गणोरे येथील अंबिका माता मंदिरातील दानपेटी फोडली अंदाजे पन्नास हजारांहून अधिक रकमेची चोरी; अकोले पोलिसांत गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील गणोरे येथील अंबिका मातेच्या मंदिरात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दानपेटी फोडली आहे. सकाळी मंदिर समिती विश्वस्त मंडळाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अज्ञात चोरट्यांनी अंबिका माता मंदिरासमोरील प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे नुकसान करत मंदिरातील तीन दानपेट्या कटरच्या मदतीने कापून दानपेटीत असलेले पैसे चोरले. तसेच मंदिराच्या मागील प्रवेशद्वाराचेही कुलूप तोडले. त्यादिवशी पावसाचा जोर अधिक असल्याने आणि अंधाराचा फायदा घेत हात साफ केल्याने भाविकांसह ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला आहे. यावेळी अंबिका माता देवस्थानचे अध्यक्ष रामनाथ दातीर, उपाध्यक्ष दत्तात्रय आंबरे, बाळासाहेब आहेर, अंबादास दातीर, अशोक आहेर, रामा आंबरे, भाऊसाहेब चव्हाण, मंदिराचे पुजारी घोसाळे बाबा आदी उपस्थित होते. मंदिराच्या आवारात सीसीटीव्ही अद्ययावत असण्याची नितांत गरज आहे. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली असल्याचे प्रथमदर्शनी समजते. ग्रामपंचायतने बसवलेल्या वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्हीत संशयित व्यक्ती, गाडी, अथवा हालचाली आढळून आल्या नाहीत. अंदाजे पन्नास हजारांहून अधिक रक्कम चोरी झाल्याची प्राथमिक माहिती विश्वस्त मंडळांकडून समजली आहे.
पोलिसांनी लवकरात लवकर या चोरीचा तपास करावा अशी मागणी भाविकांसह विश्वस्त मंडळ आणि गावकर्यांनी केली आहे. तसेच गावात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त सुरू करण्याची गरज आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस करत आहे.