गीता रणांगण सोडून शांतता शोधायला शिकवत नाही : डॉ.संजय मालपाणी नृत्यवंदनेने भक्तिमय विचारसोहळ्याचा समारोप; पुढीलवर्षी ‘एक अध्याय, दोन दिवस’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कर्म करणे ही जीवनाची अपरिहार्यता आहे; मात्र त्या कर्मामागे ज्ञानाचा प्रकाश आणि कर्तेपणाच्या अहंकारापासून मुक्ती असेल, तर त्याच कर्माचे रुप साधनेत होते. कर्माचे डोळे ज्ञान आणि अहंकार सोडणे हाच खरा संन्यास आहे. अशा अत्यंत साध्या, पण जीवनाला भावस्पर्श करणार्या सूत्रातून गीतेतील ज्ञान-कर्म-संन्यासयोगाचा गाभा उलगडत गीता विशारद्, उद्योजक व शिक्षणतज्ज्ञ डॉ.संजय मालपाणी यांनी संगमनेरकरांना मंत्रमुग्ध केले. ज्ञानेश्वरीच्या रसाळ ओव्यांचा वर्षाव, भगवद्गीतेतील श्लोकांचे सहज विवेचन आणि आधुनिक जीवनाशी त्यांची सांगड यामुळे राजस्थान युवक मंडळाच्या चार दिवसीय ‘मनशांती आणि जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप केवळ कार्यक्रमाचा शेवट न ठरता आत्मपरीक्षणाचा अनुभव ठरला.

गेल्या वर्षी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या व दुसर्या अध्यायाचे निरुपण केल्यानंतर यंदा डॉ.मालपाणी यांनी तिसर्या आणि चौथ्या अध्यायाचा भावार्थ उलगडला. ‘कर्मयोग’ आणि ‘ज्ञान-कर्म-संन्यासयोग’ या दोन दिवसांच्या निरुपणातून त्यांनी जीवन जगण्याचे एक वेगळेच शास्त्र संगमनेरकरांसमोर ठेवले. संन्यास म्हणजे भगवे कपडे घालणे, कर्तव्य, कर्म आणि संसार सोडणे नव्हे तर, आसक्ती, अहंकार आणि कर्मफळाची गुलामी सोडणे म्हणजे संन्यास, हा त्यांचा संदेश व्याख्यानाचा केंद्रबिंदू ठरला.

ज्ञानेश्वरीतील आता सर्वही इंद्रियांनी एकत्र यावे कानांच्या स्थानी या माऊलींच्या आर्जवाने त्यांनी विवेचनाची सुरुवात करताना गीतेचे अर्जुनाला मिळालेले ज्ञान किती अद्वितीय होते, हे उलगडले. लक्ष्मी, देवकी, वासुदेव, बलराम यांनाही न लाभलेले कृष्णाचे अंतरंग अर्जुनाला लाभले, कारण तो केवळ भक्त नव्हता; तो कृष्णाचा सखा होता. ‘भक्तोऽसि में सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तम्’ या श्लोकातून त्यांनी नात्यांमधील विश्वास, निर्व्याज मैत्री आणि मन मोकळे करण्याची गरज अधोरेखित केली.

आपण फायनान्शियल बॅलन्स शीट मांडतो, पण लाइफ बॅलन्स शीट कधी मांडतो का? या प्रश्नाने त्यांनी श्रोत्यांना स्वतःकडे पाहण्यास भाग पाडले. पैसा, साधने, संपर्क आणि माहिती प्रचंड वाढली, मात्र समाधान, संबंध, निर्णयक्षमता आणि मनाची श्रीमंती त्याच प्रमाणात वाढली आहे का, असा सवालही त्यांनी केला. वेग वाढलाय, पण दिशा चुकतेय, या एका वाक्यात त्यांनी आधुनिक जीवनाचे मर्म पकडले. स्पीडपेक्षा डायरेक्शन महत्त्वाचे आणि व्यवस्थापनापेक्षा स्वतःचे व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

गीतेतील ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत..’ या श्लोकाचा अर्थ त्यांनी बाह्य जगातील युद्धापुरता मर्यादित ठेवला नाही. धर्म म्हणजे कर्तव्य आणि धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते, असे स्पष्ट करत त्यांनी आळस, अहंकार, लोभ, तुलना आणि असंतोष यांनाच अंतर्मनातील अधर्माची रुपे ठरवले.

‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः’ या श्लोकातून त्यांनी गुण आणि कर्म यावर आधारित व्यक्तिमत्त्वाची ओळख स्पष्ट केली. प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता सारखी नसते. कोणाची भाषिक, कोणाची गणिती, कोणाची कलात्मक, कोणाची सांगीतिक तर कोणाची शारीरिक किंवा निसर्गाशी संबंधित असते. त्यामुळे मुलांची तुलना न करता मी कोण आहे?, माझी नैसर्गिक ताकद कोणती?, मला कोणते कर्म शोभते? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे, असा जीवनोपयोगी संदेशही त्यांनी यावेळी दिला.

कर्म, विकर्म आणि अकर्म यांचे विवेचन करताना त्यांनी सांगितले की, कर्म करणे अपरिहार्य असले तरी त्याच्या फळाशी आणि कर्तेपणाशी स्वतःला बांधून घेणे हे दुःखाचे मूळ आहे. हे माझ्यामुळे झाले, परी मी हे नाही केले, या ज्ञानेश्वरीतील भावनेतून कर्तेपणाचा अहंकार विरघळण्याचे तत्त्व त्यांनी स्पष्ट केले. परिस्थिती आपल्याला घडवत नाही; परिस्थितीकडे आपण कसे पाहतो, यावर आपली मनःस्थिती ठरते. दुसर्याने केलेल्या टीकेने आपण चिडायचे की त्यातून स्वतःची चूक शोधायची, हा निर्णयही आपलाच असल्याचे त्यांनी उदाहरणांतून पटवून दिले.

व्याख्यानाच्या अखेरीस त्यांनी प्रत्येकाला रात्री स्वतःला सात प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. आज माझे कर्तव्य मी केले का?, परिणामांच्या अतिरेकी विचाराने मी अस्थिर झालो का?, अहंकाराने माझा निर्णय चुकला का?, मी निस्वार्थपणे काही केले का?, आज नवीन काय शिकलो?, काय सोडून देणे गरजेचे आहे? आणि उद्या काय अधिक चांगले करणार? अशा आत्मसंवादातूनच मनःशांतीचा मार्ग सापडतो, असे त्यांनी सांगितले. गीता रणांगण सोडून शांतता शोधायला शिकवत नाही; रणांगणात राहून मन शांत कसे ठेवायचे, हे शिकवते, हा संदेश त्यांच्या या दोन दिवसांच्या निरुपणाचा सार ठरला.

या चार दिवशीय व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी ज्ञानेश्वरीच्या महिमेचे वर्णन करताना डॉ.संजय मालपाणी यांनी दोन दिवसांच्या भक्तिमय ज्ञानयज्ञात कर्मयोगाचे सूत्र अत्यंत सहज आणि सोप्या भाषेत उलगडून दाखवल्याचे सांगितले. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी प्राकृत भाषेत मांडलेल्या भगवद्गीतेचा गाभा आजच्या बोलीभाषेत समजून घेताना दीड-दोन तासांचा वेळ अपूरा पडतो, असे सांगत त्यांनी यापुढे ज्ञानेश्वरीच्या एका अध्यायाचे दोन दिवस निरुपण ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला. या वेळी वारकरी संप्रदायाचे भोयी रामकृष्ण महाराज करपे यांच्या हस्ते डॉ.मालपाणी यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. कार्याध्यक्ष सागर मणियार, कृष्णा आसावा, सम्राट भंडारी व कल्पेश मर्दा यांनी वाद्यवृंदाचा सन्मान केला. ओम इंदाणी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

नृत्यवंदनेने भक्तिमय सोहळ्याला अनोखी उंची..
चार दिवसांच्या या भक्तिमय विचारसोहळ्याचा समारोप ध्रुव ग्लोबल स्कूलच्या राष्ट्रीय नृत्यस्पर्धेत तब्बल 103 पदकांसह दैदीप्यमान विजय मिळविणार्या विद्यार्थीनींच्या नृत्यवंदनेने झाला. सुरेख वेशभूषा, प्रभावी नेपथ्य, लयबद्ध हालचाली आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थित शेकडो भाविक मंत्रमुग्ध झाले. ज्ञान, भक्ती आणि संस्कारांच्या या विचारयज्ञाला नृत्याच्या कलाविष्काराची मनोहारी जोड मिळाली. या राष्ट्रीय विजेत्या विद्यार्थीनींचा उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. विचारांच्या गाभार्यातून सुरु झालेल्या चार दिवसांच्या या सोहळ्याचा शेवट कलाविष्काराच्या मंगलमय निनादात झाला आणि ‘मनशांती व जीवनविकासा’चा हा ज्ञानयज्ञ संगमनेरच्या सांस्कृतिक अवकाशात एक वेगळीच उंची गाठून गेला.

