कर्म सोडून देणे म्हणजे संन्यास नव्हे : डॉ.संजय मालपाणी ‘कर्माकडून कृतार्थतेकडे’चा भावस्पर्शी प्रवास; राजस्थान युवक मंडळाचे आयोजन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कर्म म्हणजे केवळ जगण्याची धावपळ नव्हे, कर्तव्य म्हणजे केवळ जबाबदारीची पूर्तता नव्हे; तर आपल्या वाट्याला आलेले प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करण्याची वृत्ती म्हणजेच कर्मयोग. कर्म करताना त्याच्या फळाची आसक्ती मनाला बांधून ठेवू नये आणि आपल्या प्रत्येक कृतीतून अंतःकरणातील ईश्वराशी संवाद साधत राहावे, हा संत ज्ञानेश्वर माउलींच्या ज्ञानेश्वरीतील कर्मयोगाचा गाभा आहे. याच अत्यंत सूक्ष्म आणि जीवनाला दिशा देणार्या विचाराचा रसाळ, अभ्यासपूर्ण आणि भावस्पर्शी उलगडा गीता विशारद् डॉ.संजय मालपाणी यांनी सोमवारी केला आणि ‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ या प्रवासात उपस्थित संगमनेरकरांना अंतर्मुख केले.

राजस्थान युवक मंडळाच्यावतीने आयोजित मनःशांती आणि जीवनविकास व्याख्यानमालेच्या तिसर्या पुष्पात डॉ.मालपाणी ज्ञानेश्वरीच्या तिसर्या व चौथ्या अध्यायाचे निरुपण करीत होते. यंदाच्या व्याख्यानमालेत भक्ती, ज्ञान आणि कर्म या जीवनाच्या तीन महत्त्वाच्या अंगांना स्पर्श करणारा विचारसोहळा रंगत असून, डॉ. मालपाणी यांच्या निरुपणाचा पहिला दिवस उपस्थितांसाठी अध्यात्मिक अनुभूती देणारा ठरला.

आपल्या निरुपणातून कर्मयोग समजावताना डॉ.मालपाणी यांनी कर्मापासून पळून जाण्याऐवजी कर्मातच साधना शोधण्याचा ज्ञानेश्वरीचा मार्ग स्पष्ट केला. माणसाच्या आयुष्यात कर्म अटळ आहे. श्वास घेतो तोपर्यंत काही ना काही कृती आपल्या हातून घडतच असते. प्रश्न कर्म करायचे की नाही, हा नसून कर्म कोणत्या भावनेने करायचे, हा आहे. स्वार्थ, अहंकार आणि फळाची अपेक्षा यापासून मुक्त होऊन कर्तव्यकर्म परमेश्वराच्या चरणी अर्पण करण्याची वृत्ती विकसित झाली, तर सामान्य कर्माचे रुपांतर कर्मयोगात होते, हा विचार त्यांनी अत्यंत सहजपणे श्रोत्यांसमोर मांडला.

ज्ञानेश्वरीच्या तिसर्या अध्यायात कर्मयोगाचा हा विचार माउलींनी विलक्षण जीवनस्पर्शी पद्धतीने मांडला आहे. कर्म सोडून देणे म्हणजे संन्यास नव्हे; उलट आपल्या वाट्याला आलेले कर्म निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष भावनेने करणे, हाच खरा संन्यासाचा अर्थ आहे. मनुष्याने आपल्या इंद्रियांना, मनाला आणि बुद्धीला योग्य दिशेने वळविले, तर संसारातील प्रत्येक व्यवहार साधनेचे माध्यम होऊ शकतो. घर, व्यवसाय, समाज, नाती आणि जबाबदार्या यांच्यापासून दूर जाण्यात अध्यात्म नाही; त्या सर्वांच्या मध्यभागी राहून अंतःकरणात ईश्वराला जागे ठेवण्यातच अध्यात्माचे खरे सौंदर्य आहे, अशी भावपूर्ण मांडणी त्यांनी केली.

याच विचाराला अधिक व्यापक आध्यात्मिक अर्थ देताना त्यांनी प्रारंभी केलेल्या प्रार्थनेतून कर्मयोगाची प्रत्यक्ष अनुभूतीच जणू उपस्थितांसमोर उभी केली. ‘कर प्रणाम तेरे चरणों में, लगता हूँ अब तेरे काज’ या भावनेतून आपले आजचे कर्म स्वतःच्या अहंकारासाठी नसून परमेश्वराच्या कार्यासाठी आहे, अशी अंतर्मनाची तयारी व्हावी, असा संदेश त्यांनी दिला. ‘मला शक्ती दे, मला ताकद दे; आजचे काम तुझ्या आज्ञेने करण्यासाठी मी निघालो आहे,’ हा भाव मनात असेल तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक कर्तव्य अधिक अर्थपूर्ण होते, असे त्यांनी सांगितले.

अंतःकरणात स्थित असलेल्या परमेश्वराने आपल्या मनाची बागडोर धरावी, चंचल मनाला सावध ठेवावे आणि वाईट वासनांचा उदय होताच अंतर्मनातील विवेक जागा व्हावा, ही प्रार्थनेतील भावना त्यांनी कर्मयोगाशी जोडली. कर्म बाहेर घडते; मात्र कर्मामागची भावना आत जन्म घेते. त्यामुळे बाह्य कृतीपेक्षा अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची आहे, हा विचार त्यांच्या निरुपणातून अधोरेखित झाला. ‘तू ही सर्वत्र व्याप्त हरी, तुझमें यह सारा संसार’ या भावनेतून प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे दर्शन घेण्याचा संदेशही त्यांनी दिला. आपले कर्तव्य किती मोठे आहे यापेक्षा ते कोणत्या भावनेने केले जाते, यावर त्याचे आध्यात्मिक मूल्य ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निरुपणादरम्यान ज्ञानेश्वरीतील ओव्यांना लाभलेली संगीताची सुरेल साथ वातावरणाला आणखी भक्तिमय करणारी ठरली. माउलींच्या शब्दांचा अर्थ, त्यातील भाव आणि त्यामागील जीवनदृष्टी यांची सांगड संगीताच्या माधुर्याशी घातली गेल्याने व्याख्यानाचे रुप केवळ बौद्धिक चिंतनापुरते मर्यादित राहिले नाही. उपस्थित भाविक जणू त्या ओव्यांच्या भावविश्वातच हरवून गेले होते. ज्ञानेश्वरीतील शब्द कानावर पडत होते, संगीत मनाला स्पर्श करीत होते आणि कर्मयोगाचा विचार अंतर्मनात रुजत होता. दोन दिवसांच्या या निरुपणमालेच्या पहिल्याच भागातच संगमनेरकर भाविक भक्तिरसात अक्षरशः चिंब न्हाऊन निघाले.

व्याख्यानमालेस राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष सागर मणियार, उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, शुभम राठी, दर्शन भंडारी, ओम इंदाणी आदींसह भाविक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे सचिव कृष्णा आसावा यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत सूत्रसंचालन व आभार मानले.

संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासात गौरवाने उल्लेख व्हावा, अशी ज्ञानरंजन आणि भक्तीची परंपरा राजस्थान युवक मंडळाने जपली आहे. दरवर्षी श्रावणमासात आयोजित होणारी ही व्याख्यानमाला संगमनेरकरांसाठी अध्यात्मिक आणि वैचारिक पर्वणी ठरते. यंदाच्या भक्तिरसपूर्ण सोहळ्याचा शुभारंभ कीर्तनचंद्रीका रोहिणी परांजपे यांच्या ‘विश्वस्वधर्मे सूर्यें पाहो’ या विषयावरील दोन दिवसीय भक्तिसोहळ्याने झाला. त्यानंतर सोमवार व मंगळवारी गीता विशारद् डॉ.संजय मालपाणी ज्ञानेश्वरीच्या तिसर्या व चौथ्या अध्यायाचे निरुपण करीत आहेत. भक्ती, ज्ञान आणि जीवनविचार यांची त्रिवेणी संगमनेरच्या सांस्कृतिक जीवनाला अधिक समृद्ध करणारी आहे.

