शिर्डी नगरपंचायतच्या कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन रखडले ठेकेदाराने वेळेवर वेतन देण्याची कर्मचार्यांच्या कुटुंबियांची मागणी
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी नगरपंचायतकडील कंत्राटी सफाई कामगारांचा मागील डिसेंबर महिन्यातील पगार अजूनही झाला नाही. दुसरा महिना भरत आल्याने या कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. साई संस्थान प्रशासनाकडून स्वच्छतेपोटी नगरपंचायतीस दरमहा रक्कम जमा करण्यात येत असल्याचे संस्थान प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तरी देखील वेळेवर पगार मिळत नसल्याने कामगारांच्या न्याय हक्कावर गदा येत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे ठेकेदाराने पगार वेळेवर द्यावा, अशी मागणी कर्मचार्यांच्या कुटुंबातील महिलांंनी केली आहे.
शिर्डी नगरपंचायतीस स्वच्छ शहराचा दोन वेळा 15 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी या स्वच्छता कर्मचार्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कोविड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता या कर्मचार्यांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान दिले आहे. तर याच काळात या कर्मचार्यांचे 40 टक्के वेतन कपात करून इमानदारीने काम करणार्या या खर्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्याऐवजी एकप्रकारे खच्चीकरण केल्याचा आरोप कामगारांच्या कुटुंबातील महिलांनी केला आहे. ‘सोडलं तर पळतंय आणि धरलं तर चावतंय’ अशी अवस्था या कामगारांची झाली असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत बीव्हीजी कंपनीचे व्यवस्थापकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्हाला शिर्डी नगरपंचायतकडून डिसेंबर 2020, जानेवारी 2021, फेब्रुवारी 2021, मार्च 2021, एप्रिल 2021, त्याचबरोबर डिसेंबर 2021 या सहा महिन्यांचे वेतन मिळाले नाही. तरी सुद्धा कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी आम्ही कंपनीकडून वेतन करण्याचा प्रयत्न केला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार साई संस्थान प्रशासनाकडून शिर्डी नगरपंचायतीस स्वच्छतेपोटी दरमहा देण्यात येणारी रक्कम वेळेवर जमा करण्यात येत असल्याचे संस्थान प्रशासन अधिकारी वर्गातून सांगितले आहे. मग शिर्डी नगरपंचायत ठेकेदाराला दरमहा पेमेंट देण्यासाठी विलंब का करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागे तीन महिन्यांचा थकीत पगार तातडीने अदा करावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा नगरपालिका कामगार यूनियनच्यावतीने कामबंद आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यामुळे शहरात साफसफाईचे सर्व काम ठप्प होते. स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीने तत्काळ कर्मचार्यांना तीनही महिन्यांचे वेतन अदा करण्याच्या सूचना दिल्यानंतर कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर मध्यंतरी वेळेवर पगार केले. परंतु दोन ते तीन महिने उलटले की, पुन्हा जैसे थे अशी अवस्था होत असल्याने कामगार हतबल झाले आहेत. या कामगारांना आता कोणी वाली राहिला नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.