जोर्वेतील पशुपालक थोरातांच्या गायीने दिला तिळ्या वासरांना जन्म!
जोर्वेतील पशुपालक थोरातांच्या गायीने दिला तिळ्या वासरांना जन्म!
परिसरात कुतूहलाचे वातावरण; तिळे पाहण्यासाठी पशुप्रेमींची गर्दी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील जोर्वे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष तथा प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव थोरात यांच्या गायीने नुकताच तीन वासरांना जन्म दिला आहे. त्यामुळे परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी ही तिळे वासरे पाहण्यासाठी त्यांच्या घरी धाव घेतली आहे.
संगमनेर रस्त्यानजीक ज्ञानदेव थोरात यांची वस्ती आहे. त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करताना सहकाराबरोबर प्रगतिशील शेतकरी म्हणून लौकिक मिळवला आहे. याचबरोबर त्यांनी गायी व दूध धंद्यामध्ये चांगले यश मिळवले आहे. त्यांच्या गोठ्यात पाच गायी असून या समृद्ध परंपरेत एका लक्ष्मी गायीने तीन वासरांना जन्म दिल्याने हा मोठा योगायोग समाजला जात आहे. थोरात यांचे चिरंजीव अनिल थोरात हे शेतकी सहकारी संघात व्यवस्थापक म्हणून यशस्वीपणे पदभार सांभाळत असून असून सुनील हे चांगले व्यावसायिक आहेत. समृद्धता व सुसंस्कृत कुटुंबाची परंपरा जोपासताना या कुटुंबाने शेतीत कायम नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देत भरभराट निर्माण करणार्या या व्यवसायातून त्यांच्या गायीने तीन वासरांना जन्म दिल्यामुळे आणखी समृद्ध वाढली आहे. तर उपस्थित समर्थ, आराध्या, शौर्य, बालू या बालगोपाळांनी टाळ्यांच्या कडकडाटात वासरांचे स्वागत केले असल्याचे थोरात कुटुंबियांनी आवर्जुन सांगितले.
सदर बातमी जोर्वे परिसरात वार्यासारखी पसरताच अनेक बालगोपाळ व दुग्ध व्यावसायिकांनी हे तिळे वासरे पाहण्यास गर्दी केली. काळा व पांढरा रंग असलेल्या तीनही वासरांकडे पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये कुतूहल जाणवत होते.
अधिक मासाचा हा पवित्र महिना असून यामध्ये झालेली ही तिळे वासरे ही पूर्वपुण्याई आहे. त्यांचे आपण चांगले संगोपन करणार असून वासरांना गंगा, यमुना व सरस्वती अशी नावे दिली आहेत.
– ज्ञानदेव थोरात (पशुपालक, जोर्वे)