अखेर प्रवरेत जलसमाधी मिळालेले वाहन बाहेर काढण्यात प्रशासनाला 48 तासानंतर यश!  ठाण्याच्या पथकाकडून चार तासात मोहीम फते; मात्र वाहनात एकच मृतदेह आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील ओझर येथून सोमवारी रात्री आठच्या सुमारास पिंपरने मार्गे निघालेला टेम्पो ऐच्छिक स्थळी पोहोचलाच नाही. या दरम्यान रात्रीच्या अंधारात काय घडले याचा कोणीही साक्षीदार नसताना, गायब झालेल्या टेम्पोचा तालुकाच काय अगदी जिल्ह्याशीही संबंध नसतानाही, घटनेनंतर तब्बल 12 तासांनी केवळ संशयावरून तालुका पोलिसांनी उकरून काढलेल्या घटनेतील बुडालेला ‘तो’ मालवाहतूक टेम्पो अखेर प्रवरेच्या पात्राबाहेर काढण्यात तब्बल 48 तासानंतर प्रशासनाला यश आले आहे. ज्या पुलावरून हा टेम्पो पाण्यात पडला तेथून पुढे शंभर मीटरच्या अंतरापर्यंत तो वाहत गेला होता. ठाण्याहून आलेल्या विशेष आपत्ती पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री दहाच्या सुमारास सदरचा टेम्पो क्रेनच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढला. धक्कादायक म्हणजे या वाहनात चालकासह त्याच्या अन्य एका साथीदाराचा मृतदेह मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र वाहनात केवळ चालकाचाच मृतदेह आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे वाहन पाण्याबाहेर काढण्यात यश मिळाले असले तरीही शोधकार्य मात्र थांबलेले नाही.

गेल्या सोमवारी (ता.15) प्रकाश किसन सदावर्ते हे नाशिक येथून आपल्या पिकअप वाहनात काचा घेवून सुभाष आनंदराव खंदारे व अमोल अरुण खंदारे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे आले होते. रात्री आठच्या सुमारास त्यांनी संदीप नागरे यांच्याकडे काचा खाली केल्यानंतर ते तिघेही आपल्या वाहनातून जोर्वे-पिंपरणे रस्त्याने संगमनेरकडे जाण्यासाठी निघाले. त्यांचे वाहन पिंपरणेनजीकच्या प्रवरानदीच्या पुलावर आल्यानंतर वाहनचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांचे वाहन पुलाच्या कठड्याला धडकून प्रवरानदीत पडले. सध्या निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले असल्याने क्षणात त्यांचे वाहन पाण्यात बुडाले. यावेळी वाहनात बसलेल्या अमोल खंदारे यांनी वाहनाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश आल्यानंतर त्यांनी उघड्या असलेल्या खिडकीतून कसेबसे बाहेर पडून पोहत किनारा गाठला व आपला जीव वाचवला. मात्र वाहनचालकासह त्याचा चुलता मात्र स्वतःचा बचाव करु शकले नाहीत.

मंगळवारी (ता.16) सकाळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडूरंग पवार यांना सदरची घटना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरु केले. मात्र प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्यांचे प्रयत्न थोटके पडले. त्यामुळे त्यांनी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व आपत्ती व्यवस्थापनाचे तालुका प्रमुख तथा तहसीलदार अमोल निकम यांना याबाबतची माहिती देत शोधकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूने मंगळवारी दुपारपासून शोधकार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेत पिंपरणे ते ओझर पर्यंतच्या नदीपात्रात बुडीत वाहनाचा शोध सुरु केला.

या कामात क्रेनसह आसपासच्या परिसरातील पट्टीच्या पोहणार्‍यांचीही मदत घेतली गेली. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या शोधकार्यास यश आले नाही. आज (ता.17) सकाळपासून पुन्हा शोध करण्यात आला असता दाढ शिवारातील नदीपात्रात शोध पथकाला एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. सदरचा मृतदेह सापडल्यानंतर काहीकाळ बंद करण्यात आलेली शोध मोहीम पुन्हा सुरु करण्यात आली. या दरम्यान पिंपरणे नजीकच्या प्रवरापात्राच्या मधोमध कोसळलेले वाहन असल्याची माहिती शोधकार्य करणार्‍यांनी प्रशासनाला दिली. मात्र बरेच प्रयत्न करुनही प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने सदरचे वाहन बाहेर काढण्यात अपयश आले. वाहुन गेलेला चालक आणि त्याचा जोडीदारही वाहनातच फसलेले असण्याचीही शक्यता यावेळी वर्तविण्यात आली. सदरचे वाहन बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने मोठ्या क्रेनचाही वापर केला, मात्र त्याचाही फारसा फायदा झाला नाही.

त्यामुळे स्थानिक प्रशासनाने मंगळवारी रात्री मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून मदत मागितली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ कारवाई करीत ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन चमूतील गोताखोरांना संगमनेरात पाठविण्याचे आदेश बजावले. त्यानुसार आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन चमूतील सहा जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास निळवंडे धरणातून सतरा हजार पेक्षा अधिक क्यूसेक वेगाने पाणी सोडले गेल्याने त्याचा पाण्यावरील फुगवता आज सायंकाळ नंतर जाणवण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी ठाण्याच्या पथकाने बुडीत वाहन बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली.

यासाठी त्यांनी मोठ्या पोकलेन यंत्राची मदत घेतली. पथकातील चौघाजणांनी पाण्यात बुड्या घेऊन वाहनाला क्रेनच्या साखळ्यांची घट्ट बांधले. त्यानंतर पुलापासून वाहत्या प्रवाहाच्या दिशेने जवळपास 70 ते 100 मीटर अंतरावर वाहत गेलेल्या त्या वाहनाला पुलाच्या दिशेने ओढण्यात आले. पुलाच्या नजीक येताच त्याला प्रवाहातून बाजूला घेत पुलाच्या बाजूने बाहेर काढण्यात आले. या वाहनात चालक प्रकाश सदावर्ते यांच्यासह सुभाष खंदारे या त्याच्या जोडीदाराचाही मृतदेह आढळणे अपेक्षित होते. मात्र धक्कादायक बाब म्हणजे वाहनात फक्त एकट्या चालकाचाच मृतदेह आढळून आला. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. वाहनात असलेले सुभाष खंदारे मृत झाल्यानंतर वाहून गेले की त्यांचे वाहन बुडत असताना त्यांनीही पाण्याबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश मिळण्याच्या वेळीच श्वासांनी साथ सोडल्याने मृत्यू झाला? असे विविध प्रश्न यातून निर्माण झाले आहेत. त्यामुळे ठाण्याच्या शोध पथकाच्या सहकार्याने तब्बल 48 तासानंतर बुडालेले वाहन बाहेर काढण्यात यश मिळाले असले तरीही प्रशासनाचे शोधकार्य मात्र थांबलेले नाही.

आज सकाळपासूनच सुरु असलेल्या या शोधकार्यात संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडूरंग पवार व नायब तहसीलदार उमाकांत कडनोर आदी अधिकारी सकाळपासून व्यस्त होते. त्यांच्या अथक प्रयत्नांना रात्र होता होता यश मिळाले असले तरीही ते अर्धवट स्वरूपाचे असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही रुकरुक लागली आहे. सदर व्यक्ती बुडाली आहे की तिसऱ्या जोडीदाराप्रमाणेच पोहत पाण्याबाहेर पडून परस्पर कोठे निघून गेली आहे याचाही तपास आता तालुका पोलीस करीत आहेत.

Visits: 16 Today: 1 Total: 115828

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *