संगमनेरच्या सामाजिक सौहार्दाला ‘नख’ लावण्याचा प्रयत्न! पोलिसांच्या सतकर्तने अनर्थ टळला; शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जगभरात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांचा जन्मोत्सव साजरा होत असताना मानवतेचा संदेश देणार्या या उत्सवाच्या पूर्वसंध्येला संगमनेरातील काहीजणांनी सामाजिक सौहार्दालाच ‘नख’ लावण्याचा प्रयत्न केला. प्रेषितांचा जन्म आणि मृत्यूचा दिवस एकच असल्याने जगभरातील मुस्लिम बांधव दुरुद व सलाम करुन त्यांची शिकवण आणि मानवतेच्या संदेशावर चर्चा करण्यासाठी मिलाद महफील मध्ये एकत्र होत असताना शहरातील काही कट्टर मानसिकतेच्या मूठभर धर्मांधांनी मात्र त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. या सणाच्या निमित्ताने शहरातील मुस्लिमबहुल भागासह प्रमुख मशिदी व दर्ग्यांवर विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. सय्यदबाबा चौकासह गवंडीपूरा भागातील आकर्षक रोषणाई तर शहरात चर्चेचा विषय आहे, मात्र त्यात काही धर्मांधांनी शिरकाव करीत चक्क क्रूरकर्मा टीपू सुलतानाचे भव्य पोस्टर लावले होते. त्यातून धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता दाटल्याने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सदरचे पोस्टर हटवले. मात्र अवघ्या तासाभरातच काही कट्टरपंथीयांनी पुन्हा ते लावण्याचा प्रयत्न केल्याने शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या सूचनेनंतर मुस्लिम समाजातील प्रतिष्ठीतांनीच संबंधिताना समज दिल्यानंतर अखेर शहराला अशांततेच्या दिशेने नेण्याचा हा कट उधळला गेला.

ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र सण मानला जातो. ‘मिलाद’ या अरबी शब्दाचा अर्थ ‘जन्म’ असा होतो. त्यामुळे हा दिवस प्रेषित हजरतांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. इस्लामिक कॅलेंडरनुसार ‘रबिउल अव्वल’ महिन्याच्या बाराव्या दिवशी हा सण साजरा होतो. इस्लामिक मान्यतेनुसार, याच दिवशी पैगंबरांचा जन्म झाला आणि याच दिवशी त्यांचे निधनही झाले असे मानले जाते. म्हणूनच या दिवसाला ‘बारा वफात’ असेही म्हटले जाते. या दिवसाचे निमित्त साधून मुस्लिम बांधव आपल्या घरातच किंवा मशिदींमध्ये जावून विशेष प्रार्थना (दुरुद व सलाम) करतात. प्रेषितांच्या जीवनावर, त्यांच्या शिकवणीवर आणि मानवतेच्या संदेशावर चर्चा करण्यासाठी धार्मिक सभांचेही (मिलाद महफील) आयोजन केले जाते.

गोर-गरीबांना अन्नदान (दान-धर्म) करणे या दिवशी अत्यंत पुण्यकारक मानले जाते. संगमनेरसह अनेक ठिकाणी या दिवसाचे निमित्त साधून धार्मिक जुलूस काढण्यात येतो व त्या माध्यमातून प्रेषितांचा संदेश घरोघरी पोहोचवला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने अन्य ठिकाणांसह संगमनेरातील मुस्लिम बांधवही अतिशय उत्साही असून मुस्लिमबहुल भागांमध्ये मशिदी व प्रार्थनास्थळांसह रस्त्यांवर आकर्षक कमानी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यातून शहरातील वातावरण धार्मिक भासत असताना गवंडीपूरा भागातील एका मंचावर मात्र काही धर्मांध मानसिकतेच्या तरुणांनी अगतिक करण्याचा प्रयत्न केला. मूठभर असलेल्या या टोळक्याने मानवतेचा संदेश देणार्या या उत्सवाच्या मूळ हेतूलाच टाळे मारुन इतिहासाच्या पानांत हिंदू व इसाई धर्मींयांवर अन्ववीत अत्याचार करणार्या, स्त्रियांवर बलात्कार घडवणार्या आणि लाखोंचे शिरच्छेद करणार्या क्रूरकर्मा टीपू सुलतानाचे भव्य पोस्टर लावून दुसर्या धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला.

सदरच्या प्रकाराची शहरात चर्चा सुरु होवून वातावरण गंभीर होत असल्याची कुणकूण लागताच पोलीस उपअधिक्षक डॉ.कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तत्काळ गवंडीपूर्याकडे धाव घेत ‘त्या’ मंचावर लावलेले वादग्रस्त पोस्टर हटवण्यास भाग पाडून स्पिकरवरुन सुरु असलेले त्याच्या महिमामंडनाचे पोवाडे बंद पाडले. हा प्रकार सुरु असताना परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते, शिवाय या प्रकाराबाबत शहरातही वेगाने वार्ता पसरल्याने दुसर्या समाजातील हालचालीही वाढल्या होत्या. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेत पोलिसांनी संबंधित आयोजकांना कायद्याची भाषा सांगत पुन्हा वादग्रस्त पोस्टर लावू नये अशी तंबी दिली होती.

मात्र काही वेळातच काही धर्मांधांनी ती धुडकावून तासाभरातच पुन्हा टीपू सुलतानचे हटवलेले पोस्टर पुन्हा मूळजागी आणून लावले. या प्रकाराने संतप्त झालेल्या पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा इशारा देत समाजातील प्रतिष्ठीतांना या घटनेचे गांभीर्य सांगितल्यानंतर त्यांच्या शिष्टाईने आक्रमक असलेल्या ‘त्या’ टोळक्याला मंचापासून दूर हटवण्यात आले. त्यानंतर पोलिसांसमोर तेथील आयोजकांनी पुन्हा काढलेले पोस्टर लावणार नसल्याची हमी दिल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास शहरात निर्माण झालेला तणाव निवळण्यास सुरुवात झाली. मात्र या प्रकाराने शहरातील काही असामाजिक तत्व समाजातील सौहार्दाला नख लावण्याची संधी शोधत असल्याचेही उघड झाल्याने पोलिसांनी या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहून भविष्यात या ‘अशांत‘ टोळक्याकडून शहराची शांतता धोक्यात येणार नाही याची तजवीज करण्याची गरज आहे.

भारतीय इतिहासात औरंगजेब आणि टीपू सुलतान या दोन शासकांना अतिशय क्रूर आणि धर्मांध शासनकर्ते म्हणून ओळखले जाते. त्यांच्या राजवटीत भारतातील असंख्य हिंदू आणि इसाई धर्मियांचे जबरदस्तीने तलवारीच्या टोकावर धर्मांतरण करण्यात आले, ज्यांनी नकार दिला त्यांचा शिरच्छेद केला गेला. तर, महिला व मुलींवर अनन्वीत अत्याचार केले गेले. टीपूच्या मलबार आणि केरळच्या मोहिमांमध्ये असे शेकडो प्रकार घडल्याचे दाखले आहेत. त्याच्या सैन्याने हिंदू मंदिरे पाडली, त्यांची संपत्ती लुटली. केरळ आणि कर्नाटकात आजही त्याने उध्वस्त केलेल्या शेकडो मंदिरांचे भग्नावशेष त्याची साक्ष देत आहेत. केरळमधील नायर (हिंदू) समाजाचे सरसकट धर्मांतरण करण्याचे अथवा न ऐकणार्यास मृत्यूदंड देण्याचे त्याचे फर्मान आजही राष्ट्रीय अभिलेखागारात उपलब्ध आहे. असे असतानाही धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून त्याचे महिमामंडन करण्याचा प्रकार सामाजिक शांततेला ‘नख’ लावण्याचाच असून त्याकडे दुर्लक्ष न करता पोलिसांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

