माळीचिंचोरा फाटा येथे मांगूर मासे घेऊन जाणारा टेम्पो पकडला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोघांवर नेवासा पोलिसांत गुन्हा


नायक वृत्तसेवा, नेवासा
बंदी असलेल्या मांगूर माशांची विक्री करण्यासाठी अहमदनगर ते औरंगाबाद रस्त्याने जाणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता.31) सायंकाळी माळीचिंचोरा फाटा येथे पकडला असून टेम्पोतून 8 लाख रुपये किंमतीचे 4 टन जिवंत मांगूर मासे जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अहमदनगरच्या सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी प्रतिभा दत्तू यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता वाजता अहमदनगर ते औरंगाबाद रस्त्यावर माळीचिंचोरा फाटा येथे पांढर्‍या रंगाच्या आयशर टेम्पोतून (एमएच.46, बीयू.7865) बंदी असलेल्या मांगूर माशांची विक्री करण्यासाठी जाणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांना सदर गाडी पकडून कारवाई करण्यास सांगितले.

त्यानुसार माळीचिंचोराफाटा येथे पोलीस व मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांसह पोलीस पथक थांबले असता आयशर टेम्पो जाताना दिसला. तो थांबवून बप्पा ताजरुल बिश्वास (वय 32) व तोकामल मियाराज बिश्वास (वय 48, दोघेही रा. 24 परगाना, पश्चिम बंगाल) यांना ताब्यात घेतले. टेम्पोत जिवंत मांगूर मासे असून ते मध्यप्रदेशात घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून 8 लाख रुपये किमतीचे 4 टन वजनाचे पाण्याच्या टाकीत ठेवलेले मांगूर जातीचे जिवंत मासे तसेच टेम्पो (क्र. एमएच.46, बीयू.7865) अंदाजे किंमत 25 लाख रुपये असा 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 112 Today: 2 Total: 1110921

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *