झगडे फाट्यानजीक गोमांसाने भरलेला ट्रक सापडला
झगडे फाट्यानजीक गोमांसाने भरलेला ट्रक सापडला
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील चांदेकसारे परिसरातील झगडे फाट्यानजीक आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलिसांनी गोमांसाने भरलेला ट्रक ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना चांदेकसारे परिसरातील झगडे फाट्यानजीक एका बंद पडलेल्या ट्रकमध्ये गोमांस असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ त्यांनी पथकाला घटनास्थळी पाठविले असता त्यांना ट्रक (क्र.एमएच.13,आर.7319) हा उभ्या स्थितीत आढळून आला. परंतु चालक मात्र फरार झालेला होता. सदर ट्रकची तपासणी केली असता पोलिसांना प्राण्यांच्या मांसाचा वास आला. त्यांनी पोहेगाव येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत साखरे यांना तातडीने पाचारण केले असता ट्रकमध्ये गोमांस असल्याचे निष्पन्न झाले. तालुका पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुरनं.481/2020 नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व सुधारणा अधिनियम 5, 9 आणि भादंवि 429 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील साडेतीन टन वजनाचे 6 लाख 75 हजार रुपयांच्या गोमांसासह ट्रक ताब्यात घेतला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करत आहेत.