माजीमंत्र्यांचा ‘तो’ दावा ग्रामस्थांनीच ठरवला खोटा! वीजेच्या प्रश्‍नावरुन प्रांताधिकार्‍यांवर तोंडसुख; प्रत्यक्षात मात्र दुसर्‍या भाच्याकडे उपस्थिती..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण राज्य भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभे असतानाच वीजेचाही खेळ सुरु झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचा परिणाम राज्यात विविध ठिकाणी आंदोलनांना सुरुवात झाली असून मंगळवारी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरातही ‘जनआक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. पावसाअभावी उपलब्ध पाण्यावर पिकं वाचवण्याच्या धडपडीत अनियमित वीजेचा अडसर आणि रात्री-अपरात्री वाघांची भीती या प्रमुख विषयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात मात्र केवळ निवेदन स्वीकारण्यास उपलब्ध नसलेल्या संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांनाच लक्ष्य करण्यात आले. माजीमंत्र्यांसह त्यांच्या कन्येने त्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उचलून पालकमंत्र्यांसह स्थानिक आमदारांचे नाव न घेता त्यांच्यावरुन शब्दांच्या कोट्या करीत भलतेच तोंडसुख घेतले. मात्र चिंचोली गुरवच्या ग्रामस्थांनी सोशल माध्यमातून व्हिडिओ प्रसारित करुन प्रांताधिकारी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्यांच्याच दुसर्‍या भाच्याच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित असल्याचे समोर आणून एकप्रकारे ‘त्या’ दोघांचाही दावा खोटा ठरवला, त्यावरुन आता संगमनेरात राजकारण तापले असून चाळीस वर्ष अशाच भूलथापा मारल्याने जनतेने कार्यक्रम केल्याची जहरी टीका आमदार अमोल खताळ यांनी केली आहे.


यंदा राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने मोठा फटका दिला असून राज्यात भयानक दुष्काळाची स्थिती निर्माण होवू लागली आहे. पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रातील पिकं करपली असून पर्यायी पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांना आपली पिकं वाचवण्यासाठी मात्र मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच वीज कंपनीकडून परस्पर वीज कपातही वाढल्याने नदीपात्रातून वाहते पाणी असतानाही शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.22) संगमनेरातील यशोधन कार्यालय ते प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. नवीन नगररस्त्यावर या मोर्चाचे सभेत रुपांतर होवून प्रांताधिकार्‍यांना निवेदन देवून त्याची सांगता होईल असे नियोजन करण्यात आले होते.


ठरल्याप्रमाणे सकाळी दहाच्या सुमारास निघालेला मोर्चा माध्यान्नाच्या दरम्यान नवीन नगररस्त्यावरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनासमोर पोहोचला. यावेळी काहींनी खूद्द प्रांताधिकारी निवेदन घेण्यास आल्याशिवाय जागा सोडणार नसल्याची भूमिका घेतली. तर त्यातील काहींनी आरडाओरड व घोषणाबाजी करीत थेट प्रांताधिकार्‍यांचे दालन गाठले. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने विक्रम आत्माराम खांडरे (रा.कौठे कमळेश्‍वर) या शेतकर्‍यांने दालनात धुडगूस घालीत कागदपत्रे भिरकावली आणि त्यांच्यासह दालनातील अन्य खुर्च्यांचीही इतरत्र उलथ्यापालथ्या करुन गोंधळ घातला. त्यामुळे आजवर सुसंस्कृत राजकारण म्हणून बघितल्या जाणार्‍या स्थानिक काँग्रेसच्या आंदोलनाला काहीसे हिंसक वळण मिळाले.


‘त्या’ शेतकर्‍याच्या आरडाओरड आणि फेकाफेकीने स्फूरण चढलेल्या काहींनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्याच माहौलमध्ये वक्त्यांनी वीजेच्या मागणीवरुन थेट सरकारवर कोरडे ओढून एकामागोमाग टीकेचे बाण डागले. माजीमंत्री थोरात यांचा राजकीय वारसा पेलण्यासाठी पृष्ठभूमी तयार करणार्‍या डॉ.जयश्री थोरात यांनीही शेतकर्‍यांचा जोश आपल्या शब्दात भरुन निवेदन घेण्यास अनुपस्थित असलेल्या प्रांताधिकार्‍यांवर शाब्दीक कोरडे ओढले. तर, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हक्काच्या 30 टक्के पाण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यासोबत केलेल्या संघर्षाची आठवण करुन देत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव न घेता ‘पूर्वेकडील’ असा उल्लेख करीत निशाणा साधला.


नवीन माणसांना हा संघर्ष माहिती नसल्याची पृष्टी जोडून अप्रत्यक्ष आमदार खताळांनाही ओढून त्यांनी पूर्वेचे मंत्री झाले आणि पाटांची रुंदी वाढून महिन्याभराच्या आवर्तनाचे पाणी 15 दिवसांतच वाहुन नेण्यास सुरुवात झाल्याचा प्रकार सांगितला. त्यावेळीही दिलेल्या लढ्याचा इतिहास सांगत आवर्तनाच्या काळात 11 तास वीज उपलब्ध करुन घेण्याचा नियमही केल्याचा दावा त्यांनी केला. आवर्तनाच्या काळात हक्काने 11 तास वीज मिळण्याची गरज असतानाही त्याचा खेळ होत असल्याने हा प्रकार वीजेच्या आडून आपले हक्काचे पाणी पळवण्याचा असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.


वास्तविक सदरचे आंदोलन अनियमित वीजेच्या प्रश्‍नावरुन करण्यात आले होते. त्यामुळे सदरचा मोर्चा वीज कंपनीच्या कार्यालयावर जाण्याची अपेक्षा होती. मात्र वीज कंपनीशी तसा कोणताही संबंध नसतानाही तो प्रांताधिकार्‍यांकडे वळवण्यात आला. त्यातच मोर्चेकरी हजर झाले त्यावेळी प्रांताधिकारी त्यांच्या पूर्वनियाजित कार्यक्रमासाठी उपलब्ध नसल्याने मोर्चाच्या नेतृत्वाने त्यांनाच लक्ष्य करीत सुरुवातीला ‘निष्क्रिय’ माणसांवर बोलण्यात अर्थ नाही असे सांगत प्रांतांचा खांदा वापरुन खताळांवर निशाणा साधला. त्यांना पाण्यावर बोलायचे नाही, त्यांना वीजेवर बोलायचे नाही, मग काय केले असं विचारलं तर म्हणे गावोगावी दोन हजार फ्लेक्स लावले, ते लावण्यासाठीच शिव्यांच्या भीतीने अधिकारी गेल्याने शेतकर्‍यांचे प्रश्‍न रस्त्यावरच राहिल्याचा घणाघात त्यांनी केला होता.


त्यावर धावपळीत आंदोलनस्थळी उपस्थित झालेल्या प्रांताधिकार्‍यांनी ‘कोणा’च्या कार्यक्रमाला उपस्थित होतो यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांच्यावर आरोप करणार्‍या वक्त्यांना तोंडघशी पडावे लागले. दुपार होताहोता चिंचोली गुरवमधील काही ग्रामस्थांनीही व्हिडिओ तयार करुन त्यांच्या गावातील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा संदर्भ देत वास्तव समोर आणले. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांपूर्वीच 5 सप्टेंबररोजी प्रांताधिकार्‍यांना निमंत्रण देवून त्यांची उपस्थिती निश्‍चित केल्याचा दावाही केला.


त्याशिवाय सदरचा कार्यक्रम रयतचे व्यवस्थापकीय सदस्य आणि माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे दुसरे भाचे किरण कडू-पाटील यांच्या सत्कार सोहळ्याचा असल्याचेही त्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या छायाचित्रांसह समोर आणल्याने माजीमंत्री थोरात व त्यांच्या कन्येने प्रांताधिकार्‍यांवर केलेले ‘फ्लेक्स’ आरोप खोटे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यावरुन आता दोन्ही बाजूने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून चाळीस वर्ष जनतेला अशाच भूलथापा आणि गैरसमज निर्माण करुन वेड्यात काढल्याने जनतेने त्यांना आता कायमस्वरुपी घरी बसवले आहे असा जोरदार पलटवार आमदार अमोल खताळ यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यावरुन आता आगामी कालावधीत संगमनेरचे राजकारण पुन्हा एकदा तापणार असून यावेळी आजी-माजी आमदारांमधील राजकीय फेकाफेक रंगण्याची शक्यता आहे.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘जनआक्रोश मोर्चा’त निवेदन घेण्यासाठी अनुपस्थित असलेल्या प्रांताधिकार्‍यांवरुन त्यांच्यासह त्यांच्या कन्येने जहरी टीका करीत शिव्या देणार्‍यांना घाबरुन ‘ते’ फ्लेक्स लावण्यासाठी गेल्याचा दावा केला होता. यावेळी दोघांनीही प्रांताधिकार्‍यांची भूमिका समोर ठेवून त्यांच्यावर शाब्दीक तोंडसुखही घेतले, मात्र सायंकाळ होताहोता प्रांताधिकार्‍यांची अनुपस्थिती त्यांच्याच भाच्याच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामूळे असल्याचे वास्तव समोर आल्यानंतर दुपारी केलेला दोघांचाही आक्रमक दावा संध्याकाळ होताहोता त्यांच्यासाठी ट्रोलिंगचा मुद्दा ठरला.

Visits: 9 Today: 9 Total: 2121105

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *