे आईकडे येवून वारंवार घर विकून आम्हांला पैसे दे असे म्हणत पैशांची मागणी करत असत. तसेच घर आमच्या नावावर करून दे, अशी मागणी करण्यासाठी मुलगा आणि सून बेलापूरला आले व त्यांनी तू आता मरायला आली आहे, तू मरायच्या अगोदर हे घर आमच्या नावावर करून दे, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच सून अंगावर धावून आली आणि केस धरून जोरात ओढून शिवीगाळ केली. याचवेळी घरातील कपाट उघडून आपले 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने कपाटातून काढून घेतले व तू म्हातारी झाली आहे, हे दागिने तुझ्या कामाचे नाही, असे म्हणत दमदाटी व शिवीगाळ करत दोघेही तेथून निघून गेले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद द्यायला कौशल्याबाई कदम गेल्या असता पोलिसांनी तक्रार न नोंदविल्याने सदर वृद्ध महिलेने पोलीस अधीक्षकांनाही पत्र पाठवले. त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने न्यायालयात फिर्याद दिली. त्याची दखल घेवून न्यायालयाने सीआरपीसी 156, 3 प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून सतीश रामदास कदम व अलका सतीश कदम यांच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांत भादंवि कलम 323, 324, 34, 392, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.