पांडुरंगा! अभंग तारलेस, पण जीवंतपणी देवत्त्वाचा शाप दिलास.. तुकोबारायांच्या जीवनचरित्रातून संगमनेर फेस्टिव्हलच्या प्रांगणात अश्रृंच्या धारा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तुकोबारायांचे जीवन, त्यांचे लेखन, त्यांच्या जीवानात घडलेल्या विविध घटनांना दिलेले चमत्काराचे स्वरुप हे सामान्यपणे सर्वांनाच माहिती आहे. परुतु, सध्याच्या बुद्धीवाद निर्मुलनाच्या काळात त्याचा अर्थ चमत्कारा ऐवजी रुपकात्मक पद्धतीने लावल्यास तुकोबारायांचा जीवनाचा सार समजेल. एकदा अशाश्वताला आधार मानण्याची मनाची सवय नष्ट झाली की अंतःकरण सुरक्षित राहाते. पण, त्यातला भवसागर आटला की मनाची अवस्था कशी होते याचे तुकोबारायांनी ‘आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदच अंग आनंदाचे॥’ असे वर्णन करताना भवसागर आटला तरीही मनातला डोह तोच राहातो, पण तो आनंदाचा डोह झालेला असे म्हटलं आहे. तुकोबारायांच्या गाथांना धार्मिक नजरेतून न पाहता तत्त्वज्ञानाच्या दृष्टीतून पाहिले तर त्यांचे तत्त्वज्ञान भौतिक शास्त्रातील सिद्धांतांशी जुळणारे आहे. प्रसिद्ध नाट्यकर्मी योगेश सोमण यांनी शनिवारी संगमनेर फेस्टिव्हलच्या मंचावर सादर केलेल्या ‘आनंदडोह’ या एकपात्री प्रयोगातून साक्षात तुकोबारायांनीच हा संदेश जनमनाला दिला. जवळपास दीडतास सुरु असलेला त्यांचा हा जीवनप्रवास श्रवतांना उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

नेपथ्य अथवा इतर कोणताही अभिनिवेश न बाळगता केवळ तुकोबारायांच्या जीवनाचा आशय आणि त्याची रसाळ, भक्तीपूर्ण आणि तरीही तत्त्वचिंतन करणारी अभिव्यक्ती त्यांनी अतिशय दमदारपणे वठवली. भौतिक शास्त्रातील एका सिद्धांतानुसार सृष्टीतील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू ही अखंड दिसली तरी असंख्य अणुंची बनलेली असते आणि त्यात आंतरिक ऊर्जा असते. या ऊर्जेचे प्रमाण माणसाच्या मानसिकतेशी जोडलेले असते. माणूस जितका सकारात्मक, जितकी त्याची प्रसन्नता, सौदर्य, मांगल्य, पावित्र्य या गोष्टींवर श्रद्धा असेल त्या प्रमाणात त्याच्या आंतरिक ऊर्जेचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव ठरतो. प्रयोग सुरु झाल्यानंतरच्या काही मिनिटांमध्येच अभिनेते योगेश सोमण हा कलाकार बाजूला जावून त्यांच्यात साक्षात तुकोबारायांचा संचार झाला होता.

गाथेचे कागद जेव्हा पाण्यावर तरले तेव्हा ‘तुकोबाची गाथा तरली’ असे म्हणतं इंद्रायणी काठी डोईवर गाथा घेवून शेकडो, हजारो वैष्णवांचा मेळा भरला होता. तेरा दिवसांच्या या आंदोलनातून विठू नावाचे मोती बाहेर पडले. ज्याला जसे आठवले, तसे कोणी एक, कोणी दहा, कोणी शंभर तर कोणी शहस्त्र अभंग कागदावर लिहून ते तुकाबारायांना द्यायला आले. हे सगळं दृष्य पाहून तुकोबाराय माऊलींना विचारतात ‘का हा चमत्कार केलात? का हे आंदोलन केले? माण्या एका हट्टासाठी मी जगद् माऊलीला कामाला लावले, कष्ट दिले. आमच्या गाथांची विजययात्रा इंद्रायणी काठी येवू लागली आहे. आमचा, माऊंलींचा जयघोष होतोय. लोकं पायावर डोकं ठेवण्यासाठी झुंबड करताहेत.’

‘पांडुरंगा! अभंग तारलेस, पण जीवंतपणी देवत्त्वाचा शाप दिलास आम्हाला. पायावरती लोकांची डोकी रगडून रगडून त्याचा दगडं झालाय रेऽ. आमच्याप्रमाणेच इतरांच्या मनातलाही ईश्वर जागा व्हावा यासाठी या अभंगाची, गाथेची निर्मिती झाली. लोकं या गाथेलाच ईश्वर मानायला, गाथेची पूजा करायला लागली आहेत. उद्या ही तिची मंदिरं उभी करतील, डोईवर घेवून नाचवतील, घनपाठी होतील. पण, स्वतःमधल्या पांडुरंगाला मात्र कोणीही ओळखणार नाही. ‘विठ्ठल विठ्ठल तो आपलाच। पांडुरंग पांडुरंग तो आपलाच रंग। आपलाचि आत्मा। देह मात्र मंदिर!’ हे अनुभवाने जाणणार नाहीत. सृष्टीतील सारी तत्त्व आपल्यात सामावून घेवून शितल होणार नाहीत. पांडूरंगा! मग आमचे येथे येण्याचे प्रयोजनच नष्ट होते. मग तुकाकाम नावाच्या एका शरीरामध्ये कोंबून न ठेवता आम्हाला आकाशा एवढा मोठा करं. देवळं बघण्याच्या दुर्भाग्यापेक्षा आम्हाला आकाशा एवढा मोठा करं. माऊली! आमच्या वैकुंठ गमनाचे वर्णन आम्हालाच करण्याचे भाग्य आज मिळतंय, समोरच्या आनंदडोहासह आता हा तुक्या लोकडोहात सामील होण्यासाठी आतूर झालाय..’


असं म्हणतं दीड तासांहून अधिक वेळापासून उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आपल्या अभिनयातून अक्षरशः खुर्चीत खिळवून ठेवत खळखळ रडायला लावणार्‍या तुकोबारायांच्या भूमिकेतील अभिनेते योगेश सोमण यांनी मंच सोडून आकाशाच्या दिशेने हात उंचावत प्रेक्षागारात प्रवेश केला तेव्हा साक्षात संतश्रेष्ठ तुकोबारायचं आपल्या समोर उभे ठाकले आहेत असाच भाव प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. अनेकांनी त्यांच्या चरणावर मस्तक टेकवून देहूतील समाधी दर्शनाची अनुभूतीही घेतली. सलग चाललेला हा कार्यक्रम संपल्यानंतरही प्रेक्षकांची तेथून बाहेर पडाण्याची मानसिकता नव्हती. अनेकांनी त्यांच्यासोब छायाचित्र काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या, त्यांनीही कोणालाही नाराज न करता प्रत्येकाला प्रेमाने आणि आदराने सन्मान देत अगदी सेल्फीही काढू दिल्या. त्यातून रंगमंचावर ते केवळ संतांच्या भूमिकाच वठवत नाहीत, तर सामान्या जीवनात त्या आचरणात आणण्याचाही त्याचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. या एकपात्री प्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलचा तिसरा दिवस तुकोबारायांच्या भक्तीरसात चिंबचिंब भिजला होता.

Visits: 20 Today: 1 Total: 115871

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *