संगमनेर बसस्थानक अडकले खासगी वाहनांच्या विळख्यात दुकानदारांसह बसस्थानकात येणार्‍या प्रवाशांना होतोय त्रास

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणारे बसस्थानक खासगी वाहनांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसते. सध्या एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने खासगी वाहनधारकांचे चांगले फावत आहे. यामुळे बसस्थानकातील दुकानदारांसह बसस्थानकात येणार्‍या प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात संगमनेर बसस्थानकाने लौकिक प्राप्त केला आहे. परंतु, येथील व्यापारी गाळ्यांसमोर ग्रामीण भागातील नागरिक बिनधास्तपणे आपली वाहने उभी करुन कार्यभार उरकतात. यामुळे बसस्थानकात येणार्‍या प्रवाशांना आणि दुकानदारांना नाहक त्रास करावा लागतो. तसेच बसस्थानकात येणार्‍या बसेसनाही कधीकधी अक्षरशः वाट शोधावी लागते. यामुळे बसस्थानक जणू खासगी वाहनांच्या विळख्यात सापडल्याचेच चित्र दिसते.

सध्या एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. यामुळे बसच्या फेर्‍या कमी आहेत. त्याचा फायदा खासगी वाहनांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनेही बसस्थानक परिसरात व रस्त्यावर बिनधास्तपणे वाहने उभी करतात. यामुळे अनेकदा वाहतुकीस अडथळाही निर्माण होतो. याकडे संबंधित आगार प्रमुख आणि वाहतूक पोलिसांनी वेळीच लक्ष घालून आवर घालण्याची गरज आहे. तरच बसस्थानक परिसराचा श्वास मोकळा होईल, असे येथील दुकानदार बोलत आहे.

Visits: 84 Today: 1 Total: 1111291

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *