तमाशा कलावंतांवर आली साफसफाई करण्याची दुर्दैवी वेळ! समनापूर येथील तमाशा फडाच्या मालकीन करताहेत साफसफाईचे काम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राला लोककलेची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. यामध्ये लोकनाट्य तमाशाचे सर्वात मोठे योगदान आहे. मात्र, गेल्या 40 वर्षांपासून घुंगराच्या बोलावर व ढोलकीच्या तालावर ग्रामीण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या तमाशा कलावंतांवर आता हातात झाडू घेवून साफसफाई करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. हे विदारक चित्र संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे पाहावयास मिळत आहे.

महाराष्ट्रात आजमितीला लहान-मोठे मिळून 130 तमाशा फड असून 4500 हून अधिक कलावंत यात तन-मन-धनाने काम करत आहेत. मात्र कोरोनामुळे अनेक लहान फडांचे अस्तित्व धोक्यात आले असून अनेक तमाशा कलावंतांच्या पदरी मिळेल ती नोकरी करण्याची वेळ आली आहे. समनापूर (ता.संगमनेर) येथील तमाशा कलावंत छबुबाई चव्हाण या सुप्रसिद्ध कलावंत असून लहान फडाच्या मालक देखील आहेत. गेली 40 वर्षे 35 कलाकारांना घेऊन त्यांनी आपला फड चालवला आणि कोरोना आल्यानंतर आर्थिक संकटामुळे फड बंद करून आज त्यांच्यावर हातात झाडू घेऊन साफसफाई करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

सासर्‍यांचा असलेला फड नवर्‍याचा निधनानंतर स्वतः सांभाळत गेली 40 वर्षे छबुबाई यांनी 35 कलाकारांना घेऊन तमाशा व्यवसाय सुरू ठेवला. मात्र अचानक कोरोनाचे संकट आले आणि लहान फड असल्यानं कलाकारांना देण्यास पैसे उरले नाही म्हणून छबुबाई चव्हाण यांना आज पोटासाठी चारचाकी वाहनाच्या दालनामध्ये सफाई कामावर जाण्याची वेळ आली आहे. यामुळे पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणार्‍या राज्यात लोककलावंत आजही उपेक्षित असून वेळीच मदत न मिळाल्याने अनेक कलावंत अडचणींचा सामना करत असल्याचे दिसत आहे. आगामी काळातही सरकारचे असेच दुर्लक्ष राहिले तर अनेक लहान तमाशा फड शोधून सापडणार नाही अशी शक्यता निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे.


आम्ही सरकारकडे अनेक दिवसांपासून मागणी करतोय. मात्र मदतीचं आश्वासन आजही पूर्ण झालं नाही. राज्यातील अनेक लहान फडातील कलावंत बेरोजगार झाले असून अनेकांनी मिळेल ते काम करण्याचा पर्याय निवडला आहे.
– रघुवीर खेडकर (अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य तमाशा फड चालक मालक संघटना)

Visits: 194 Today: 3 Total: 1107769

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *