रुग्णवाहिका चालक हे ‘फ्रंटलाईन वॉरियर’ ः डॉ.मंगरुळे

रुग्णवाहिका चालक हे ‘फ्रंटलाईन वॉरियर’ ः डॉ.मंगरुळे
‘आधार’ फौंडेशनकडून कोविड योद्धे रुग्णवाहिका चालकांचा सन्मान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड 19 ची भारतात नव्याने जेव्हा साथ आली, तेव्हा सर्वांच्या मनात भीतीदायक वातावरण होते. प्रत्येकजण अगदी डॉक्टर सुद्धा उपचार करण्यास घाबरत होते. प्रशासनालाही कोविडची पूर्ण माहिती मिळालेली नव्हती. अशा आरंभीच्या काळापासून गंभीर कोविड रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयापर्यंत धैर्यपूर्वक पोहोचविण्याचे काम ज्यांनी केले ते अ‍ॅम्बुलन्स पायलट खर्‍या अर्थाने ‘फ्रंटलाईन वॉरियर’ आहेत, असे गौरवोद्गार आधार फौंडेशनने आयोजित केलेल्या सामाजिक दिवाळी प्रसंगी संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी काढले.

यावेळी आधारचे समन्वयक डॉ.महादेव अरगडे, अक्षरभारतीचे अध्यक्ष भानुदास आभाळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, संत गाडगेबाबा भानुप्रभाकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष चं. का. देशमुख, माजी प्राचार्य पी. आर. शिंदे, उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब कासार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे म्हणाले, आधार फौंडेशनने 108 रुग्णवाहिका चालकांचा केलेला सन्मान यथोचित असून आधारचे कार्य समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांसाठी अत्यंत दिशादर्शक असून, प्रशासनालाही नेहमीच चांगले सहकार्य असते. त्यांचा आजचा उपक्रम हा अतिशय स्तुत्य असून सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

याप्रसंगी संगमनेर व अकोले तालुक्यातील 108 रुग्णवाहिका चालकांना आधारतर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘कोविड सेवा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्व उपस्थित 108 रुग्णवाहिका चालकांना मानपत्र, किराणा कीट व कुटुंबासाठी दिवाळीची भेट म्हणून साडी देण्यात आली. प्रास्ताविक समन्वयक विठ्ठल कडूसकर यांनी केले. याप्रसंगी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ समन्वयक अनिल कडलग, विठ्ठल कडूसकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी कोठवळ यांनी आधार निवासी प्रकल्पासाठी प्रत्येकी अकरा हजार रुपयांची देणगी दिली. आधारला मौलिक योगदान दिल्याबद्दल सुभाष पाराशर, सामाजिक युवा कार्यकर्ते आदित्य घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिभासंपन्न विद्यार्थिनी पूजा ढोकरट या होतकरू मुलीला भानुदास आभाळे यांनी अभ्यासासाठी नवीन मोबाईल प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे यांच्या हस्ते भेट दिला. रुग्णवाहिका चालक भाऊसाहेब दिघे यांनी सन्मानाला उत्तर देताना आधारच्या सन्मानाने आम्ही भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया दिली. मानपत्राचे वाचन समन्वयक बाळासाहेब पिंगळे यांनी केले. सत्काराचे निवेदन समन्वयक पी. डी. सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन समन्वयक अनिल कडलग यांनी केले तर आभार प्रदर्शन समन्वयक सुखदेव इल्हे यांनी केले. उपक्रम यशस्वीतेसाठी युवा उद्योजक सुभाष ताजणे, चंद्रकांत वाणी, माजी सैनिक लक्ष्मण ढोले, मच्छिंद्र पावसे, आदित्य घाटगे, सुखदेव गाडेकर, सचिन कानवडे, पंकज पावसे, संजय अहिरे, लक्ष्मण कोते, सोमनाथ मदने आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

 

Visits: 3 Today: 1 Total: 27338

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *