रविवारच्या सुट्टीतून मिळाला संगमनेरकरांना काहीसा दिलासा!
रविवारच्या सुट्टीतून मिळाला संगमनेरकरांना काहीसा दिलासा!
नागरिकांनी सतर्कता न बाळगल्यास कोविड बाधितांची संख्या वाढण्याचा धोका
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळीच्या गर्दीने आवतणं धाडून बोलावलेल्या कोविडच्या दुसर्या लाटेने रविवारी संगमनेरकरांना काहीसा दिलासा दिला. अर्थात शनिवार व रविवारी शासकीय व खासगी प्रयोगशाळांसह रॅपिड अँटीजेन चाचण्यांचा वेग मंदावल्याने हा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. रविवारी खासगी प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजेन चाचण्यांद्वारा आलेल्या निष्कर्षातून शहरातील नऊजणांसह तालुक्यातील एकूण 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या पन्नासाव्या शतकाच्या दिशेने पुढे सरसावत 4 हजार 922 वर पोहोचली आहे.

यंदा जगभरात कोविडचा प्रभाव असल्याने सर्व सार्वजनिक उत्सवांना मनाई करण्यात आली आहे. उत्सवप्रिय देश म्हणून ओळख असलेल्या आपल्या देशातही यापूर्वीच्या मोठ्या धार्मिक सणांवर निर्बंध घालण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळांशी समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नागरिकांनी घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याने त्याचे दुष्परिणाम ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते संपूर्ण सप्टेंबरमध्ये बघायला मिळाले. त्यातून बोध घेवून झालेल्या चुका पुन्हा घडणार नाही असे अपेक्षित असताना दिवाळीने मात्र पुन्हा तशीच स्थिती निर्माण केली आहे.

सध्या आढळून येणार्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने असे रुग्ण सहजासहजी लक्षात येत नाहीत. दिवाळीच्या चार दिवसांत संगमनेरातील बाजारपेठांमध्ये तुडूंब गर्दी झाल्याने लक्षणे नसलेले असे काही रुग्ण या गर्दीतून फिरले आणि त्यांनी अनेकांना कोविडचा प्रसाद वाटला. यातून सुवर्णकार, कापड व्यावसायिक व अन्य दुकानदारांसह त्या त्या दुकानांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांनाही बाधा होत असल्याचे आता समोर येवू लागले आहे. दिवाळीच्या दुसर्याच दिवशी कोविडने व्यापक अवतार धारण केला असून या लाटेतून तालुका कोणत्या थडीवर जावून पोहोचेल याचा अंदाज लावणंही कठीण झालं आहे.

रविवारी (ता.22) समोर आलेल्या एकूण 20 रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील बाजारपेठेतील 51 वर्षीय महिला, शिवाजीनगर मधील 55 वर्षीय महिला, श्रमिक मंगल कार्यालय परिसरातील 31 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 57 वर्षीय इसमासह 46 व 28 वर्षीय महिला, महात्मा फुले चौकातील 41 वर्षीय महिला, पंचायत समितीच्या परिसरातील 38 वर्षीय महिला व कल्पना वसाहतीमधील 59 वर्षीय इसम अशा एकूण नऊ जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे.

त्यासोबतच ग्रामीण भागातील दरेवाडी येथील 32 वर्षीय तरुण, देवगावमधील 27 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 84 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासह 57 वर्षीय इसम, 37 वर्षीय तरुण, मालपाणी नगर (घुलेवाडी) येथील 38 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 30 वर्षीय महिला, रहाणेमळा येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमोण येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 वर्षीय महिला व जाखुरी येथील 51 वर्षीय इसमाचा अहवालही पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. रविवारी तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 20 जणांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या 4 हजार 922 वर पोहोचली आहे.

संगमनेर तालुक्यात कोविडची दुसरी लाट सुरु झाली असून शहर व तालुका अशा दोहींमध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याने अपेक्षेपेक्षा आधीच सुरु झालेल्या या लाटेचे परिणामही मोठे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आतातरी सतर्क राहून सार्वजनिक वावर करण्याची गरज आहे, अन्यथा कोविडचा अदृष्य विषाणू कोणताही इशारा न देता आपल्या शरीरात शिरण्यासाठी तत्परच उभा आहे याचे आपल्या प्रत्येकाला स्मरण ठेवावे लागणार आहे. आपल्या प्रत्येकाची सतर्कताच कोविडचा पराभव करु शकते, अन्यथा हा जीवघेणा धोका कायमच आहे.

