संतापजनक ः मुंबईमध्ये चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार! बलात्कारानंतर प्लास्टिकच्या पिशवीत टाकून फेकले रस्त्यावर

मुंबई, वृत्तसंस्था
मुंबई उपनगरातील वसईत बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. एका चार वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून 34 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. क्रौर्याचा कळस म्हणजे अत्याचारानंतर मुलगी मृत पावल्याचं समजून या नराधमाने तिला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून रस्त्यावरच टाकून दिलं. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं. तर आरोपीलाही माणिकपूर येथे बेड्या ठोकल्या. त्याच्यावर बलात्कार, अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांताक्रूझ येथील रहिवासी असलेला आरोपी हा अंधेरी येथील खासगी कंपनीच्या कर्मचार्‍यांना ने-आण करणार्‍या बसवर चालक आहे. वसईहून तो कर्मचार्‍यांना घेऊन येत असे. खासगी ऑपरेटरची ही बस सहसा भाईंदर (पश्चिम) मधील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे उभी केली जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसपासच्या झोपडपट्टीतील मुले उभी केलेल्या बसमध्ये खेळण्यासाठी गेली. त्यावेळी बसचा चालक एका सहकार्‍यासह तेथे मद्यपान करत बसले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चालक वसईकडे जाण्यासाठी निघाला.

बस सुरू झाल्यानंतर काही मुले बसमधून खाली उतरली. मात्र चार वर्षांची मुलगी बसमध्येच झोपल्याने तिला बसमधून उतरता आले नाही. यावेळी इतर मुलांनी आरडओरड करण्यास सुरूवात केल्यानंतर चालकाने मुलीसह तेथून पळ काढला. चालकाचा शोध घेण्यासाठी मुलीच्या आईने भाईंदर पोलिसांकडे धाव घेतली. परंतु चालकाने बस दुसर्‍या ठिकाणी उभी करत त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलगी ओरडत असल्याने त्याने तिच्या गळा दाबला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे, असा समजून मुलीला एका बसमध्ये पडलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकले आणि वसईच्या फादरवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ ती पिशवी फेकून दिली. त्यानंतर चालकाने तेथून पळ काढला.

रस्त्यावरून जाणार्‍या एका व्यक्तीला त्या पिशवीत हालचाल झाल्याचं दिसून आलं. तो त्या पिशवीजवळ गेला. त्यानंतर पिशवीत मुलगी असल्याचं पाहून त्याने स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या मुलीला जवळच्याच एका स्थानिक रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भाईंदर पोलिसांनी वालई पोलिसांच्या मदतीने चालकाला वसई येथून अटक केली. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्यावेळी चालक दारूच्या नशेत होता तसेच तो त्या मुलीला ओळखत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visits: 18 Today: 1 Total: 116257

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *