… अखेर धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद! वारंघुशीमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश
नायक वृत्तसेवा, राजूर
अखेर अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील वारंघुशी येथील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. धुमाकूळ घालणार्या बिबट्याने आदिवासी शेतकर्यांना अक्षरशः जेरीस आणले होते. त्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी (ता.17) अखेर त्यास जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे.
वारंघुशी गावाच्या परिसरामध्ये बर्याच दिवसांपासून बिबट्याने आदिवासी शेतकर्यांच्या शेळ्या व गुरांना टार्गेट करत हल्ला चढविला होता. या बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्यांची पशुहानी झाल्याने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरु लागली होती. यासाठी गावातील एका समाजसेवकाने सातत्याने वन खात्याकडे पाठपुरावा केल्याने अखेर तीन दिवसांपूर्वी वारंघुशी गावाच्या बाहेर हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. त्यासाठी त्याला सावज म्हणून एक कुत्रे पिंजर्यात ठेवण्यात आले होते. अखेर रविवारी पहाटे पिंजर्यात हल्लेखोर बिबट्या जेरबंद झाला. हा बिबट्या जेरबंद झाल्याने बघ्यांची एकच गर्दी झाली होती.
दरम्यान, गावामध्ये बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती उपलब्ध होताच, पत्रकार वार्तांकनासाठी घटनास्थळी पोहोचले असता, वन विभागाच्या कर्मचार्यांकडून फोटो घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. या प्रकाराबद्दल नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला.