संगमनेरात वृद्धेचे सात तोळ्याचे गंठन धूमस्टाईलने लांबविले

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील अतिशय गजबजलेल्या गणेशनगर येथील वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठन धूमस्टाईलने ओरबाडल्याची घटना स्वयंवर मंगल कार्यालयाजवळ बुधवारी (ता.1) सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा संगमनेरात धूमस्टाईलने गंठन लांबविण्याचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांसमोर आव्हान ठाकले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गणेशनगर येथील शकुंतला ज्ञानदेव पालवे (वय 65) ही वृद्ध महिला अकोले बाह्यवळण मार्गावरील स्वयंवर मंगल कार्यालय परिसरात असताना पल्सर दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे सात तोळे वजनाचे सोन्याचे गंठन लांबविले. यानंतर शकुंतला पालवे यांनी पोलिसांत धाव घेऊन दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुरनं.454/2021 भादंवि कलम 392 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सह.पोलीस निरीक्षिका कोकोटे या करत आहेत. या घटनेने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, धूमस्टाईलने चोर्या करणार्यांचा बंदोबस्त करण्याचे पोलिसांसमोर आव्हान ठाकले आहे.
