संगमनेरच्या उपनगरांमध्ये घरफोड्यांचे सत्र! रहिवाशी भयभीत; चोरटे ‘रेकी’ करुन लक्ष्य करताहेत ‘बंद’ घरे..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारांमधून संगमनेर शहरासह तालुकाही सुटलेला नाही. मात्र मागील काही दिवसांत सलग घडणार्‍या अशा एकामागून एक घटनांमुळे नागरिक आता भयभीत होवू लागले आहेत. चोरट्यांनी शहराभोवतीच्या उपनगरांना लक्ष्य करीत ‘रेकी’ करुन बंद घरे निवडल्याचेही या घटनांमधून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी घरफोडीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असले तरीही त्यातून नागरिकांच्या मनातील चोरट्यांचे ‘भय’ कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनीच आता अधिक सतर्क होवून वसाहतींच्या आसपास संशयितपणे फिरणार्‍यांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

गुरुवारी (ता.२८) संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन उपनगरांमध्ये घरफोडी झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. यातील एक घटना घुलेवाडी शिवारातील द्वारकामाई कॉलनीत घडली. या कॉलनीत राहणारे रोहित प्रदीप पहलवान आपल्या कुटुंबियांसह आठवडाभर बाहेरगावी गेले होते. बुधवारी (ता.२७) सायंकाळी घरी पतरल्यावर त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून कोणीतरी चोरी केल्याचा प्रकार समोर आला. त्यांनी घरात जावून पाहिले असता चोरट्यांनी संपूर्ण घरात उचकापाचक करुन कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे ६७ हजार २०० रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी त्यांनी गुरुवारी पोलिसांनी कळविल्यानंतर दिवसभर कायदेशीर पूर्तता करुन सायंकाळी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव करीत आहेत.

चोरीची दुसरी घटना गुंजाळवाडी शिवारातील अरगडे मळा परिसरात घडली. येथे राहणारे शशांक वाल्मिक झोडगे हे आपल्या घराला कुलूप लावून बुधवारी दिवसभर बाहेरगावी गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास ते जेव्हा घरी आले, तेव्हा त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याचे समोर आले. घरात जावून पाहिले असता त्यांच्याही घरात मनसोक्त उचकापाचक करीत कपाटातील कप्प्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा २६ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. गुरुवारी त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक धनंजय महाले करीत आहेत.

एकीकडे घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्य निर्माण होत असताना मोटारसायकल चोरीच्या घटनाही थांबता थांबण्याचे नाव घेत नसल्याचेही वारंवार समोर येत आहे. गुरुवारी मालपाणी लॉन्सच्या समोरील बाजूने अवघ्या काही मिनिटांतच चोरट्याने लाल रंगाची स्प्लेंडर (एक.एम.एच.१७/ए.टी.०३४१) चोरुन नेली. इस्तरीचे काम करणार्‍या उमेश सूर्यकांत दळवी (रा.गुंजाळवाडी शिवार) यांनी याबाबत शहर पोलिसांत तक्रार केली. कष्टाच्या पैशांतून व्यवसाय वाढीसाठी घेतलेली दुचाकीच चोरीला गेल्याने त्यांच्यासमोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे.

या सर्व प्रकारांतून सर्वसामान्य माणूस मात्र भयभीत झाला असून गावाला जायला निघाल्यास बसस्थानकावर चोरीची भीती, लग्नाला जायचे म्हंटल्यास रस्त्यावर सोनसाखळी चोरांची भीती आणि आता घराला कुलूप लावून जायची सुद्धा भीती निर्माण होवू लागली आहे. कायद्याचे पालन करणार्‍या समाजाला निर्भयी वातावरण निर्माण करुन देण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. शहरातील अवैध व्यवसायांनी सध्या उच्चांक गाठलेला असतानाही संगमनेरकर तो सहन करीत आहेत. मात्र जेव्हा नागरिकांचेच स्वास्थ धोक्यात येईल, तेव्हा त्याचा उद्रेक शहराचे स्वास्थ बिघडवणारा ठरु शकतो. त्यामुळे पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Visits: 163 Today: 1 Total: 1575428

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *