पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय ‘साहित्य पुरस्कारां’ची घोषणा! विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश; रविवारी होणार पुरस्कारांचे वितरण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 120 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून देण्यात येणार्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. रमेश धोंगडे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मकरंद साठे (पुणे) याच्या गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी या कादंबरीस, विशेष साहित्य पुरस्कार नितीन भारत वाघ (नाशिक) यांच्या प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत या समीक्षा ग्रंथास दिला जाणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिली.
याशिवाय अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार अर्चना डावखर (नेवासा) यांच्या अधांतरीचे प्रश्न या कविता संग्रहास, अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार सुधाकर शेलार (अहमदनगर) यांच्या साहित्य संशोधन वाटा आणि वळणे या समीक्षा ग्रंथास देण्यात येणार असून, यावर्षीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील समाज प्रबोधन पुरस्कार लातूर येथील अतुल देऊळगावकर यांना, तर पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील नाट्य सेवा पुरस्कार पुणे येथील आशुतोष पोतदार यांना, आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार मुंबई येथील नंदेश उमप यांना देण्यात येणार असल्याचेही पुरस्कार निवड समितीच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले. कोविड संकटामुळे 2019 च्या पुरस्कारांचे वितरण मागील वर्षी होऊ शकले नव्हते. पुरस्कार देण्याची तीस वर्षांची परंपरा प्रवरा परिवाराने जोपासली आहे.
माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या उपस्थितीत रविवार दि.22 ऑगस्ट, 2021 रोजी प्रवरानगर येथे कोविड-19 च्या नियमावलींचे पालन करून छोटेखानी समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांसह राज्यातील इतर मान्यवर सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन समितीच्यावतीने सुरू असल्याचे निवड समितीचे सदस्य निमंत्रक डॉ. राजेंद्र सलालकर यांनी सांगितले. पुरस्कार निवड समितीमध्ये डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. एकनाथ पगार, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे व डॉ. राजेंद्र सलालकर यांनी काम पहिले.