9 ते 14 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात आजादी गौरव यात्रा ः पटोले लोकशाही व राज्यघटनेच्या रक्षणासाठी काँग्रेसची लढाई
नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वातंत्र्यप्राप्ती व स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीसाठी काँग्रेसने अत्यंत महत्त्वपूर्ण काम केले आहे. मात्र मागील आठ वर्षात धार्मिकतेच्या नावावर राजकारण सुरू असून देशाच्या लोकशाहीला व संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरात 9 ते 14 ऑगस्ट याकाळात आजादी गौरव यात्रा काढण्यात येणार असून लोकशाही वाचविण्यासाठीच पुन्हा एकदा काँग्रेसची लढाई सुरू असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले.
संगमनेरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विविध पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधीमंडळ घटनेते आमदार बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शहराध्यक्ष किरण काळे, बाबासाहेब ओहोळ, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, करण ससाणे, मधुकर नवले, संजय छल्लारे, विनायक देशमुख, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, दादापाटील वाकचौरे, डॉ. एकनाथ गोंदकर, संभाजी माळवदे, पंकज लोंढे, सोमेश्वर दिवटे, राहुल दिवे, रामहरी कातोरे, सुभाष सांगळे, निखील पापडेजा, गौरव डोंगरे, संतोष हासे आदी विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार पटोले म्हणाले, देशात बेरोजगारी व महागाईचा डोंब उसळला आहे. मात्र यावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकार विरोधकांवर सूड भावनेतून ईडीच्या कारवाया करत आहेत. ईडी व तत्सम केंद्रीय यंत्रणा या पूर्णपणे राजकीय उद्देशातून वापरल्या जात आहेत. ईडीचा धाक दाखवूनच भाजपाने शिवसेनेतील आमदार फोडले असून महाविकास आघाडी सरकार पाडले आहे.
तर आमदार थोरात म्हणाले, काँग्रेसला मोठ्या त्यागाचा व बलिदानाचा इतिहास आहे. काँग्रेस हा गोरगरीबांच्या शाश्वत विकासाचा विचार करणारा पक्ष आहे. अनेक संकटं आली तरीही काँग्रेसने सर्वधर्मसमभावाचा विचार सोडला नाही. ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती त्या देशामध्ये आता रॉकेटसारखे उत्पादन होत आहे हे सर्व काँग्रेसची देण आहे. मात्र सातत्याने भूलथापा देऊन खोटे बोलून भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. ईडीच्या कारवाया ह्या राजकीय हेतूने होत असून हे लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. अहमदनगर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून आजादी गौरव यात्रेनिमित्त प्रत्येक तालुक्यात पदयात्रा काढून काँग्रेसचा विचार हा घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसजणांनी सज्ज व्हावे असे सांगताना जिल्हा परिषद, पंचायत समिती व येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पदाधिकार्यांनी काँग्रेसचा विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.