महसूल मंत्री थोरातांकडून निळवंडे डाव्या कालव्याची पाहणी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या आवश्यक सूचना

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरण कालव्यांच्या कामांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत गती दिली आहे. डाव्या कालव्याच्या 64 ते 70 किलोमीटर लांबीची पाहणी रविवारी (ता.13) महसूल मंत्र्यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर, काथरवाडी, लोहारे, मेंढवण या परिसरात विविध ठिकाणची पाहणी करत त्यांनी कामाचा आढावा घेतला. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, बेबी थोरात, बाबाजी कांदळकर, सचिन दिघे, सोपान जोंधळे, बाळासाहेब गायकवाड, रावसाहेब दिघे, रमेश दिघे, संपत काळे, निखील पापडेजा, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता गिरीश संघाणी, विवेक लव्हाट, उपकार्यकारी अभियंता प्रमोद माने, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.

निळवंडे धरण पूर्ण करुन या दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. 2022 मधील पावसाळ्यात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे या भागाला देण्यासाठी पूर्ण प्रयत्न असून त्यादृष्टीने काम अत्यंत वेगात सुरू आहे. 2014 पर्यंत धरण पूर्ण करुन कौठे कमळेश्वर, पिंपळगाव कोझिंरा, गणेशवाडी हे मोठे बोगदे मार्गी लावले. मात्र मागील पाच वर्षांत काम थांबले होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच 2019 मध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी निळवंडेच्या कामाची बैठक घेऊन कामाला गती दिली. जिथे दोन जेसीबी मशीन कार्यरत होते. तेथे आज 35 मशीन कार्यरत आहे. कोरोना संकटातही रात्रंदिवस काम सुरू आहे. अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवत कामाचा वेग कायम ठेवला आहे. अनेक ठिकाणी स्ट्रक्चरल कामेही पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून या भागात धरणाचे पाणी येईल तो आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण असेल असे महसूल मंत्री थोरात यांनी सांगून जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

Visits: 138 Today: 2 Total: 1098868

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *