वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत अखेर ‘कंट्रोल जमा’! निष्पापाला फसवण्यासाठी गुन्हेगारी कृत्य; माध्यमांच्या संयुक्त लढ्याला यश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासकीय सेवेत राहुन गुन्हेगारी कृत्य करणार्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाच्या पापाचा घडा अखेर भरला. शहरातील एका निष्पाप तरुणाचा कायदेशीर मार्गाने काटा काढण्याची सुपारी घेत षडयंत्र रचून त्याला फसवण्याचा प्रकार गेल्या पंधरवड्यात शहरात घडला होता. त्या प्रकरणात पीडित तरुणाने आपल्या वडिलांना संपूर्ण घटनाक्रम सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी धाव घेवून तीन ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज हस्तगत केले होते. त्यावरुन उपनिरीक्षक सावंत यांनी तिघा खासगी आणि चौघा शासकीय कर्मचार्यांना सोबत घेवून संपूर्ण कुभांड रचल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या भ्रष्टाचारी अधिकार्याचे एकामागून एक किस्से चर्चेत येवून संगमनेर पोलिसांची अब्रु चव्हाट्यावर आली होती. या प्रकरणी दैनिक नायकसह संगमनेरातील काही माध्यमांनी सुरुवातीपासून या प्रकरणात वास्तव लिखाण करुन पोलीस अधीक्षकांना कठोर भूमिका घेण्यास भाग पाडले आणि अखेर आज (ता.2) सायंकाळी श्रीरामपूरच्या अपर अधीक्षकांच्या गोपनीय अहवालावरुन या वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षकाची संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून उचलबांगडी करुन त्यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे.

मागील दीड वर्षांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या उपनिरीक्षकपदी कार्यरत असलेल्या श्रीकांत सावंत यांची येथील संपूर्ण कारकीर्द अतिशय वादग्रस्त आणि काळवंडलेली राहीली आहे. या कालावधीत दाखल झालेल्या अनेक गंभीर प्रकरणात त्यांनी जाणीवपूर्वक त्रूटी ठेवून ओरापी व गुन्हेगारांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला व त्या बदल्यात मोठी मायाही जमवली. या शिवाय गेल्या दीड वर्षांच्या काळात संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित झालेल्या अंमलीपदार्थांवरील जवळपास डझनभर प्रकरणाचे तपासही त्यांच्याचकडे देण्यात आले, मात्र त्यातील एकाही प्रकरणाचा तपास त्यांनी केला नाही, मात्र त्यातून लाखोंची उड्डाणे घेतल्याची चर्चा प्रत्येकवेळी घडत राहीली.

खालून वरपर्यंत प्रत्येक अधिकार्याला आपण सांभाळतो अशा अविर्भावात वावरणार्या या दुय्यम अधिकार्याने शहर पोलीस ठाण्यात अक्षरशः धिंगाणा घातला होता, मात्र थेट वरीष्ठांशी मर्जी असल्याने त्यांच्या विरोधात चकार काढण्याचीही कोणाची हिम्मत होत नव्हती. मात्र म्हणतात, जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो, तेव्हा त्याचा नाशही त्याच गतीने होतो. या उक्तिप्रमाणे गेल्या पंधरवड्यात या लालची पोलीस अधिकार्याने तिघा कसायांकडून मोठा मलिदा लाटून त्यांच्या व्यवसायात काटा बनलेल्या एका 27 वर्षीय तरुणाला मेफेड्रोन (एमडी) नावाचा अंमलपदार्थ बाळगल्या प्रकरणी षडयंत्र रचून फसवले व त्याला अटकही केली.

मात्र त्याचे हे संपूर्ण गुन्हेगारी कृत्य बसस्थानकावरील शासकीय व खासगी सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये कैद झाल्याने त्याच्या मनमानी कारभाराचा हैदोस उघडा पडला. मात्र त्यानंतरही गेल्या आठवडाभर जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकार्यांकडून त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु होता. परंतु समाजाशी सदैव बांधिलकी जोपासणार्या दैनिक नायकसह शहरातील काही माध्यमांनी ‘त्या’ निष्पाप तरुणाच्या पाठीशी उभे राहून सुरुवातीपासूनच या प्रकरणातील वास्तव समोर आणण्यासह वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या वेगवेगळ्या उद्योगांवरही प्रकाश टाकण्यास सुरुवात केली.

त्यातून संगमनेर पोलिसांची आणि पर्यायाने जिल्हा पोलिसांची लक्तरे वेशीवर येवू लागल्याने पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी पीडित तरुणाच्या वडिलांनी संपूर्ण घटनाक्रमासह या प्रकरणातील सर्व डिजिटल पुरावे सादर होवून आठवडा उलटल्यानंतर कठोर कारवाईचा बडगा उगारीत वादग्रस्त उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना कंट्रोल जमा केले आहे, मात्र तेवढ्यावरच त्यांचे गुन्हेगारी कृत्य थांबणारे नसून या भ्रष्टाचारी अधिकार्याची आणि त्याने वाममार्गाने कमावलेल्या संपत्तीची सखोल चौकशी होण्याची, संगमनेर बसस्थानकावरील बनावट कारवाईत षडयंत्र रचून अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी एनडीपीएस कायद्याखाली अटक करुन त्यांना कायमस्वरुपी सेवेतून बडतर्फ करण्याची गरज आहे, अन्यथा फूकटची कमाई रक्तात भिनलेला हा भ्रष्टाचारी अधिकारी ज्या पोलीस ठाण्यात जाईल, त्या पोलीस ठाण्याच्या हद्दित अंमलीपदार्थांचा व्यपार वाढून पिढ्या बर्बाद होतील.

पोलीस अधीक्षकांनी उशिरा का होईना मात्र या उपनिरीक्षकांला कंट्रोल जमा केल्याने संगमनेरातून समाधान व्यक्त होत असून अधीक्षकांनी आपल्या विवेकाला स्मरुन गुन्हेगारी मानसिकतेच्या या अधिकार्यावर कठोर कारवाई करण्सयाची गरज आहे.

