वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षकाचे ‘विविध’ कारनामे चर्चेत! हुक्क्याच्या धाकावर लाखोंची वसुली?; बसस्थानक प्रकरणानंतर नवीन चर्चा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे केंद्रासह राज्य शासनानेही अंमलीपदार्थांचे विस्तारीत जाळे छेदण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला असताना सरकारच्याच खात्यातील एका दुय्यम अधिकार्याने त्याला सुरुंग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर येवून आता आठवडा उलटला आहे. एखाद्या ‘सुपारीबाजा’प्रमाणे वर्दीचा सपशेल दुरुपयोग करुन या महाभागाने तिघा खासगी इसमांसह आपल्या ‘प्रकटीकरण’ शाखेतील टोळीला सोबत घेवून पद्धतशीर षडयंत्र रचले. त्यात कासिफ कुरेशी या निष्पाप तरुणाला लक्ष्य करुन त्याला ड्रग्ज तस्करीत अटक केली. ‘त्या’ तरुणाच्या नशिबाने हा सगळा प्रकार ‘त्या’ उपनिरीक्षकाने गुन्हेगार भेटीचा ‘अड्डा’ बनवलेल्या बसस्थानकाच्या उत्तर प्रवेशद्वाराजवळील खासगी व शासकीय सीसीटीव्हीत कैदही झाला आणि त्या उपनिरीक्षकाची त्यावर नजर पोहोचण्यापूर्वीच पीडित तरुणाच्या पित्याने त्याची कॉपीही मिळवली. यासर्व गोष्टी खुद्द पोलीस अधिक्षकांना पुराव्यांसह पोहोचवण्यात आल्या, त्यावर त्यांनी तीन दिवसांत चौकशीचे आदेश दिले खरे, मात्र ते कोठे विरले हे अद्याप समोर आले नाही. यावरुन वरपासून खालपर्यंत सगळेच या उपनिरीक्षकाचे लाभार्थी तर नाहीत? अशी जोरदार चर्चा आता संगमनेरात सुरु झाली असून काही कट्ट्यांवर तर आकडेही सांगितले जात आहेत. त्यातच आता आठवड्यापूर्वीच कर्हेघाटातील एका नामचीन हॉटेलमध्ये ‘हुक्का’ पिणार्या शहरातील मोठ्या व्यापार्यांच्या आणि प्रतिष्ठीतांच्या सुमारे आठ मुलांना कारवाईच्या धाकाने लाखांना लुटल्याची नवी चर्चा समोर आली आहे. अल्पवयीन मुलांना गजाआड घालणे, कोठडीतील कैद्यांचा अमानवीय छळ करणे, अक्षरशः हाता-पायांना चटके देण्याचाही आरोप या उपनिरीक्षकावर आहे. मात्र ना अद्याप त्याचे निलंबन झाले, आणि ना त्याच्यावर गुन्हा दाखल करुन बसस्थानकावरील षडयंत्रामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलाबाबतच संशय निर्माण होवू लागला असून पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

एखाद्या हिंदी चित्रपटाच्या कथानकाला शोभावे अशाप्रकारे खाकीवर्दीत असलेला एखादा दुय्यम अधिकारी गुन्हेगारांशी हातमिळवणी करुन त्यांच्या ‘दूष्कृत्यां’च्या आड येणार्यांना कायदेशीर पद्धतीने बाजूला सारतो, प्रसंगी त्यासाठी कायदा आणि नियमांच्या ‘आयऽचा घोऽ’ झाला तरी चालेल. चित्रपटातील हा अधिकारी दुय्यम असला तरीही त्याचा हात मात्र खूप उंचापर्यंत असल्याने स्थानिक वरीष्ठही त्यापासून अंतर राखून राहतात. तसाच काहीसा प्रकार संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील ‘त्या’ वादग्रस्त पोलीस निरीक्षकाकडून गेल्या दीड वर्षांपासून सुरु असल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात बिंग फूटलेल्या या महाभागाच्या भयानक षडयंत्रातून उघड झाले. वर्दीत असूनही गुन्हेगारी कृत्य करणार्या या उपनिरीक्षकाने एका 27 वर्षीय तरुणाला चक्क ‘एनडीपीएस’ कायद्याखाली गोवण्याचा धक्कादायक प्रकार केला. या षडयंत्रात त्या अधिकार्याच्या अधिकाराखाली असलेल्या अप्रकट प्रकटीकरणच्या चौघा कर्मचार्यांसह तिघा खासगी इसमांचाही सहभाग असल्याचे उघड झाले.

या प्रकरणात फसवून अटक झालेल्या तरुणाच्या पित्याने सादर केलेल्या सीसीटीव्ही फूटेजमधून सूर्यप्रकाशाप्रमाणे अगदी स्वच्छ दिसावं असे षडयंत्र दिसून येते आणि त्याचा सूत्रधारही ‘तो’ वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षकच असल्याचेही स्पष्ट होते. या कारस्थानात त्याने 110 ग्रॅम एमडीचा वापर करुन प्रत्यक्षात 39 ग्रॅम एमडी बाळगल्याचाच गुन्हा दाखल केला. त्यासाठी त्याने आर्थिक तडजोड केल्याचाही आरोप आहे. असे असेल तर, बनावट कारवाईसाठी एमडी कोठून आणला? शिल्लक राहिलेला 71 ग्रॅम कोठे गेला? रचलेल्या षडयंत्रात ठरलेली ‘पूडी’ ठेवायचीच होती, तर मग त्याच्या वजनात घट का केली गेली, त्यासाठीही तडजोड झाली का?. या षडयंत्रात ‘त्या’ तिघा खासगी इसमांचा फक्त वापर करुन घेतल्याचे दिसून येते, मात्र त्याचा खरा ‘सूत्रधार’ पीडित तरुणाच्या येण्यापूर्वीपासून त्याला अटक होवून पोलीस ठाण्यात नेल्यानंतरही ‘अड्ड्या’वर ‘त्या’ तिघांसह उपस्थित असलेल्या उपनिरीक्षकाला का वाचवले जात आहे?

एकीकडे आपल्या मुलाला खोटे कारस्थान रचून खूद्द उपनिरीक्षकानेच त्याला गोवल्याचे ‘सत्य’ हातात घेवून अहिल्यानगर, श्रीरामपूरचे हेलपाटे मारुनही निराशा पदरी पडलेल्या पीडित तरुणाच्या पित्याला न्यायासाठी अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव दिसत असताना दुसरीकडे, या वादग्रस्त महाभागाचे एकसे बढकर एक किस्सेही आता शहरात चर्चिले जावू लागले आहेत. त्यातच आठवड्याभरापूर्वीच त्याने आपला खासगी पंटर ‘लल्लन’च्या खबरीवरुन ठरवून कर्हेघाटातील एका नामचीन हॉटेलवर आपल्या शाखेतील टोळीसह धाड घातली होती. यावेळी शहरातील काही मोठे व्यापारी, प्रतिष्ठीत पदावरील व्यक्तिंची सुमारे आठ तरुण मुलं फ्लेवर्ड हुक्का ओढताना पकडली गेली.

कायद्याचे अज्ञान, कारवाईची भीती आणि प्रतिष्ठेची चिंता यामुळे या तरुणांनी कारवाईचे निमंत्रण देणार्या ‘लल्लन’च्याच मध्यस्थीनेे गुन्हा दाखल करुन वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याच्या भीतीपोटी प्रत्येकी काही हजार याप्रमाणे लाखोंची तडजोड करुन प्रकरण जागीच संपवल्याचीही जोरदार चर्चा आता शहरातील कट्ट्यांवरुन सुरु झाली आहे. त्यात सध्या गणेशोत्सवाचा कालावधी असल्याने गल्ली-चौकातील मंडळांमध्ये तरुणांचा जमावडा होत आहे. त्यातून या चर्चांना असंख्य हातपायही फूटू लागले असून गेल्या दीड वर्षांपासून गुन्हे प्रकटीकरण शाखेला विळखा घालून बसलेल्या या शासकीय अजगराचे एकसे बढकर एक किस्से चव्हाट्यावर येत आहेत. त्यात गेल्या दीड वर्षात डझनावर दाखल झालेल्या अंमलीपदार्थांच्या प्रकरणांवरही आता नव्याने चर्चा सुरु झाली असून संगमनेरला ‘उडता पंजाब’ बनवण्याच्या दिशेने या महाभागाने पूर्ण तयारी केल्याचे धडधडीत वास्तव समोर आले आहे, मात्र त्या उपरांतही या दुय्यम अधिकार्याचे निलंबन होवून त्याच्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची गरज असताना जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करुन या प्रकरणातील मूळ डिजिटल पुरावे नष्ट करण्याची संधी उपलब्ध केली जात आहे. त्यातून जिल्हा पोलिसांच्या भूमिकेबाबतच संशय निर्माण झाला आहे.

मागील दीड वर्षांपासून संगमनेर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला विळखा घालून बसलेल्या या उपनिरीक्षकाकडे या दरम्यान दाखल झालेल्या प्रत्येक एनडीपीएस प्रकरणाचा तपास सोपवला गेला. प्रत्यक्षात मात्र या महाशयांनी अटक झालेल्या आरोपींकडून केवळ गुन्ह्यातील साखळीची नावे उगळली, त्यांच्यापर्यंत गुन्ह्याची झळ मात्र पोहोचू दिली नाही. उलट अटकेतील आरोपींचा अमानुष छळ करुन त्यांच्याकडून पुरवठादार आणि विक्रेत्यांची माहिती घेवून ‘मासिक हप्ते’ घालून शहरातील अंमलीपदार्थ्यांची तस्करी फोफावण्यासही हा अधिकारी पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप आणि त्याला पूरक असलेल्या वेगवेगळ्या चर्चा शहरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. पोलीस अधीक्षकांनी संगमनेर शहर पोलिसांची संपूर्ण लक्तरं वेशीवर येण्यापूर्वीच खाकीच्या वेशातील अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करुन योग्य संदेश देण्याची गरज आहे. अशा प्रकारातून पोलिसांच्या प्रतिमेवरच शिंतोडे उडत असल्याने त्यांच्याकडून या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जाईल अशी सामान्यांना अपेक्षा आहे, मात्र हताश झालेल्या पीडित तरुणाच्या पित्याने आता न्यायासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाची लक्तरं उधडली जातील त्यापूर्वीच वरीष्ठ अधिकारी योग्य कायदेशीर भूमिका बजावतील अशी आशा आहे.
