उच्चशिक्षित महाभागाची डिजिटल ‘विकृती’ सायबरच्या जाळ्यात! संगमनेर तालुक्यातील मांडव्यातला प्रकार; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरीसह शुभेच्छापत्रे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वाक्षर्यांसह हुबेहूब अधिकृत ‘लेटरहेड’ तयार करुन, एका महाभागाने चक्क स्वतःच स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा अत्यंत हास्यास्पद आणि तितकाच कायदेशीरदृष्ट्या गंभीर प्रकार संगमनेर तालुक्यातून समोर आला आहे. सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत आपला दबदबा निर्माण करण्याच्या नादात, मांडवे बुद्रुक येथील 24 वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने थेट देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयाची बनावट पत्रे व्हायरल केली. मात्र, बड्या नावांच्या आडोशाने मिरवण्याचे हे वेड आपल्याला थेट गजाआड घेऊन जाईल, याची त्याला पुसटशी कल्पनाही नसावी. अहिल्यानगरच्या सायबर पोलिसांनी या व्हायरल वेड्याची माहिती दिल्यानंतर घारगाव पोलिसांनी त्याला बेड्याही ठोकल्या आहेत. मात्र त्याने आपल्या नावासमोर नीलेश लंके प्रतिष्ठानचा उल्लेखही केल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.

शनिवारी (ता.30) सोशल माध्यमातील इन्स्टाग्रामवर एकाएकी काही पत्र झळकली, जी पाहून ती पाहणार्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आणि जिल्हा पोलिसांचे मात्र धाबे दणाणले. कथित ‘नीलेश लंके प्रतिष्ठान’शी संलग्न असल्याचा दावा करणार्या विश्वजीत विजय धुळगंड या तरुणाचा शनिवारी 24 वा वाढदिवस होता. या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याने आपल्या मोबाईलमधील ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करुन थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत लेटरहेडचे आणि राष्ट्रीय चिन्हाचे हुबेहूब प्रारुप तयार केले. इतकेच नव्हे तर, या नेत्यांच्या हुबेहूब स्वाक्षर्यांचा वापर करुन, ‘माझ्या प्रिय विश्वजीत, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, तुझे आयुष्य सुख-समृद्धीने जावो..’ अशा आशयाचे प्रेमळ संदेश स्वतःच टाईप केले आणि ते आपल्या इन्स्टाग्राम आयडीवरुन सर्वत्र प्रसारित केले.

मांडव्यासारख्या ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य तरुणाला थेट देशाच्या पंतप्रधानांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक पत्र पाठवून शुभेच्छा दिल्याची बातमी वार्यासारखी पसरली. ग्रामीण भागात या पत्राची कौतुकाने चर्चा सुरु असतानाच, पोलिसांची गुप्तचर यंत्रणा आणि सायबर सेलही ‘त्या’ भाग्यवान व्यक्तिला जाणून घेण्यासाठी आणि या पत्रांची सत्यता पडताळण्यासाठी कमालीची उत्सुक झाली. मात्र, सायबर पोलिसांनी जेव्हा या पत्रांचे तांत्रिक विच्छेदन केले, तेव्हा हा सर्व प्रकार कोणत्याही शासकीय कार्यालयातून नव्हे, तर ‘एआय’ महाराजांच्या कृपेने डिजिटल लॅबमध्ये शिजलेला बनाव असल्याचे उघड झाले. देशाच्या सुरक्षेशी आणि प्रतिष्ठित पदांशी निगडित असलेल्या या गंभीर प्रकरणाची कुणकुण लागताच, सायबर पोलिसांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांना याची माहिती दिली.

पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून रविवारी (ता.31) घारगाव पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात यांच्या पथकाने वेगाने चक्र फिरवून दुपारी तीनच्या सुमारास आरोपीचा माग काढत त्याला मांडवे बुद्रुक येथून ताब्यात घेतले. मात्र, नियंत्रण कक्षापासून ते घारगाव पोलिसांपर्यंत सारी कसरत होऊन प्रत्यक्षात गुन्हा दाखल होण्यासाठी मात्र तब्बल 20 तासांचा कालावधी लोटल्याने, राजकीय दबाव किंवा अंतर्गत संशयाची मोठी राळ उठली. आरोपीने स्वतःच्या नावासोबत ‘नीलेश लंके प्रतिष्ठान, मांडवे बु.’ असा उल्लेख केल्यामुळे, राजकीय दबावापोटी पोलीस कारवाई लांबणीवर पडली की काय, अशी जोरदार चर्चाही सुरु झालीहोती.

सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचे प्रकरण पूर्णपणे तांत्रिक पुराव्यांवर आधारित होते. त्यातच समोर आलेला आरोपी वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी असल्याने, केवळ घाईगडबडीत केलेल्या कारवाईमुळे त्याच्या शैक्षणिक करिअरचा आणि भविष्याचा सत्यानाश होऊ नये, यासाठी पोलिसांनी अत्यंत सावधगिरी बाळगली. सर्व डिजिटल आणि तांत्रिक पुरावे भक्कम असल्याची खात्री पटल्यानंतर आज (ता.1) सकाळी त्याच्यावर प्रत्यक्ष गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत, समाजात आणि मित्रांमध्ये स्वतःचे मोठे वजन आणि उच्चपदस्थांशी संबंध असल्याचे खोटे प्रदर्शन मांडण्याच्या विकृतीतूनच त्याने हा अचाट उद्योग केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून, त्याने अशा प्रकारच्या बनावट पत्रांचा वापर करुन यापूर्वी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा सखोल तपास सुरु केला आहे.

संगमनेर तालुक्याला अशा प्रकारे बनावटगिरी करुन प्रशासनाला आणि समाजाला थक्क करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी संगमनेर शहरातील एका महाभागाने तर आपण थेट राष्ट्रपतींकडून नियुक्त राज्यसभेचे खासदार असल्याचा बनाव रचला होता. त्याने हुबेहूब शासकीय लेटरहेड तयार करुन स्थानिक वरिष्ठ अधिकार्यांनाच राजशिष्टाचाराचे खडे बोल सुनावले होते. त्या प्रकरणाची चर्चा थंडावते न थंडावते, तोच दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील भोजापूरचा रहिवासी दत्तात्रय केशव गुंजाळ (वय 53) याने चक्क मुख्यमंत्र्यांचा ‘विशेष सल्लागार’ असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करुन विधीमंडळातील दोन लिपिक आणि चार मदतनिसांच्या मदतीने प्रेक्षक गॅलरीच्या पासचा मोठा बाजार मांडला होता, ज्यातून विधीमंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. या दोन्ही जुन्या प्रकरणांनंतर आता या तिसर्या प्रकरणाचीही त्यात भर पडली असून, यात मानसिक प्रतिष्ठा मिळवण्याची विकृतीचा वापर झाल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे.

या संपूर्ण प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद अशोक गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, आरोपी विश्वजीत विजय धुळगंड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 319(2), 336(2)(3), 340(2) तसेच, भारतीय चिन्हे व नावे (अनुचित वापर प्रतिबंध) अधिनियमाचे कलम 3 व 5 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोशल मीडियावरील सामान्य नागरिकांची दिशाभूल, फसवणूक आणि राष्ट्रीय चिन्हांचा अवमान केल्याच्या आरोपाखाली अबालवृद्धात चर्चेत आलेला हा तरुण आता गजाआड गेला असून, घारगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणाने केवळ संगमनेरच नव्हेतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुक्यात लागोपाठ घडलेल्या तिन्ही घटनांचे विश्लेषण केल्यास धक्कादायक वास्तव समोर येते. भोजापूरच्या दत्तात्रय गुंजाळ याने आर्थिक लाभासाठी आणि फसवणुकीसाठी खोटे दस्तऐवज तयार केले होते, त्यामागे त्याचा गुन्हेगारी हेतू होता. मात्र, स्वतःला राज्यसभा सदस्य म्हणवून घेणारा ‘तो’ आधीचा महाभाग असो, की आता ए.आयचा वापर करुन स्वतःलाच पंतप्रधानांकडून शुभेच्छा देणारा मांडव्यातील हा तरुण असो; या दोन्ही प्रकरणांमध्ये कोणताही थेट आर्थिक फायदा मिळवण्याचा हेतू नव्हता. हा प्रकार निव्वळ मानसिक विकृती, आभासी दुनियेतील ‘लाईक्स’ आणि समाजात खोटा ‘दबदबा’ निर्माण करण्याच्या वेडापाई घडलेला प्रकार आहे. आजची तरुणाई ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) सारख्या क्रांतीकारी तंत्रज्ञानाचा वापर स्वतःचे ज्ञान वाढवण्यासाठी व करिअर घडवण्यासाठी करण्याऐवजी, अशा कायद्याच्या कचाट्यात फसवणार्या कृत्यांसाठी करत आहे. तंत्रज्ञान प्रगतीचे साधन आहे, विनाशाचे नाही. कोणत्याही अधिकृत सही, शिक्का किंवा राष्ट्रीय चिन्हांची डिजिटल छेडछाड करणे हा अजामीनपात्र आणि अत्यंत गंभीर गुन्हा आहे, याचे भान उच्चशिक्षित तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा, क्षणभराच्या खोट्या प्रसिद्धीच्या नादात आयुष्यभराचे करिअर उध्वस्त होण्यास वेळ लागत नाही, हाच या घटनेचा मुख्य धडा आहे.

