छत्रपती शाहू महाराजांनी जगाला समतेची शिकवण दिली : डॉ. थोरात! यशोधन जनसंपर्क कार्यालयात 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिक्षण व नोकरीत आरक्षण लागू करताना शिक्षणातून विकासाची क्रांती घडविणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जगाला समतेची शिकवण दिली असल्याचे प्रतिपादन कर्करोग तज्ज्ञ डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

छत्रपती शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृतीशताब्दीनिमित्त यशोधन जनसंपर्क कार्यालयात 100 सेकंद स्तब्ध उभे राहून त्यांना अभिवादन केले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात तालुका काँग्रेस समितीच्यावतीने आयोजित राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित अभिवादन प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, रामहरी कातोरे, पी. वाय. दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. तर महसूल मंत्री थोरात हे कोल्हापूर येथे मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त त्यांना राज्यभरात अनेक ठिकाणी 100 सेकंद स्तब्धपणे उभे राहून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांसह संत राष्ट्रपुरुषांचा मोठा वारसा लाभला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण सुरु करुन बहुजनांना विकासाची मोठी संधी निर्माण करुन दिली. त्यांनी कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी देण्याच्या हेतूने धोरण त्यांनी आखले. जातीप्रथा व अंधश्रध्देविरुध्द त्यांनी आवाज उठविला. समाजात जागृती निर्माण केली. विज्ञानवादी विचार जोपासले. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला, विधवा पुर्नविवाहला मान्यता दिली. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला. यासह राधानगरी धरणाची उभारणी करुन जलसंधारणाचे महत्व समजावून दिले असल्याचेही त्या म्हणाल्या.

Visits: 130 Today: 2 Total: 1102635

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *