एकलहरे परिसरात चोर्यांचे सत्र सुरूच स्प्रिंकलर पाईपची चोरी; शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रात चोर्यांचे सत्र सुरूच असून बुधवारी (ता.11) रात्री हनुमानवाडी येथून प्रगतिशील शेतकरी सागर जितेंद्र गिरमे यांच्या मालकीच्या शेतांतून दहा स्प्रिंकलरचे पाईप व अन्य साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हनुमानवाडी येथे गिरमे यांचे 18 एकर क्षेत्र असून त्यापैकी अडीच एकर सोयाबीनची लागवड येथील प्रगतिशील शेतकरी हरीश कुर्हे यांनी केली आहे. बधुवारी दुपारी कुर्हे शेतात सोयाबीनला पाणी लावायला आले असता त्यांना पाईप व अन्य साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आले. संपूर्ण शेतात पाईपचा शोध घेतला मात्र पाईप आढळून न आल्याने कुर्हे यांनी बेलापूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एकलहरे कार्यक्षेत्रात दोन महिन्यांपासून दर चार दिवसाला चोरट्यांचा धुमाकूळ चालू असून चोर्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पंधरवड्यात पत्रकार लालमोहंमद जहागिरदार यांच्या मालकीच्या शेतातून सहा स्प्रिंकलरचे पाईप व सामाजिक कार्यकर्ते विलास ठोंबरे यांच्या स्कॉर्पिओ गाडीच्या साहित्याची चोरी झाली होती. सदरील चोरी एका व्यक्तीने केली नसून गँगच सक्रीय झालेली दिसते. मागील चोर्यांचे तपास पोलीस यंत्रणेला लावता न आल्याने पोलिसांबद्दल परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे व चोरट्यांनाही पोलिसांचा धाक राहिला की नाही? असा प्रश्न परिसरातून उपस्थित होत आहे. परिसरात वारंवार अशा चोरीच्या घटना घडत असल्याने हे चोरटे भुरटे असून परिसरातीलच असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
एकलहरे कार्यक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ चालू आहे. पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी या भागात विशेष लक्ष देऊन चोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी तंटामुक्तीचे अध्यक्ष अन्सार आजम जहागिरदार, पत्रकार लालमोहंमद जहागिरदार, सरपंच पती अनिस जहागिरदार, सामाजिक कार्यकर्ते विलास ठोंबरे, उपसरपंच रमेश कोल्हे, माजी सरपंच संजय अग्रवाल यांच्यासह नागरिकांनी केली आहे.