संगमनेर व अकोले तालुक्यात कोविड संक्रमणाचा प्रचंड उद्रेक! दोन्ही तालुक्यात मिळून चारशेहून अधिक रुग्ण आले समोर; जिल्ह्यातही आजवरची उच्चांकी रुग्णवाढ..
नायक वृत्तसेवा संगमनेर
सध्या लागू असलेले कठोर निर्बंध आणि त्यातच संगमनेरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दिवसाआड किराणा दुकाने बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय या उपरांतही संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणाची गती आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसल्याचे आजच्या उच्चांकी रुग्णवाढी वरुन दिसत आहे. आजच्या अहवालांमधून अकोले तालुक्यातही कोविड संक्रमणाचा उच्चांक नोंदविला गेला असून आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या समोर आली आहे. आज या दोन्ही तालुक्यातील तब्बल चारशेहून अधिक रुग्ण समोर आल्याने कोविड संक्रमणाचे गांभीर्य शतपटीने वाढले आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 11 हजार 982 वर पोहोचली आहे. तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही आता अठराशेहून अधिक झाल्याने तालुक्यातील आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर येण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याच्या रुग्णवाढीची गती शतपटीने वाढली आहे. दररोज समोर येणारे मोठ्या संख्येतील रुग्ण आणि उपचारांची गरज असलेले सक्रीय संक्रमित यांच्यामुळे तालुक्यातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तुडूंब भरले असून रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या सुविधा असलेल्या खाटा मिळणे अवघड झाले आहे. त्यातच संक्रमणाचा वेग दररोज वाढताच असल्याने तालुक्यातील कोविडची स्थिती अतिशय चिंताजनक अवस्थेत पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाचीही धावपळ वाढली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात आजवरची सर्वाधिक उच्चांकी 3 हजार 592 इतकी प्रचंड रुग्णसंख्या समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 36 हजार 129 वर पोहोचली आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेचे 713, खासगी प्रयोगशाळेचे 967 व रॅपिड चाचणी द्वारा समोर आलेले 1 हजार 992 अशा एकूण 3 हजार 592 जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक 849 रुग्ण एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्रातून समोर आले आहेत. त्याखालोखाल अहमदनगर ग्रामीण भागातून 347, राहता तालुक्यातून 312, संगमनेर तालुक्यातून 217, नेवासा तालुक्यातून 206, राहुरी तालुक्यातून 202, पाथर्डी तालुक्यातून 195, अकोले तालुक्यातून 189, कर्जत तालुक्यातून 159, शेवगाव तालुक्यातून 153, कोपरगाव तालुक्यातून 144, पारनेर तालुक्यातून 124, श्रीगोंदा तालुक्यातून 99, श्रीरामपूर तालुक्यातून 98, भिंगार लष्करी परिसरातून 77, लष्करी रुग्णालयातून 12, इतर जिल्ह्यातील 127 व इतर राज्यातील दोघांचा समावेश आहे.
आज संगमनेर व अकोले या दोन्ही तालुक्यातून उच्चांकी रुग्ण समोर आले आहेत. शासकीय प्रयोगशाळेचे केवळ 11, खाजगी प्रयोगशाळेचे तब्बल 135 आणि रॅपिड एंटीजन चाचणी द्वारा 71 अशा संगमनेर तालुक्यातील एकूण 217 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. तर शासकीय प्रयोगशाळेचे 67, खासगी प्रयोगशाळेचे अवघे 25 व रॅपिड एंटीजेन चाचणी द्वारा 97 जणांसह अकोले तालुक्यातून तब्बल 189 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. आजची रुग्णसंख्या अकोले तालुक्याच्या कोविड इतिहासातील आजवरची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील सक्रीय संक्रमित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आरोग्य यंत्रणांवरील ताण शतपटीने वाढला आहे.
शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोविडची साखळी तोडण्यासाठी कमीत कमी चौदा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घेण्याची अत्यंत गरज असल्याचे वक्तव्य अहमदनगर येथे केले होते. यासाठी सर्वस्वी निर्णय जनतेनेच घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नव्याने आदेश काढून याबाबतची स्थिती स्पष्ट करतील असेही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या आदेशान्वये आजपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर औषधांची दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 या वेळात सुरु ठेवण्यात येणार आहे. भाजीपाला व फळ विक्रेत्यांना एकाच जागी बसून विक्री करण्यास मनाई करण्यात आली असून घरोघरी जाऊन भाजी व फळे विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याशिवाय यापूर्वी सुरू असलेली मिठाईची दुकाने व बेकरी पदार्थांची दुकाने 1 मेपर्यंत बंद ठेवण्याचे नव्याने आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू होऊन चार दिवसांचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील दैनंदिन रुग्ण संख्येच्या वाढीत कोणताही फरक पडलेला दिसून येत नसल्याने जिल्ह्याची कोविड स्थिती चिंताजनक कडून अत्यंत चिंताजनक अवस्थेकडे जात असल्याचे भयानक चित्र निर्माण झाले आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून घराच्या बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य केल्यास व आवश्यक अथवा अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी कोविड बाबतचे सर्व नियम तंतोतंत पाळल्यास सध्या भरात असलेल्या संक्रमणाला थोपविता येणे शक्य आहे. अन्यथा येणाऱ्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
Visits: 20 Today: 1 Total: 116380