पठारभागात बिबट्यांचा धुमाकूळ; दोन शेळ्या ठार

पठारभागात बिबट्यांचा धुमाकूळ; दोन शेळ्या ठार
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील शिंदोडी येथील पोपट गणपत कुदनर यांच्या घरासमोर बांधलेल्या दोन शेळ्यांवर बिबट्यांनी हल्ला चढवत ठार केल्या आहेत. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दिवसेंदिवस या भागात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

शिंदोडी गावांतर्गत असलेल्या इनाम वस्ती येथील शेतकरी पोपट कुदनर यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरासमोर शेळ्या बांधल्या होत्या. दरम्यान, दोन बिबट्यांनी येथे येत थेट शेळ्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात शेळ्या जागीच ठार झाल्या तर त्यातील एक शेळी बिबटे घेवून गेले. बिबट्यांना पाहून कुदनर कुटूंब घाबरून गेले होते. त्यानंतर कुदनर यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच श्री.फटांगरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी एकच शेळी आढळून आली तर दुसर्‍या शेळीचा शोध घेऊनही सापडली नसल्याने एकाच शेळीचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून साकूर, बिरेवाडी परिसरात बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

 

Visits: 176 Today: 1 Total: 2121521

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *