अखेर पिंपरकणे पूल सर्वसामान्यांसाठी झाला खुला! पुलामुळे आदिवासी ग्रामस्थांचा मोठा फायदा ः डॉ. लहामटे

नायक वृत्तसेवा, अकोले
२००६ साली मंजूर झालेला पिंपरकणे पूल अखेर सर्वसामान्यांच्या स्वागतासाठी खुला झाला आहे. अवघ्या ५६० मीटरचा पूल पूर्ण होण्यासाठी तब्बल १७ वर्ष लागली. अखेर बुधवारी (ता.८) या पुलाचं काम पूर्ण होऊन अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. या पुलामुळे आदिवासी डोंगराळ भागातील २५ गावांचा फायदा होणार असून ६० किलोमीटरचा प्रवास वाचणार आहे.

अकोले तालुक्यातील राजूर ते पिंपरकणे येथील पुलाचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला. २००६ साली मान्यता मिळलेला हा पूल पूर्ण होण्यास २०२३ उजाडलं असून आदिवासी भागासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा ठरणारा आहे. आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आलं आहे. कार्यक्रमानंतर आमदार लहामटे यांनी आनंदोत्सव साजरा करत आदिवासी गीतावर ठेका धरला. तब्बल सतरा वर्षांनंतर सतरा गावांतील रस्त्याची समस्या सुटल्याने आदिवासी बांधवांनी देखील आनंदोत्सव साजरा केला. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाची प्रतीक्षा होती. तब्बल १७ वर्षांचा कालावधी पूल तयार होण्यास लागली. यानंतर हा पूल सर्व सामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे.

आजूबाजूच्या आदिवासी भागात आरोग्य व्यवस्थेची कमतरता असल्याने या पुलामुळे आदिवासी ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे. अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना आता शाळेपासून वंचित राहावे लागणार नाही असे मत आमदार लहामटे यांनी व्यक्त केले. प्रवरा नदीवरील निळवंडे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये २०० फूट उंची असणार्या या पुलामुळे परिसरातील पर्यटन सुद्धा वाढणार असून या पुलावरून सनरेज आणि सनसेट पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर होणार..
पिंपरकणे पूल हा अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत होता. २२ ते ३५ गावांना आजमितीस रंधा मार्गे यावे लागते. ते अंतर आता फक्त पाच किलोमीटर होणार आहे. हा पूल अनेक गावांना राजूर बाजारपेठेजवळ आणणार आहे. आदिवासी समाजातील अनेक गांवाची मुख्य बाजारपेठ ही राजूर असून शेतमाल विक्री व खरेदी यासाठी शेतकरी वर्गास मोठ्या अडचणी सहन कराव्या लागतात. याच कारणाने हा पूल महत्वाचा आहे. मात्र आता या पुलामुळे सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
