संगमनेरात पुन्हा मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल! पोलिसांकडून झाली कारवाई; दीड हजार किलो गोवंशाचे मांस हस्तगत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील सर्वात मोठा छापा पडल्यापासून बंद असलेल्या संगमनेरच्या गोवंश कत्तलखान्यातून पुन्हा एकदा गोवंशाच्या रक्ताचे पाट वाहू लागले आहे. मात्र संगमनेरात पुन्हा गोवंशाची कत्तल होवू न देण्याचा निर्धार केलेल्या पोलिसांनी याबाबतची माहिती मिळताच आज भल्या पहाटे भारतनगरमध्ये छापा घालत तब्बल 1 हजार पाचशे किलो गोवंशाचे मांस हस्तगत केले आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोघांना गजाआड करण्यात आले आहे, तर एकाने घटनास्थळावरुन धूम ठोकली आहे. या कारवाईने संगमनेरातील कसाई पुन्हा एकदा डोके वर काढीत असल्याचे दिसून आले असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गेल्या अडीच महिन्यापासून बंद असलेल्या भारतनगरमधील कत्तलखान्यांमध्ये गोवंशाची कत्तल होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली. त्याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी आपल्या पथकासह अफसर कुरेशी याच्या वाड्यावर छापा घातला असता मिळालेली माहिती सत्य असल्याचे पोलिसांना आढळले. यावेळी गोवंशाची कत्तल करणार्या दोघांना जागेवरच पकडण्यात आले तर एकजण भिंतीवरुन उडी मारुन पसार होण्यात यशस्वी झाला.
यावेळी पोलिसांनी कापलेल्या जनावरांचे संपूर्ण मांस जप्त करुन त्याची मोजदाद केली असता ते जवळपास 1 हजार पाचशे किलो भरले. खासगी वाहनातून नेवून जमिनीत खोलवर गाडून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणी पो.कॉ.सचिन उगले यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी संशयीत आरोपी अफसर उमर कुरेशी (वय 34, रा.भारतनगर), अनिस गुलामहैदर कुरेशी (वय 22, रा.मदिनानगर) व अब्दुलसमद जावेद कुरेशी (रा.भारतनगर) या तिघांवर भा.द.वी.कलम 269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 चे सुधारीत 1995 चे कलम 5 (अ), 5(क), 9(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पहिल्या दोन्ही संशयीतांना घटनास्थळावरुन अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी मात्र पोलिसांना पाहताच वाड्याच्या भिंतीवरुन उडी मारुन पसार होण्यात यशस्वी झाला. या कारवाईने गेल्या मोठ्या कालावधीपासून बंद असलेले शहरातील कत्तलखाने जागा बदलून सुरु करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दाखवून दिले असून त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
2 ऑक्टोबर रोजी संगमनेरातील याच भागात अहमदनगर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात 31 हजार किलो गोवंश मांसासह 71 जिवंत जनावरे आढळली होती. राज्यात सर्वात मोठ्या ठरलेल्या या कारवाईनंतर संतप्त झालेल्या संगमनेरातील हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनही केले होते. तेव्हापासून पोलिसांनी येथील कत्तलखान्यांबाबत कठोर भूमिका घेत या परिसरात सातत्याने गस्त वाढवल्याने व त्यातच ‘त्या’ कारवाईत गजाआड गेलेल्या कसायांना अद्यापही जामीन मिळालेला नसल्याने ते बंद असल्याचे दिसत होते. मात्र आज पहाटे पडलेल्या छाप्यातून याच परिसरातील काही कत्तलखान्यांच्या चालकांनी चालक, जागा आणि कत्तलीच्या वेळा बदलून पुन्हा एकदा आपले उद्योग सुरु केल्याचे समोर आले आहे.
अडीच महिन्यांपूर्वी भारतनगर परिसरातील आठ मोठ्या साखळी कत्तलखान्यांवर अहमदनगर पोलिसांचा छापा पडला होता. या कारवाईत पोलिसांनी अटक केलेल्या प्रमुख कसायांना अजूनही जामीन मंजूर झालेला नाही. त्यावेळी अटक झालेल्यांमध्ये या भागातील प्रमुख कत्तलखान्यांच्या मालकांचा समावेश असल्याने त्यानंतर आजवर त्या परिसरात गोवंशाची कत्तल पूर्णतः बंद असल्याचे समजले जात होते. मात्र पोलिसांनी आज भल्या पहाटे केलेल्या कारवाईतून कत्तलखान्याचे चालक, कत्तलीचे ठिकाण व नेहमीच्या वेळा बदलून गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरुच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे.