दुसऱ्या लाटेतील कोविड संक्रमणाची गती आजही अव्याहत..! सुट्टीमुळे खासगी प्रयोगशाळांचे अहवाल अप्राप्त असूनही सरासरी कायम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळीपासून सुरु झालेले कोविड रुग्णवाढीचे चक्र दिवसोंदिवस फुगत चालले आहे. कालच्या रविवारी स्राव घेणार्‍या कर्मचार्‍यांच्या साप्ताहिक सुट्टीमुळे संगमनेरकरांना अल्पसा दिलासा मिळाला होता. मात्र अवघ्या 24 तासांतच पुन्हा चित्र पालटले असून आज वाढीव रुग्णसंख्येने कोविडची दुसरी लाट सुरु झाल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत केले आहे. आज खासगी प्रयोगशाळेने अवघे तीन तर रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा एकोणतीस जणांच्या केलेल्या स्राव निष्कर्षातून तालुक्यातील 32 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही वाढीव भर पडून एकूण संख्या 4 हजार 954 वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे रुग्णसंख्या भरीस पडलेली असतांना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तीन टक्क्यांनी घसरुन 93 टक्क्यांंवर आले आहे. आतातरी संगमनेरकरांनी कोविडची दाहकता आणि अद्यापही त्याचे अस्तित्त्व मान्य करुन अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.


जाणकारांच्या मते अनपेक्षितपणे सुमारे पंधरा दिवसांआधीच राज्यात कोविडच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव दिसू लागला आहे. राज्यातील काही बाधित शहरांमधून दिवाळीपासूनच मोठ्या संख्येने रुग्ण समोर येवू लागल्याने सरकारही गंभीर झाले असून येत्या काही दिवसांत शिथील केलेले निर्बंध पुन्हा लागू होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यात लग्न, अंत्यविधी व अन्य कार्यक्रमांना मर्यादीत स्वरुपात देण्यात आलेली सवलतही रद्द अथवा कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दैनंदिन व्यवहारांना दिलेल्या पूर्ण सुटीचाही पुनर्विचार केला जावू शकतो. राज्यातील नागरिक सुरक्षित रहावे यासाठी एकीकडे शासन व प्रशासनाकडून नागरिकांना नियम पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे, तर दुसरीकडे त्याकडे दुर्लक्ष करुन आपणास ‘अमरत्त्व’ प्राप्त झाल्यागत अनेकजण समाजात वावरत असल्याने परिस्थिती गंभीर होत असल्याचे सगळीकडचेच निरीक्षण आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आज बाधित आढळलेल्या 32 रुग्णांमध्ये शहरातील केवळ दोघा रुग्णांचा समावेश आहे. त्यात जनतानगर येथील 37 वर्षीय तरुण व केवळ संगमनेर असा पत्ता दिलेल्या 53 वर्षीय इसमाला कोविडचे संक्रमण झाले आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात यापूर्वी बाधित झालेल्या गावांसह कोविड मुक्त झालेल्या काही गावांमध्ये पुन्हा रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या अहवालातून आश्वी खुर्द मधील 45 व 18 वर्षीय तरुणासह 16 वर्षीय तरुणी, पिंपरी येथील 28 वर्षीय तरुणासह 21 वर्षीय तरुणी, कोठे खुर्द मधील 40 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 22 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुण, पिंपळदरी येथील 45 वर्षीय तरुण, निमगाव जाळी येथील 55 वर्षीय इसम.

उंबरी बाळापूर येथील 53 व 45 वर्षीय इसम, प्रतापपूर येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 21 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आश्वी बुद्रुक येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 24 व 20 वर्षीय महिला, तसेच पाच वर्षीय बालिका, गुंजाळवाडी येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55, 50 व 28 वर्षीय महिला व चार वर्षीय बालिका, मालदाड येथील 25 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 30 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील 55 वर्षीय इसम, खांडगाव येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व पेमगिरी येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 29 वर्षीय तरुण अशा एकूण बत्तीस जणांचे अहवाल प्राप्त झाल्याने संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या 4 हजार 954 वर पोहोचली आहे. कालच्या रविवारी खासगी प्रयोगशाळांना स्राव न गेल्याने आज खासगी प्रयोगशाळांकडून बहुतांशी अहवाल अप्राप्त आहेत. त्यामुळे आजच्या रुग्ण संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. रविवार व सोमवार अशा दोन्ही दिवसांचे प्रलंबित अहवाल उद्या येण्याची शक्यता असल्याने उद्याची रुग्णसंख्या मोठी कदाचित मोठी असेल. 


देशात कोविडचे संक्रमण सुरु झाल्यानंतर 2 एप्रिलरोजी संगमनेर तालुक्यात पहिल्यांदा चार रुग्ण समोर आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आपले हातपाय पसारीत या अदृष्य शत्रुने 93 टक्के तालुक्याला आपल्या झपाट्यात घेतले. यात सर्वाधीक 1 हजार 353 रुग्ण शहरातून समोर आले. त्यातील 1 हजार 261 रुग्णांनी उपचार पूर्ण केले, 79 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत, तर दुर्दैवाने यातील 13 जणांचा कोविडने बळीही घेतला.

आजवर तालुक्यातील 170 गावांपैकी 158 गावांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव झाला आहे. सद्यस्थितीत संगमनेर पाठोपाठ घुलेवाडी येथून 342 रुग्ण समोर आले. त्यातील 313 जणांनी उपचार पूर्ण केले तर 27 जणांवर उपचार सुरु आहेत. या महामारीने घुलेवाडीतील दोघांचा बळीही घेतला. गुंजाळवाडीतूनही 268 रुग्ण समोर आले होते, त्यातील 243 रुग्ण बरे झाले तर 25 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. संगमनेर शहरासह आश्‍वी ब्रु.मध्ये पहिल्यांंदा रुग्ण समोर आले होते. आजवर आश्‍वी बु.मधून 107 रुग्ण समोर आले. त्यातील 82 जणांनी उपचार पूर्ण केले तर 24 जणांवर उपचार सुरु आहेत. येथील एकाचा बळीही गेला आहे. उंबरी बाळापूर व निमगाव खुर्द या भागात उशीराने पोहोचलेल्या संक्रमणातून 50 नागरिक बाधित झाले. 22 जणांनी उपचार पूर्ण केले तर 28 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.

नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात शहरी रुग्णसंख्येसह ग्रामीण भागातील संक्रमणातही मोठी घट झाल्याचे दिसू लागले होते. मात्र दिवाळीच्या खरेदीसाठी अनपेक्षितपणे नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने त्याचे दुष्परिणाम समोर येवू लागले असून गेल्या 16 नोव्हेंबरपासून आजपर्यंतच्या अवघ्या आठ दिवसांत 37 रुग्ण दररोज या वेगाने एकूण रुग्णसंख्या वाढली आहे. यात शहरातील रुग्णगती 9.5 रुग्ण रोज तर ग्रामीण रुग्णगती 27.62 रुग्ण दररोज वाढत आहेत. 1 नोव्हेंबरपासून आजपर्यंतची आकडेमोड बघता या 23 दिवसांत तालुक्यात 28.82 रुग्ण दररोज या गतीने 666 रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरी गतीचे प्रमाण 7.36 तर ग्रामीण रुग्णवाढीचा वेग 21.45 इतका आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज १५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ७३० झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९५.६४ टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील रुग्ण संख्येत २३२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ७६४ इतकी झाली आहे.

आज खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालातून केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रात १०, अकोले ०५, जामखेड ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी ०३, राहाता ११, राहुरी ०३, संगमनेर ०३ व श्रीरामपूर येथे तीन रुग्ण आढळून आले.

रॅपिड अँटीजेन चाचणीत आज जिल्ह्यातील १७३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अकोले १५, जामखेड ०४, कर्जत ०२, कोपरगाव १०, नेवासा ०८, पारनेर १५, पाथर्डी १७, राहाता १८, राहुरी १२, संगमनेर २९, शेवगाव १३, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर १४ आणि लष्करी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या १५९ रुग्णांना आज घरी सोडण्यात आले त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३१, अकोले ०६, जामखेड ०२, कर्जत ०६, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०५, पारनेर ०४, पाथर्डी ३१, राहाता १७, राहुरी ०४, संगमनेर २६, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०८, लष्करी परिसरातील ०५ आणि  अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

  • जिल्ह्यात बरे झालेली रुग्ण संख्या : ५८ हजार ७३०..
  • जिल्ह्यात सध्या उपचार सुरु असलेले एकूण रुग्ण : १ हजार ७६४..
  • जिल्ह्यात आजवर झालेले एकूण कोविड मृत्यू : ९१४..
  • जिल्ह्यातील आजवरची एकूण रूग्ण संख्या:६१ हजार ४०८
  • जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ९५.६४ टक्के…
  • आज जिल्ह्यात १५९ रुग्णांना डिस्चार्ज तर २३२ बाधितांची नव्याने पडली भर..

Visits: 8 Today: 1 Total: 30784

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *