सादतपूर शिवारात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश! वन विभागाकडून अजूनही शोधमोहीम सुरूच राहणार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राहाता तालुक्यातील लोणी येथील बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर सादतपूर (ता. संगमनेर) शिवारातील गोरे वस्तीवरील पाचवर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना गुरुवारी (ता.२५) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे तत्काळ महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन्ही घटनास्थळी भेट देऊन बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभागाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार डोळ्यात तेल घालून वन विभागाकडून शोधमोहीम सुरू असताना सोमवारी (ता.२९) मध्यरात्री सादतपूर शिवारात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे.

वनविभागाने पुणे, जुन्नर व नाशिक येथील विशेष पथकाला बिबट्या जेरबंद करण्यासाठी पाचारण केले होते. मागील चार दिवसांपासून हे पथक व स्थानिक वन विभागाचे अधिकारी बिबट्याचा कसून शोध घेत होते. त्यांनी सादतपूर शिवारात ठिकठिकाणी तीन ते चार पिंजरे लावून शोधमोहीम सुरू ठेवली होती. सोमवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजेच्या सुमारास मगर वस्तीनजीक लावलेल्या पिंजर्‍यात एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. यावेळी सहायक उपवनसंरक्षक सुवर्णा माने, कोपरगाव परिक्षेत्राचे सागर केदार, संगमनेर परिक्षेत्राचे वनरक्षक साळू सोनवणे, विशेष पथकातील अभिजीत महाले, संतोष पारधी, पोलीस पाटील सुनील मगर, प्राणीमित्र विकास म्हस्के आदिंसह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान हल्ला झालेल्या ठिकाणापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर हा बिबट्या जेरबंद झाला असला तरी, चिमुकल्याला ठार करणारा बिबट्या हाचं होता की दुसरा? याबाबत कोणताही ठोस दावा करता येणार नसल्याने सादतपूर परिसरातील नागरिकांसह शिवालगतच्या गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करुन बिबट्याची शोधमोहीम सुरूचं राहणार असल्याची माहिती संगमनेर भाग दोनचे वनरक्षक साळू सोनवणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *