नेवासा तालुक्यात वीजबिलांची थकबाकी तीस कोटींवर

नायक वृत्तसेवा, नेवासा
एकीकडे कोरोना महामारीचे संकट तर दुसरीकडे वाढीव वीजबिलाचे. त्यामुळे अनेक वीज ग्राहकांनी बिले भरलेली नाहीत. नेवासा तालुक्यातही अनेकांनी एप्रिलपासून वीजबिल न भरल्याने 23 हजार 184 थकबाकीदारांकडे तब्बल 30 कोटी 39 लाख 79 हजारांची थकबाकी झाली आहे.

कोरोना संकटात सुरवातीला सरासरी बिले दिली गेली होती. अनेकांनी ही बिले भरली देखील; मात्र नंतर आलेले बिल ग्राहकांना शॉक देणारे ठरले. महावितरणच्या नेवासा व घोडेगाव विभागात घरगुती, वाणिज्य, औद्योगिक तसेच शहरातील पथदिवे व सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे तब्बल 30 कोटी 39 लाख 79 हजारांची थकबाकी झाली आहे. त्यात नेवासा विभागांतर्गत वरील वर्गवारीनुसार 13 हजार 894 ग्राहकांकडे 22 कोटी 89 लाख 20 हजार, तर घोडेगाव विभागात 9 हजार 290 ग्राहकांकडे 9 कोटी 60 लाख 79 हजार रुपयांची थकबाकी आहे. वीजबिल माफी मिळेल या आशेवर अनेकांनी बिले भरलीच नाहीत. त्यामुळे तब्बल 23 हजार 290 ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी आहे. वीजमीटरची तपासणी न करणे, परस्पर रिडींग टाकणे, ग्राहकांना वीजबिल वेळेवर न देणे, या गोंधळामुळे बहुतांश ग्राहकांच्या मानगुटीवर हे वाढीव बिलाचे भूत बसले असल्याची चर्चा आहे.

