बनावट ‘छापा’ प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’ येण्याची शक्यता! ‘तो’ फोन आल्यानंतरच कारवाई; प्रकरणात ‘अदृष्य’ व्यक्तिची ‘एन्ट्री’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पंधरवड्यात संगमनेर बसस्थानकावर झालेली ‘एनडीपीएस’ कारवाई आरोपीच्या पित्याने डिजिटल पुरावे सादर करीत बनावट असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या तक्रारीत त्यांचा मुलगा घरातून बसस्थानकावर जाण्यासाठी निघाला तेव्हापासून त्याला अटक झाल्याची माहिती मिळेपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम लिखित स्वरुपात सादर करुन त्यातील दाव्यांना पूरक ठरतील अशाप्रकारचे सीसीटीव्ही फूटेजही पाठवले. त्यावरुन अपर अधीक्षकांच्या गोपनीय अहवालावरुन पोलीस उपनिरीक्षक सावंत यांना नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले. मात्र अद्यापही त्यांचे निलंबन झाले नसल्याने शहरात चर्चेचे फव्वारे उडत असतानाच आता या प्रकरणात आणखी एका ‘अदृष्य’ व्यक्तिची ‘एन्ट्री’ झाली आहे. मात्र त्याचे नाव उघड करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्याला कागदावर घेणे अशक्य आहे. त्यासाठी पोलिसांनी ‘खबर्यासाठी’ उपनिरीक्षकाचा बळी दिल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात सुरु आहे.

मागील पंधरवड्यात 3 सप्टेंबररोजी ऐन वर्दळीच्यावेळी संगमनेर बसस्थानकाच्या उत्तर प्रवेशद्वाराजवळ सदरचा प्रकार घडला होता. भारतनगरमध्ये राहणार्या कासिफ असद कुरेशी या 27 वर्षीय तरुणाला त्याच्या तिघा व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांनी चहा पिण्याच्या बहाण्याने बसस्थानकावर बोलावले व या दरम्यान त्यातील एकाने त्याच्या मोपेडच्या पुढील भागात ‘मेफेड्रोन’ (एमडी) नावाचे ड्रग्ज असलेली पुडी ठेवल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनीच ‘एमडी’ उपलब्ध करुन देत छाप्यासाठी पूरक वातावरण तयार केले आणि त्याची पूर्तता होताच मोपेडच्या तपासणीत त्यावेळी 110 ग्रॅम वजन असल्याचे सांगितले जाणारी मेफेड्रोनची पूडी सापडली.

काही क्षणात घडलेल्या या प्रकरणात एका हातात फोन आणि दुसर्या हातात माोपेडमधून निघाल्याचे दाखवण्यात आलेली ‘ती’ पुडी घेत उपनिरीक्षक सावंत यांनी काही मिनिटांपूर्वी त्यांच्याशी गप्पा मारणार्या कासिफ कुरेशीला गचांडले. त्यांची कृती पाहून जणू इशार्याचीच वाट पाहणार्या त्यांच्या चौघा सहकारी कर्मचार्यांनी लागलीच झडप घालीत त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी पोलीस आणि आरोपीमध्ये किरकोळ झटापट आणि शाब्दीक युद्ध झाल्याचेही दिसते, मात्र सरतेशेवटी नेहमीप्रमाणे विजय पोलिसांचाच होतो. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळाच्या डोक्यावरच असलेल्या सीसीटीव्हीने अचूक टिपला आहे आणि त्याचे फूटेजही आरोपीच्या वडिलांनी यापूर्वीच तपास यंत्रणांना सादर केले आहे.

या फूटेजवरुन आरोपी बसस्थानकावर पोहोचल्यानंतर काही वेळाने पूर्वीपासूनच तेथे असलेल्या त्याच्या प्रतिस्पर्धी तिघातील एकजण फोनवर बोलत असल्याचे निमित्त करुन त्याच्या मोपेडवर जावून बसतो, काहीवेळ मोबाईलवरच संभाषण करीत मोपेडवरच आडवा-तिडवाही होतो आणि पुढील भागात असलेल्या डिकीजवळ संशयास्पद हालचालीही करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यावरुन आधी डॉ.आंबेडकर स्मारकाजवळ गाडीसह मानवी झडतीची प्रक्रिया होवूनही काहीच आढळलेले नसताना पोलिसांच्या उपस्थितीत पुन्हा बसस्थानकावर आलेल्या त्याच मोपेडमधून ‘ड्रग्ज’ची पुडी सापडलीच कशी? असा प्रश्न निर्माण होवून संशयाची सुई मोबाईलवर बोलत मोपेडपर्यंत गेलेल्या ‘त्या’ इसमावर गेली आणि त्यावरच हे संपूर्ण प्रकरण केंद्रीत झाले.

असद कुरेशी यांनी केलेल्या दाव्यानुसार या प्रकरणात 110 ग्रॅम एमडी जप्त झाला होता. प्रत्यक्षात गुन्हा दाखल करताना त्याचे वजन 71 ग्रॅम कमी करुन 39 ग्रॅम दाखवण्यात आले. असे असेल तर या बनावट कारवाईसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थ कोठून आणले?, नगरप्रमाणे पोलिसांच्या गोदामाचा तर दुरुपयोग होत नाही ना?, सापडल्याचे दाखवलेले ‘ड्रग्ज’ त्या खासगी इसमानेच आणले असेल तर त्याच्यावर अद्याप स्वतंत्र कारवाई का झाली नाही?, प्रत्यक्ष गुन्ह्यात मुद्देमाल आरोपीच्या पँटमधून हस्तगत झाल्याचे का दाखवण्यात आले? पोलिसांच्या गोदामातील जप्त मुद्देमालाचा अशाप्रकारच्या बनावट करवायांसाठी वापर तर होत नाही ना? असे कितीतरी प्रश्न निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाचा संशयही पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यावरच खिळला आहे.

अशात वरील प्रकरणात समोर आलेल्या ‘त्या’ तिघांचा अद्यापही ठावठिकाणा नसल्याने ड्रग्ज प्रकरणाची चौकशी अधांतरीत आहे. मात्र या प्रकरणात पोलीस दलावरच गंभीर आरोप होवून पोलिसांच्या विश्वासार्हतेलाच धक्का लागल्याने पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने श्रीरामपूरच्या अपर अधीक्षकांनी या प्रकरणातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांची झाडाझडती घेत चौकशी केली व आपला गोपनीय अहवालही सादर केला. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी ड्रग्ज प्रकरणाची चौकशी पूर्ण होईस्तोवर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना मुख्यालयात रूजू राहण्याचे फर्मान बजावले आहे.

संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने या प्रकरणात हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल आरोपीच्या मोपेडमधूनच जप्त केल्याचा दावा केला आहे. सदरचा छापा घडवून आणण्यासाठी त्याने मेफेड्रोन पुरवल्याचाही इन्कार केला असून ड्रग्ज बाळगणार्या आरोपीबाबत माहिती देणारा ‘खबर्या’ पडद्यावरच नसल्याचेही त्यांनी वरीष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समजते. आरोपी कासिफ कुरेशीच्या मोपेडमध्ये एमडी असल्याची पक्की खबर मिळाल्यानंतर ‘त्या’ तिघांच्या मदतीने आपण त्याला बसस्थानकावर बोलावले, मात्र तो परत जात असताना रस्त्यात घेतलेल्या झडतीत काहीच आढळले नाही. परंतु खबर देणार्याने मोपेडमध्येच मुद्देमाल असल्याचा पुनरुच्चार केल्याने अधिक तपासणीसाठी संशयीताला मोपेडसह पुन्हा बसस्थानकावर नेल्याचाही दावा केला गेला.

या दरम्यान मूळ खबर देणार्या मात्र घटनास्थळी हजर नसलेल्या ‘त्या’ अदृष्य इसमाने मोबाईलवर फोन करुन मोपेडच्या नेमक्या कोणत्या भागात मुद्देमाल लपवलाय याची माहिती दिली, तो फोन सुरु असतानाच त्यांनी संशयीत वाहनाजवळ जावून खबर्या सांगत असलेल्या मोपेडच्या हँडल खालील सापटीत हात घालताच त्यात ठेवलेली मेफेड्रोनची पुडी त्यांच्या हातात आली आणि त्यानंतरच आरोपीला जागेवरच पकडण्यात आल्याचा दावाही केल्याचे बोलले जाते. मात्र खबर देणार्या ‘त्या’ इसमाचे नाव सार्वजनिक करणं अथवा कागदावर घेणं जोखमीचे ठरण्याची शक्यता समोर आल्याने या प्रकरणातील उपलब्ध सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तूर्त संशयीत असलेल्या उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांचे निलंबन टाळण्यात आले असून ड्रग्ज प्रकरणात पसार असलेल्या आरोपींच्या अटकेसह या गुन्ह्याचा तपास होईस्तोवर त्यांना नियंत्रण कक्षातच थांबावे लागणार आहे. मात्र या प्रकरणातील नव्याने समोर आलेल्या माहितीने संपूर्ण गुन्ह्यातच ‘ट्विस्ट’ निर्माण झाले असून ‘त्या’ फोनच्या सीडीआरसह दोघातील संभाषण श्रीकांत सावंत यांच्या दाव्याची सत्यता सिद्ध करणारे ठरेल.

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केलेल्या चौकशीत आरोपीच्या वाहनात ‘ड्रग्ज’ असल्याची माहिती देणारी व्यक्ति वेगळीच असल्याचे व कारवाईच्या वेळी अथवा त्यापूर्वी घटनास्थळीच नसल्याचा नवा दावा चर्चेत आला आहे. खबर पक्की असल्याने डॉ.आंबेडकर स्मारकाजवळील झडती नकारात्मक असूनही संशयीताला पुन्हा बसस्थानकावर नेण्यात आले, त्याचवेळी ‘त्या’ अदृष्य खबर्याने मोपेडच्या हँडलखालील भागातील छोट्या डिकीची तपासणी करावी असे सांगण्यासाठी मोबाईल केल्याचे व सीसीटीव्हीतही त्या अनुषंगाच्या घडामोडी घडत असल्याचे दिसते. मात्र प्रत्यक्षात या खबर्याचे नाव कागदावर घेतल्यास अनर्थ घडण्याची दाट शक्यता असल्याने प्रकरणाची कायदेशीर सांगता करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यावरील उपाय सध्या पसार असलेल्या ‘त्या’ तिघांच्या अटकेत आहे. सध्या स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे.

