पालिका व पोलीस प्रशासनाकडून तीन दिवसांत तीस दुकाने ‘सील’ विनामास्क वाहनचालक व नियमांचे उल्लंघन करणार्यांवरही दंडात्मक कारवाई
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
कोरोना काळात जिल्हाधिकार्यांचा आदेश डावलत दुकाने सुरू ठेवणार्या दुकानांविरोधात पोलीस व नगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत तीन दिवसांत 30 दुकाने सील केली. तसेच बेलापुरातील पाच दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय विनामास्क वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई केली आहे. अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नसून नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन ‘पुन्हा’ प्रशासनाने केलेले आहे.
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. दुपारी 4 वाजेनंतर दुकाने उघडी ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांतरही दुकाने उघडी असल्यास संबंधित दुकाने सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस व नगरपालिका प्रशासनाने तीन दिवसांपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
पोलीस निरीक्षक संजय सानप व नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दुपारी 4 वाजेनंतर उघडी असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. या पथकाने तीन दिवसांत 30 दुकानांना सील ठोकले आहे. पोलीस निरीक्षक सानप व मुख्याधिकारी शिंदे स्वत: या पथकासमवेत असल्याने दुकानदारही मुकाट्याने कारवाईला सामोरे जात आहेत. याशिवाय शहरात विनामास्क फिरणार्या दुचाकीस्वार व नागरिकांवरही प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तीन दिवसांत अशा सुमारे 70 हून अधिक नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिली. तर जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात येत असून पुढील आदेश येईपर्यंत दुकाने सील राहतील, नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टंन्सिंगचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, बेलापूर येथील चिकन शॉप हे दुपारी चार नंतरही सुरु असल्याचे व वारवार सांगूनही चार नंतर दुकान सुरुच ठेवल्यामुळे लकी चिकन सेंटर, गुडलक चिकन सेंटर, डेली फ्रेश चिकन सेंटर, ए नव चिकन शॉप, सुपर चिकन शॉप ही दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरीक्त उघडी ठेवून नियमांचा भंग केला जात असल्याचा अहवाल पोलिसांनी तहसील कार्यालयास पाठविला होता. तससीलदार प्रशांत पाटील यांनी ही दुकाने तातडीने सील करण्याचे आदेश मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी यांना दिले. त्यानंतर मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी, कामगार तलाठी कैलास खाडे यांनी बेलापूर पोलिसांना सोबत घेवून हे पाचही दुकाने सील केली आहे. प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे व्यापार्यांत खळबळ उडाली आहे.