‘अखेर’ राजापूरकडे जाणार्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात! दैनिक नायकच्या वृत्ताचा परिणाम; महिन्याभरापासून सुरु होता नागरिकांना मनस्ताप..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात फोफावलेली अतिक्रमणं हटविल्यानंतर वाहतुकीसाठी अतिशय अडचणीचा ठरलेल्या आणि पावसाळ्यात अक्षरशः तळ्याचे रुप प्राप्त झालेल्या राजापूर रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त गवसला आहे. गेल्या महिन्याभरापासून या रस्त्याचा वापर करणार्या हजारों नागरिकांचा दररोज सुरु असणार्या मनस्तापाला गेल्या शनिवारी (ता.6) दैनिक नायकने वाचा फोडली. त्याची तत्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर भर घालून त्याची दुरुस्ती सुरु केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी या रस्त्याचे काम सुरु होताच अनेकांनी फोन करुन समाजाच्या प्रति बांधिलकी जोपासताना प्रसंगी कठोर आणि परखड भूमिका घेणार्या दैनिक नायकचे कौतुक केले आहे.
सुमारे महिन्याभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने अकोले नाक्याकडून राजापूरकडे जाणार्या रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात बोकाळलेली अतिक्रमणं हटविण्याची मोहिम राबवली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने पूर्वी रुंद असलेल्या या रस्त्याचा जीवच घोटला गेला होता. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कारवाईने अनेकांना दिलासाही मिळाला. अतिक्रमण हटवल्यानंतर पाडलेल्या घरांचा राडारोडा अनेक दिवस रस्त्यावरच पडून होता. त्यातच बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कडेला गटार व सांडपाणी वाहून जाण्याची सोय म्हणून मोठ्या प्रमाणात खड्डेही घेतले. त्याचे काम अपूर्ण असतानाच पावसाला सुरुवात झाल्याने या रस्त्याचे रुपांतर तळ्यात झाले. त्याचा परिणाम पाण्याखालील खड्डे, रस्त्यातच पडलेला राडारोडा यांचा अंदाज न आल्याने अनेक छोटे-मोठे अपघातही घडू लागले.
या रस्त्यावरुन दररोज ग्रामीणभागातील शेतकरी, नागरिक यांच्यासह विद्यार्थीही मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र अतिक्रमण मोहिमेनंतर या रस्त्यावर असंख्य खड्डेे, चढ व उतार तयार झाल्याने पाणी साचल्यानंतर वाहचनचालकांना त्याचा अंदाज येत नव्हता. परिणाम अनेकांच्या दुचाकी पडून दुखापत होण्याच्या घटनाही या कालावधीत समोर आल्या. याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी ‘गौणखनिज’ मिळत नसल्याने ठेकेदाराने काम थांबवल्याचे अजब उत्तर दिले. त्यामुळे नागरिकांचाही संताप झाला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दैनिक नायकने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून नागरी समस्येच्या या विषयाला शनिवारच्या अंकातून वाचा फोडली.
त्यानंतर जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारपासून हजारोंं नागरिकांच्या येण्याजाण्याच्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. अतिक्रमण आणि गटाराचे बांधकाम करताना अकोले रस्त्यापासूनच हा रस्ता फोडला जावून त्यातील डबर उचलण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याची खोली वाढल्याने त्यात पावसाचे पाणी साचून हा रस्ता एकप्रकारे ‘अपघात प्रवण‘ झाला होता. त्यामुळे बांधकाम विभागाने या रस्त्यावर भर घालून त्याला अकोले रस्त्याएवढी उंची दिली असून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर त्यावर खडीकरण व मजबुतीकरणाची कामे सुरु केली जाणार आहेत.
राजापूर पुलाच्या दुतर्फा असलेली बहुतेक अतिक्रमणं हटवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामापूर्वी गटाराचे काम सुरु केले. मात्र ते दीर्घकाळ रेंगाळल्याने पावसाचा हंगाम सुरु झाला आणि सगळे कामच ठप्प झाले. त्यामुळे या पुलाच्या सुरुवातीच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून त्याचे रुपांतर तळ्यात झाले. त्यातही या रस्त्यावरील गटाराच्या कामासाठी खड्डे खोदले गेल्याने त्यात पावसाचे पाणी साचून हा रस्ता धोकादायक बनला. त्यामुळे दररोज राजापूर, जवळेकडलग, पिंपळगांव कोंझिरा, वडगाव लांडगा, गणोरे, कळस येथून संगमनेरात येणार्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चालकांची कसरत सुरु होती.
सोबतच या पुलाचा वापर करणारी आणि दिवसभर शहराशी संलग्न असणारी मोठ्या संख्येतील मंडळी आसपासच्या ढोलेवाडी, राजापूर रस्ता, देवाचा मळा भागात रहाते. तसेच, असंख्य विद्यार्थी या रस्त्याचा वापर करुन शाळा-महाविद्यालयात जातात. त्यांनाही अर्धवट आणि खोदून ठेवलेल्या या रस्त्यावरुन प्रवास करावा लागत असल्याने त्यांना रोजच मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत होता. मात्र या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेला ठेकेदार गौणखनिज मिळत नसल्याची कारणं सांगत शांत बसून असल्याने नागरिकांना रोजच त्रास होत होता. मात्र दैनिक नायकच्या वृत्तानंतर आता या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडल्याने हजारों नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.