साईनगरीत दहा दिवसांत ऑक्सिजन प्रकल्प, आरटीपीसीआर लॅब ः बगाटे तदर्थ समितीची मंजुरी; मान्यतेसाठी प्रस्ताव उच्च न्यायालयात पाठविला

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीच्या साईबाबा संस्थानने कोरोनाग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. दानशूरांच्या मदतीने शिर्डीत ऑक्सिजन प्रकल्प, आरटीपीसीआर चाचण्यांची सोय आणि रेमडेसिवीर इंजेक्शचीही उपलब्धता करून देण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसांत ही यंत्रणा उभी करून कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली. देवस्थानचा कारभार पाहणार्या तदर्थ समितीने याला मंजुरी दिली असून उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे मोठे देवस्थान असलेल्या शिर्डी संस्थानने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होती. या पार्श्वभूमीवर संस्थानने हे निर्णय घेतले आहेत. त्याची माहिती बगाटे यांनी दिली. साईबाबा संस्थानतर्फे साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि साईनाथ रुग्णालय अशी दोन हॉस्पिटल चालविण्यात येतात. कोरोनाच्या काळात सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र, चाचण्या करणारी यंत्रणा जिल्ह्यात अपुरी आहे. त्यामुळे आरटीपीसीआर लॅब उभारण्यासाठीचा निर्णय आम्ही घेतला आहे. ती लवकरच सुरू होईल, असे बगाटे म्हणाले.

याशिवाय ऑक्सिजन प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. यासाठी रिलायन्स उद्योग समूहाचे सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या अधिकार्यांनी प्राथमिक पाहणी केली. त्यानंतर आजच कंपनीने शिर्डीत ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात पुढाकार घेत असल्याचे कळविले आहे. आता पुढची जबाबदारी आमची आहे. संस्थानकडून येत्या दहा दिवसांत ऑक्सिजनचा प्लांट उभा केला जाणार आहे. त्यासोबतच एम्सच्या माध्यमातून आरटीपीसीआर लॅबही येत्या दहा दिवसांत उभारण्यात येणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.

याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठीही आमचे प्रयत्न आहेत. हैदराबाद येथील एका कंपनीने संस्थांनला थेट पुरठा करण्याची तयारी दर्शविली आहे. पुढील तीन दिवसांत हा पुरवठा सुरू होणार असून दर आठवड्याला तीनशे इंजेक्शन मिळणार आहेत. त्यामुळे शिर्डीचे कोविड सेंटर सर्वार्थाने अद्ययावत होणार आहे. देणगीदार आणि भक्तांच्या सहकार्यातून आम्ही हे करू शकत आहोत. यासाठी मदत करणार्या सर्वांचे संस्थान आभारी आहोत लोकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करून आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही बगाटे यांनी केले.
