डॉक्टर पगडाल यांच्या शस्त्रक्रियेची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अतिशय दुर्मिळ अशा गुडघ्याच्या वाटीच्या दोरीच्या जखमेवर येथील प्रथितयश हाडतज्ज्ञ डॉ. सौरभ पगडाल यांनी डिसेंबर 2020 मध्ये शस्त्रक्रिया केली होती. त्याचा शोधनिबंध पबमेड (PUBMED) या अमेरिकास्थित आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नांदूर शिंगोटे येथील 50 वर्षीय शेतकर्‍याचा मोटारसायकलचा अपघात होऊन त्याचा गुडघा गंभीररित्या जायबंदी झाला. यामुळे त्याचा पाय गुडघ्यात वाकेनासा होऊन त्याला त्या पायावर भार देता येईनासा झाले. सूक्ष्म तपासणीअंती गुडघ्याचा वाटीची दोरीफाटली असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारच्या व्याधी खूप दुर्मिळ असतात. साधारणतः अशा प्रकारच्या जखमा जगात वर्षाकाठी केवळ दोन ते तीन जणांनाच होतात. तसेच यावर शस्त्रक्रियाही पुणे, मुंबई सारख्या शहरातच होत असतात. हा रुग्ण उपचारांसाठी कुटे हॉस्पिटलमध्ये आला असता डॉ. सौरभ पगडाल यांनी तपासणी केली. एमआरआय व इतर चाचण्या केल्यानंतर त्याच्या गुडघ्याच्या वाटीची दोरी फाटली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉ. पगडाल यांनी गुडघ्याचा वाटीची दोरी हाडाला परत पूर्वीसारखी दुर्बिणीद्वारे जोडून दिली. यासाठी डॉ. सोनाली कुटे व डॉ. प्रदीप कुटे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. हा रुग्ण आता परत पूर्वीसारखा चालू शकतो शेतात काम करू शकतो. अशा प्रकारच्या व्याधीवर शस्त्रक्रिया करणारे निष्णांत शल्यविशारद मोठ्या शहरातही अगदी बोटावर मोजण्या इतकेच आहेत. कुटे हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या शस्त्रक्रियेचा शोधनिबंध अमेरिकास्थित आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात येऊन डॉ. सौरभ पगडाल यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया कुटे हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप कुटे यांनी दिली आहे. तसेच आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, सीताराम राऊत, अजय फटांगरे, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक आदी मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Visits: 135 Today: 2 Total: 1590749

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *