राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र संघाची उपांत्य फेरीत आघाडी! विविध पाच प्रकारांमध्ये सादरीकरण; रात्री घडते महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेच्या दुसर्‍या दिवसअखेर महाराष्ट्र संघाने चमकदारकामगिरी करून उपांत्य फेरीत भक्कम आघाडी घेतली आहे. 27 डिसेंबरपासून ध्रुव ग्लोबल स्कुलच्या क्रीडा संकुलात तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा सुरू आहे. देशातील 29 राज्यातील 789 योगासनपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राला प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील योगासन स्पर्धा आयोजित करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.

महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने उपांत्य फेरीत जोरदार आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल असणार्‍या तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, हरयाणा, कर्नाटक इत्यादी राज्यांच्या खेळाडूंमध्ये अंतिम फेरीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. योगासनांचे पारंपारिक (ट्रॅडिशनल) सादरीकरण, त्याचप्रमाणे संगीतमय कलात्मक (आर्टिस्टिक) सादरीकरण, तालात्मक (रिदमिक) दुहेरी सादरीकरण, सामूहिक सादरीकरण अशा एकूण पाच प्रकारांमध्ये या स्पर्धा होत आहेत. यातील बहुतेक सर्वच प्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या योगासनपटूंनी पहिल्या दोन दिवसांत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

नीटनेटक्या आयोजनामुळे ही स्पर्धा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. एकाचवेळी चार मंचावर वेगवेगळ्या गटांचे सादरीकरण केले जात आहे. परीक्षण करणार्‍या सर्व पंचांना अत्याधुनिक आणि वेगवान इंटरनेट यंत्रणा पुरविण्यात आली आहे. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या आवारामध्ये स्पर्धकांची स्वतंत्र निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 29 राज्यांमधून आलेले सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि पालकांनी येथील व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. खेळाडूंच्या व्यतिरिक्त 135 प्रशिक्षक, पंच आणि तांत्रिक जबाबदारी सांभाळणार्‍या 80 तज्ज्ञ व्यक्ती आणि शंभर पालक यांच्यासाठीही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

चारही मंचावरील अत्याधुनिक आणि आकर्षक ध्वनि-प्रकाश यंत्रणा स्पर्धेला संस्मरणीय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी ठरली आहे. दररोज दिवसभराची स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग, शिवकालीन शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके, प्रसिद्ध ढोल पथकाची प्रस्तुती इत्यादीमुळे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा देशभरातील खेळाडूंना माहीत होत आहे. शिर्डी येथील साईतीर्थ स्पिरीच्युअल थीम पार्कच्या विनामूल्य भेटीची व्यवस्था स्पर्धकांसाठी करण्यात आली आहे.

Visits: 190 Today: 4 Total: 1101031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *