जायकवाडी लाभक्षेत्रातील शेतकर्यांचे कडा कार्यालयासमोर उपोषण महिनाभरात मुद्दे निकाली काढण्याच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित

नायक वृत्तसेवा, नेवासा
समर्पण फाउंडेशनच्यावतीने नेवासा तालुक्यातील जायकवाडी लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या होणार्या आर्थिक पिळवणूक आणि भ्रष्टाचार विरोधात सोमवारी (ता.20) जायकवाडीच्या औरंगाबाद येथील मुख्यालयी म्हणजेच कडा कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले. महिनाभरात मुद्दे निकाली काढण्याचे अधिकार्यांनी आश्वासन दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले.

यावेळी धरणग्रस्त शेतकर्यांना जायकवाडीचे पाणी मोफत मिळावे. शेतकर्यांकडून दिशाभूल करून लुटलेले पैसे शेतकर्यांना परत करावे. तसेच भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ही जुलै 2021 पासून प्रलंबित असलेली मागणी प्रामुख्याने करण्यात आली. त्याचबरोबर अधिग्रहित जमिनीचे पैसे शेतकर्यांना द्यावे, जायकवाडीच्या अतिरिक्त पाण्यामुळे नापीक झालेल्या जमिनी जायकवाडी प्रकल्प अधिग्रहित करून घेऊन शेतकर्यांना त्याचा मोबदला द्यावा, कर्तव्यात कसूर करणार्या नेवाशातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची तातडीने बदली करावी, औरंगाबाद येथील कार्यालयामध्ये असलेले लिपीक पंचमेढे हे शेतकर्यांची नेहमी अडवणूक करतात हे वेळोवेळी सिद्ध झालेले असून त्यांची त्वरीत शेतकर्यांशी संबंध येणार नाही अशा ठिकाणी बदली करावी किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, जायकवाडीच्या कुठल्याही कार्यालयात कर्मचारी व अधिकार्यांमध्ये शिस्त दिसून येत नाही, तसेच कार्यालयामध्ये फक्त एखादाच कर्मचारी नावाला उपस्थित असतो ही पद्धत बदलण्यासाठी बायोमेट्रिक सिस्टीम सुरू करावी, शेतकर्यांचे पाणी परवाने नूतनीकरण प्रक्रिया ही सुटसुटीत करून त्यात कुठल्याही पद्धतीचा आर्थिक व्यवहार होणार नाही याची काळजी घ्यावी व शिबिरे लावून शेतकर्यांना घरपोच नूतनीकरण करून द्यावे, नवीन पाणी परवाने वाटपासाठी साडेपाचशे हेक्टरचा परवाना शासनाकडून मंजूर करून घ्यावा, तसेच बाद झालेले व परावर्तीत करण्याजोग्या क्षेत्राचे पाणी परवाने इतर शेतकर्यांमध्ये वाटून द्यावे आदी शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.
![]()
शेतकर्यांच्यावतीने डॉ. करणसिंह घुले, रामराव भदगले, जगन्नाथ कोरडे, भानुदास मते, प्रशांत तनपुरे, मनोज तनपुरे, किशोर शिंदे, अंकुश शिंदे, अनिल तांबे, संदीप पटारे, रामकिसन तनपुरे, दीपक दरंदले, कैलास अढांगळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. तर जायकवाडीच्या वतीने आस्थापना अधीक्षक हिरे, कार्यालय अधीक्षक देसाई, भूसंपादन विभाग प्रमुख सवई यांनी सहभाग घेतला. प्रदीर्घ चर्चेनंतर सायंकाळी सात वाजता महिनाभरात सदर मुद्दे निकाली काढण्यासाठी मुदत देण्यावर आंदोलक राजी झाले. समन्वयाच्या व समजुतीच्या भूमिकेतून आंदोलकांनी महिनाभरासाठी आंदोलन स्थगित केले आहे.
