शेतीच्या वादातून पोटच्या मुलांनी केली पित्याची हत्या! नेवासा तालुक्यातील कारेगाव येथील घटना; दोन्ही मुलांना अटक
नायक वृत्तसेवा, नेवासा
शेतीच्या वादातून एकाहत्तर वर्षीय शेतकर्याची त्याच्याच मुलांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. नेवासा तालुक्यातील कारेगाव येथे शुक्रवारी (ता.17) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मृताच्या दुसर्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.
लक्ष्मण दादा लोणारे (वय 71, रा. कारेगाव, ता. नेवासे) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी मृताची दुसरी पत्नी सुनीता ऊर्फ शालनबाई लोणारे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, लक्ष्मण लोणारे यांनी पंधरा वर्षांपूर्वी रांजणगावमध्ये जमीन खरेदी केली होती. पहिली पत्नी चंद्रकलाबाई व मुले भाऊसाहेब, अशोक यांच्यासह ते येथे राहत होते. दरम्यान, पत्नीशी वाद झाल्याने ते पुन्हा कारेगाव येथे राहण्यास आले. 2015 मध्ये त्यांनी आपल्याशी विवाह केला.
दरम्यान, शुक्रवारी (ता.10) लक्ष्मण लोणारे घोडेगाव येथे गेले असता, त्यांना वडाळा बहिरोबा येथे पहिली पत्नी चंद्रकला भेटली. शेतीचा वाद लवकरात लवकर मिटव, नाही तर तुला संपवून टाकीन, अशी धमकी तिने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, शुक्रवारी पहाटे मृत लक्ष्मण प्रातःविधीसाठी शेतात गेले, ते परत न आल्याने फिर्यादीने शोध घेतला असता, भाऊसाहेब लोणारे (वय 32) व अशोक लोणारे (वय 34) हे मक्याच्या शेतातून पळताना त्यांना दिसले. तसेच लक्ष्मण लोणारे यांच्या हातावर, डोक्यात व कपाळावर धारदार शस्त्राचे वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले.
नेवासा पोलिसांनी मृत लक्ष्मण लोणारे यांची मुले भाऊसाहेब व अशोक यांना ताब्यात घेतले आहे. माहिती समजताच पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पूर्वीही केली होती मारहाण..
पाच वर्षांपूर्वी लक्ष्मण लोणारे यांना चंद्रकलाबाई व तिच्या दोन्ही मुलांनी कारेगाव येथे येऊन शेतीच्या वादातून जबर मारहाण केली होती. हा वाद न्यायालयात सुरू आहे.