दोन मित्रांनी ईहलोकीचा प्रवासही सोबतच केला! केलवड येथील वारकर्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ

नायक वृत्तसेवा, राहाता
एक शेतकरी, दुसरे माधुकरी मागून उपजीविका करणारे, अशा दोन मित्रांची अतूट मैत्री! दररोज एकमेकांना भेटल्याविना दिवस जात नव्हता. शेवटी ईहलोकीचा प्रवासही त्यांनी एकाच दिवशी पूर्ण केला.

राहाता तालुक्यातील केलवड येथील प्रगतिशील शेतकरी रायभान नामदेव गमे व भाऊसाहेब ओमगिरी गोसावी हे दोघे परममित्र. दोघांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. दोघेही सराला बेटाचे नि:स्सीम भक्त होते. गोसावी बाबा माधुकरी (भिक्षा) मागण्यासाठी गावात फिरत असत. त्यावेळी त्यांचे मित्र रायभान गमे हे त्यांना दररोज भेटत व त्यांच्या गप्पा रंगत. त्यांच्या गप्पांना वेळेचे भान नसायचे. त्यानंतर ते आपापल्या कामाला पुढे जात असत. ‘ऐसी कळवळ्याची जाती करीन लाभावीन प्रिती’ अशी त्यांची मैत्री होती.

शनिवारी (ता.२) यातील रायभान गमे यांचे वयाच्या ८१ वर्षी सकाळी ७.१५ वाजता निधन झाले. याच दिवशी सकाळी ८.५५ वाजता दुसरे मित्र भाऊसाहेब गोसावी यांचेही वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. या दोन्ही वारकरी सांप्रदायातील मित्रांनी आपला जीवनप्रवासही एकाच दिवशी संपवला. या दोन्ही मित्रांच्या अशाही मैत्रीचा अनुभव केलवडकरांना आला.
