योगासन म्हणजे भारताने जगाला दिलेले रिटर्न गिफ्ट ः तांबे ध्रुव ग्लोबल स्कूल; राज्यस्तरीय योगासन अजिंयपद स्पर्धेचा शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
योगासन, आयुर्वेद आणि निसर्गोपचाराला हजारो वर्षांची परंपरा आहे. ब्रिटीशांनी आपल्याला क्रिकेटचा खेळ दिला, त्या बदल्यात भारताने योगासनांच्या माध्यमातून जगाला रिटर्न गिफ्ट दिले आहे. राज्य शासनाने योगासनांचा समावेश आता शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये केल्याने भविष्यात या खेळातून पुढे येणार्या विद्यार्थ्यांना मोठ्या संधी प्राप्त होतील. कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात संगमनेरचे मोठे योगदान आहे. डॉ. संजय मालपाणी यांनी योगासनांच्या माध्यमातून देशभरात मोठे काम उभे केले असून विद्यार्थ्यांमध्ये या खेळाविषयी आकर्षण निर्माण झाल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.

संगमनेरातील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये आयोजित चौथ्या राज्यस्तरीय योगासन अजिंयपद स्पर्धेचा शुभारंभ आमदार तांबे यांच्या उपस्थितीत झाला, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, तालुका अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडाधिकारी भाऊसाहेब वीर, असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीष मोहगावकर, सचिव राजेश पवार व स्पर्धा संयोजक महेश कुंभार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तांबे पुढे म्हणाले की, संगमनेरच्या शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक चळवळीला मालपाणी परिवाराने नेहमीच पाठबळ देण्याचे काम केले आहे. त्यातून घडलेले विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंनी संगमनेरचे नाव देशाच्या पटलावर पोहोचवले आहे. जे जे चांगले आणि उत्तम आहे ते देण्याचा प्रयत्न, त्यासाठी विविध स्पर्धा भरवणं, त्याला अधिष्ठान प्राप्त करुन देण्यासाठी संघटना चालवणं अतिशय कठीण काम आहे. मात्र मालपाणी परिवाराने आपले सामाजिक दायित्त्वपूर्ण करताना अशा वेगवेगळ्या उपक्रमातून समाजाला सतत काहीतरी देण्याचा प्रयत्न केल्याचे गौरोद्गारही आमदार तांबे यांनी यावेळी काढले.

जिल्हा क्रीडाधिकारी बिले यांनी गेल्या तीन वर्षांपासून योगासनांमध्ये महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीचा उल्लेख करीत आनंद व्यक्त केला. खेळात नैपुण्य प्राप्त केल्याने विविध संधी प्राप्त होत असल्याकडेही त्यांनी उपस्थित स्पर्धकांचे लक्ष वेधले. पूर्वी शासनाकडून खेळाडूंना फारशा सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगताना आज मात्र परिस्थिती बदलल्याने खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्तविक भाषणात डॉ. संजय मालपाणी यांनी योगासनांना खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यापासूनचा धावता आलेख मांडला. गेल्या तीन वर्षात झालेल्या तालुकास्तरापासून राष्ट्रीयस्तरापर्यंतच्या नऊ स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची यशोगाथा विशद् करताना राज्यातील शाळांमधून निवडलेले प्रतिभावंत खेळाडू, त्यांना मिळालेले प्रशिक्षण आणि प्रत्येक स्पर्धेत पंचांनी निरपेक्ष भावनेतून घेतलेले निर्णय यामुळे योगासनांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी खेलो इंडिया स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवणार्या योगपटू स्वरा गुजरने सर्व स्पर्धकांना शपथ दिली. यावेळी अक्षय बाहेती याने ध्येयगीत प्रस्तृत केले. या स्पर्धेतील सर्वात लहान वयाच्या अंश मयेकर (अहमदनगर) व रोहन तायडे (मुंबई) या दोघा योगासन खेळाडूंनी अतिशय अवघड आणि चित्तथरारक अशा योगासन प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर केले. नितीन सूर्यवंशी व सूचिता ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर महेश कुंभार यांनी आभार मानले.
