‘पोक्सो’तील आरोपीस तीन वर्षांची सक्तमजुरी! राजूरमधील प्रकरण; संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा..

नायक वृत्तसेवा, अकोले
राजूरमधील एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार सन 2016 मध्ये घडला होता. या प्रकरणी दाखल फिर्यादीवरुन राजूर पोलिसांनी सखोल तपास करीत आरोपी जितेंद्र उर्फ जितू शिवराम पवार (वय 29) याच्या विरोधात संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सविस्तर सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निकाल दिला असून आरोपीला तीन वर्षांच्या सक्तमजुरीसह तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जवळपास सहा वर्षे चाललेल्या या खटल्याचे कामकाज सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी पाहिले.

सदरची घटना 4 ऑक्टोबर, 2016 साली सकाळी साडेदहाच्या सुमारास राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दित घडली होती. राजूरमध्ये राहणारी चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी दुधाची पिशवी घेवून घराकडे जात असताना आरोपी जितेंद्र उर्फ जितू शिवराम पवार (वय 29, रा.राजूर) याने तिला रस्त्यातच अडवून आडोशाला नेले व तेथे तिचा विनयभंग केला. या प्रकाराने घाबरलेल्या त्या मुलीने घरी जाताच घडला प्रकार आपल्या वडीलांना सांगितला. त्यावरुन त्या मुलीच्या आई-वडीलांनी आरोपीच्या घरी जात त्याला जाब विचारला असता त्याने उद्धटपणे वर्तणूक करीत ‘तुम्हाला काय करायचे ते करा’ असा दम देत त्यांना हुसकावून दिले.

त्यानंतर संबंधितांनी राजूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार राजूर पोलिसांनी आरोपी जितेंद्र पवार याच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 354 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 11, 12 नुसार गुन्हा नोंद करुन आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास राजूर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दिलीप जगताप यांनी पूर्ण करुन त्याबाबत संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले. सदरच्या खटल्यात सरकारी पक्षाने सादर केलेला घटनास्थळाचा पंचनामा, पीडितेसह एकूण सहा साक्षीदारांचे जवाब व प्रत्यक्षदर्शींनी नोंदविलेली साक्ष महत्त्वाची ठरली.

सरकारी पक्षाने सादर केलेले सबळ पुरावे आणि केलेला जोरदार युक्तीवाद ग्राह्य धरुन संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर.आर.कदम यांनी आरोपी जितेंद्र उर्फ जितू शिवराम पवार याला भा.दं.वि. कलम 354 मध्ये दोषी ठरविताना तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एका महिन्याची साधी कैद. तसेच, बालकांचे लैंगिक अत्याचार करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 11, 12 नुसार दोन वर्षांची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड. दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या निकालाने पीडितेसह तिच्या कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे. या खटल्याचे संपूर्ण कामकाज सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी पाहीले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार सुनील सरोदे, कैलास कुर्हाडे, पो.हे.कॉ.प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वामी नाईकवाडी व पो.ना. दीपाली दवंगे यांनी सहाय्य केले. या खटल्याकडे संपूर्ण अकोले तालुक्याचे लक्ष लागले होते.

