माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी सर केला सिंहगड! वयाच्या 73 व्या वर्षीही प्रचंड उत्साह; राजकीय धावपळीतही फिटनेसचा मंत्र..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजकारणातील धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वयाच्या 73 व्या वर्षी सिंहगड सर करुन नवा आदर्श घालून दिला आहे. पुण्यात राहणार्‍या आपल्या कन्येसोबत रविवारी (ता.14) त्यांनी पहाटेच गडाच्या दिशेने कूच केली. यावेळी त्यांची चपळाई आणि उत्साह पाहून गड चढणार्‍या तरुणांनाही त्यांचा हेवा वाटला. गड चढताना अनेक पर्यटकांनी त्यांच्याशी संवाद साधला, तर त्यांनीही हसतमुख चेहर्‍याने सर्वांचे अभिवादन स्वीकारले. थोरात यांनी गडावरील स्मृतीस्थळ, वाडा, मंदिर आणि मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा अवघड कडा आदी ठिकाणी जाऊन इतिहासाची अनुभूती घेतली.


केंद्रात भाजपच्या सत्ता उदयानंतर राज्यातील काँग्रेसची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. अशा कठीण काळात, अनेक बडे नेते सत्तेच्या हव्यासापोटी किंवा यंत्रणांकडून होणार्‍या चौकशांच्या दबावाखाली पक्ष सोडून जात होते. मात्र, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने बाळासाहेब थोरात यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली. त्यांनी पराभूत मानसिकतेतील तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरत काँग्रेसला नव्याने उभारी दिली. भाजपच्या राजकीय व्यूहरचनेला भेदून त्यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेतही मोलाची भूमिका बजावली, ज्यामुळे काँग्रेसला अडीच वर्षे सत्तेत सहभागी होता आले. या कामगिरीमुळे त्यांना त्यावेळी काँग्रेसचे ‘आधुनिक बाजीप्रभू’ म्हणून संबोधले गेले होते.


नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाला 356 वर्षे झाली असली तरी, सिंहगडाच्या प्रत्येक पायरीवर आजही त्यांच्या शौर्याची आणि निष्ठेची प्रचिती येते. पुरंदरच्या तहामुळे मोगलांच्या ताब्यात गेलेला हा किल्ला, जिजाऊसाहेबांच्या इच्छेनुसार परत मिळवण्यासाठी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपल्या लेकाचे लगीन बाजूला ठेवून ही मोहीम हाती घेतली होती. मोगली सरदार उदयभान राठोडशी लढताना त्यांची ढाल तुटली असतानाही, त्यांनी हाताला शेला गुंडाळून लढाई सुरु ठेवली. मात्र, उदयभान्याचा वार छातीत लागल्याने ते धारातीर्थी पडले. त्यांच्या या बलिदानाचे स्मरण आजही तमाम शिवभक्तांच्या अंगावर काटा आणते.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा सिंहगड प्रवास केवळ एक पर्यटन म्हणूनच नाही, तर तो आजच्या राजकारण्यांसाठी निरोगी राहण्याचा एक वस्तुपाठ आहे. दिवसभराची धावपळ, बैठका आणि जनसंपर्क यात मग्न असलेल्या आजच्या पिढीतील राजकारण्यांसाठी हा एक आदर्श संदेश आहे. शरीर तंदुरुस्त असेल तरच विचारांची धार टिकून राहते, हेच थोरातांनी आपल्या कृतीतून दाखवले आहे. वय केवळ आकडा असून, जिद्द आणि शिस्तबद्ध जीवनशैली असल्यास कठीण शिखरही सहज सर करता येते, हेच त्यांच्या सिंहगड मोहीमेतून दिसून येते.

Visits: 2 Today: 2 Total: 1858986

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *