पाटील! शिवसेनेच्या नादाला लागू नका! राऊतांचे शिर्डीतून विखेंना आव्हान; ‘त्या’ वक्तव्यावरुन साधला निशाणा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अनेक दारं बदलून तुम्ही आता भाजपच्या घरात आला आहात, ज्या दिवशी आमची सत्ता येईल त्या दिवशी आमच्या दारात असाल. निष्ठा काय असतात ते आम्हाला शिकवू नका, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. शिर्डीत शिवसेनेच्या (उबाठा) गटाने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलतांना त्यांनी मंत्री विखे-पाटील यांनी उबाठा गटाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा जोरदार समाचार घेत त्यांच्यावर जहरी टीका केली. ‘शिवसेनेच्या नादाला लागू नका, नाहीतर हा संजय राऊत इथे ठाण मांडून लढाई लढेल’ असे आव्हानही त्यांनी दिले. शिवसेनेने विजयापेक्षा पराभवच अधिक पचवले आहेत, वाईट काळ सर्वांच्याच जीवनात येतो आणि जातो असे सांगत त्यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींचा नामोल्लेख करुन त्यातून मोदी-शहा देखील सुटणार नसल्याचे भाकीतही वर्तवले. मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती असलेल्या या मेळाव्याला खासदार भाऊसाहेब वाकचौरे मात्र अनुपस्थित असल्याने कार्यक्रमस्थळावर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या होत्या.

शिवसेनेच्या (ठाकरे गट) अहिल्यानगर उत्तर विभागाने मंगळवारी शिर्डीत शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यासाठी खासदार राऊत यांच्यासह माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, आमदार सुनील शिंदे यांच्यासह पक्षाचे वरीष्ठ पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अहिल्यानगरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात उबाठा गटाच्या अस्तित्वावर शंका उपस्थित केली होती. शिर्डीतील मेळाव्याच्या पूर्वसंध्येलाच त्यांचे वक्तव्य समोर आल्याने खासदार राऊत त्यावर काय बोलणार याची सगळ्यांनाच उत्कंठा होती, ती मंगळवारी पूर्ण झाली.

आपल्या रोखठोक शैलीत बोलताना खासदार राऊत यांनी; ‘तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना पहिल्यांदा मंत्रीपदावर बसवणारी, एकाचवेळी बाप-लेकाला मंत्रीपद देण्याचा विक्रम करणारी शिवसेनाच आहे’ असे सांगत विखे-पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याला थेट हात घातला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील यांनी जेव्हा देशातला पहिला सहकारी कारखाना उभा केला, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपचा जन्मही झाला नव्हता. पंडित नेहरु देशाचे पंतप्रधान होते, इतकी अहसान फरामोश माणसं आहेत ही अशा शेलकी शब्दात शरसंधान साधताना त्यांनी आज हे महाराष्ट्र द्रोह्यांच्या, मराठी माणसाच्या मूळावर उठलेल्या भाजपच्या पालख्या वाहणारे उबाठा संपवण्याची भाषा करीत असल्याचा घणाघात केला.

अनेक आले आणि गेले मात्र शिवसेना हे चार अक्षर कायम राहील्याचे सांगत त्यांनी एखाद् दुसरा पराभव झाला म्हणून खचून जाणारा शिवसैनिक नसल्याचे सांगून मरगळलेल्या संघटनेत प्राण फूंकण्याचाही प्रयत्न केला. शिवसेनेने विजयापेक्षा अधिक पराभव पचवले आहेत, कधी विजय होतो, कधी पराभव, कधी सत्ता येते अन् जाते, वाईट काळ कोणावर येत नाही? असा सवाल करीत त्यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या नावांचे दाखले देताना मोदी, शहा आणि फडणवीसांनाही अशा प्रसंगाचा सामना करावा लागेल असे भाकीत वर्तवले. दरवेळी ‘मिंधे’ असा उल्लेख करणार्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यावेळी मात्र नाव घेत त्यांना तर वनवासात हिमालयाकडे जावे लागेल अशी भविष्यवाणीही त्यांनी वर्तवली.

सत्ताधार्यांच्या कारभारावर चौफेर आसूड ओढल्यानंतर पुन्हा मंत्री विखे-पाटील यांच्या वक्तव्यावर लक्ष केंद्रीत करीत खासदार संजय राऊत यांनी त्यांना थेट त्यांच्याच बालेकिल्ल्यातूनच; ‘शिवसेनेच्या नादाला लागू नका. नाहीतर हा संजय राऊत इथेच ठाण मांडून बसेल आणि दिल्लीतील लढाई लढेल’ असे जाहीर आव्हान देत तुम्ही तुमच्या लाचारीचे काम सुरु ठेवा, हा महाराष्ट्र आहे हे विसरु नका असा सल्ला देण्यासही ते विसरले नाहीत. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनीही राज्य व केंद्र सरकारवर टीका करुन मातोश्रीशी निष्ठा बाळगणार्या सैनिकांमध्ये ‘जोश’ भरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या आव्हानाचा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील कोणत्या शब्दात समाचार घेतात हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्यात राजकीय पडझड झाल्यानंतरही शिर्डी लोकसभा मतदारसंघाने उद्धव ठाकरेंना पाठबळ देत भाऊसाहेब वाकचौरे यांना दुसर्यांदा संसदेत पाठवले. त्याच वाकचौरेंच्या गृहशहरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात मुंबई, छत्रपती संभाजीनगरचे आजी-माजी खासदार-आमदार उपस्थित राहीले, मात्र खुद्द शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे गायब असल्याने वेगळीच चर्चा रंगली होती. त्यातच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘ते जाणारच आहेत, त्यांनी जाऊ नये..’ असे काहीसे संभ्रमीत वक्तव्य करुन खासदार वाकचौरे यांच्या पक्षांतराच्या चर्चेंला हवा दिल्याने दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात त्यांची अनुपस्थिती चर्चेचे कारण ठरली होती.

