स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीवर कोण बसणार? जिल्हा पोलीस दलातील अनेक निरीक्षकांच्या लागल्या खुर्चीकडे नजरा

नायक वृत्तसेवा, नगर
स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी असलेले अनिल कटके यांचा अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकाळ संपुष्टात आल्याने आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. निरीक्षक कटके यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये एलसीबीची सूत्रे हाती घेतली होती. मागील वर्षीच त्यांचा अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकाळ संपुष्टात आला होता; पण त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्यामुळे ते एलसीबीच्या निरीक्षकपदी कायम राहिले. त्यावेळी याठिकाणी येणार्‍यांचा हिरमोड झाला होता. यंदा मात्र एलसीबीच्या खुर्चीकडे जिल्हा पोलीस दलातील अनेक निरीक्षकांच्या नजरा आहेत. तसे त्यांनी वरिष्ठांकडे प्रयत्न सुरू केले आहेत.

जिल्हा पोलीस दलातील एलसीबी ही महत्त्वाची शाखा आहे. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल करण्याची जबाबदारी या शाखेवर असते. गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीकडून केला जातो. अहमदनगर एलसीबीने आत्तापर्यंत अनेक गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई, पुणे त्यानंतर जिल्ह्यातील शिर्डी, आश्वी आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात काम केलेले निरीक्षक कटके यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये एलसीबीची सूत्र घेतली होती. त्यावेळी अनेकांनी एलसीबीच्या निरीक्षकपदासाठी प्रयत्न केले होते.

परंतु ऐनवेळी निरीक्षक कटके यांच्याकडे एलसीबीची सूत्रे आली. त्यांनी दीड वर्षाच्या काळात अनेक गुन्ह्यांची उकल करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. गुन्हेगारी टोळ्यांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला. निरीक्षक कटके यांचा अहमदनगर जिल्ह्यातील चार वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षी संपुष्टात आला होता. त्यांनी एक वर्ष मुदतवाढीसाठी प्रयत्न केले. त्यांना मुदतवाढ मिळाली आणि एक वर्ष निघाले. आता मात्र त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे त्यांची अहमदनगर जिल्ह्याबाहेर बदली होणार आहे. त्यामुळे एलसीबीच्या निरीक्षक पदासाठी जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे निरीक्षक कटके यांनीही आणखी मुदतवाढ मिळविण्याठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे काम चांगले असल्याने कदाचित त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मात्र याठिकाणी येण्यासाठी अनेक इच्छुक असल्याने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. कटके यांना मुदतवाढ मिळती की त्यांची बदली होते याकडे लक्ष लागून आहे.

Visits: 18 Today: 1 Total: 118112

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *