गुन्हा दाखल मात्र ‘मकोका’पासून वाचवण्याचे प्रयत्न? ‘गुटखा एक्सप्रेस’ अपघात प्रकरण; पोलिसच फिर्यादी झाल्याने संशय बळावला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुरुवारी भल्या पहाटे पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या अपघाताचे अंतरंग उलगडायला आता सुरुवात झाली असून अपेक्षेप्रमाणे तालुका पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटू लागली आहे. या अपघातातून मोठ्या प्रमाणात गुटखा हस्तगत झाल्यानंतर खरेतर अन्न व औषध प्रशासनाच्या अन्नसुरक्षा अधिकार्‍यांकडून तक्रार दाखल होणं अपेक्षित होतं, मात्र पोलिसांनी या प्रकरणात अधिक तत्परता दाखवत स्वतःच फिर्यादी होवून तक्रार दाखल केल्याने संशय बळावला आहे. धक्कादायक म्हणजे सुरक्षा कठड्यांना धडकल्यानंतर असंख्य पलट्या खात दरीत कोसळलेल्या या वाहनातील दोघा जखमींमधील एकजण चक्क दवाखान्यातून पसार झाला असून दुसर्‍याला संगमनेरची प्रगत वैद्यकीय सेवा डावलून आळेफाट्याच्या नावाखाली सहीसलामत ‘गायब’ही करण्यात आले आहे. एकंदरीत संगमनेरच्या गुटखा तस्करीचा म्होरक्या म्हणून उघड झालेल्या लव्ह जिहाद फेम युसुफ दादा चौगुलेसह पोलिसांच्या हातावर तुर्‍या ठेवून या प्रकरणातील तिनही आरोपी पसार झाले आहेत. या प्रकरणात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई होण्याची अपेक्षा असताना तालुका पोलिसांनी घाईघाईत गुन्हा दाखल करुन एकप्रकारे त्याची शक्यताच संपवल्याने तालुक्याचा कारभार आणि मनमानी कायदा राबवण्याचा प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.


गुरुवारी (ता.9) पहाटेच्या सुमारास नाशिककडून खचाखच गुटखा भरुन निर्धोकपणे भरधाव वेगात संगमनेरच्या दिशेने येणार्‍या इनोव्हा कारवरील (क्र.एम.एच.01/बी.बी.9149) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती कर्‍हेघाटातील सुरक्षा कठड्यांना फोडून असंख्य पलट्या मारीत जुन्या आणि नव्या महामार्गाच्या मधल्या दरीत जावून कोसळली. या अपघाताने प्रचंड मोठा आवाज झाल्याने आसपासच्या नागरीकांसह काही वाहनचालकांनी अपघातस्थळी धाव घेत दरीत उतरुन कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारा खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत सकाळी सातच्या सुमारास तालुका पोलिसांनाही माहिती देण्यात आली. त्यानुसार तालुक्याचे उपनिरीक्षक महेश शिंदे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.


मात्र तो पर्यंत जखमी रुग्णालयात पोहोचून अपघातग्रस्त वाहनात मोठ्या प्रमाणात गुटखा भरल्याचे व्हिडिओ आणि संदेश बघ्यांनी गावभर पसरवले होते. अपघातग्रस्त वाहन आणि त्यातील गुटख्याच्या कड्या जुळवत असताना सदरचा गुटखा लव्ह जिहाद फेम कुख्यात गुन्हेगार युसुफ दादा चौगुलेचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर लागलीच तपासाची चक्रे फिरुन त्याच्या मुसक्या आवळल्या जाणं अपेक्षित होतं. मात्र शहराप्रमाणे तालुक्यातही अशा प्रकरणांची अर्थपूर्ण विल्हेवाट लावणार्‍या दुय्यम अधिकार्‍यांची साखळी असल्याने तरुणाईला व्यसनाधीन करुन भयानक मृत्यूच्या दिशेने घेवून जाणार्‍या या गंभीर प्रकरणातही हलगर्जीपणा दिसून आला. विशेष म्हणजे पहाटे घडलेल्या या अपघातात कोण जखमी झाले याबाबतची माहितीही माध्यान्नापर्यंत पोलिसांकडे उपलब्ध नव्हती, त्यावरुन आरोपींना पसार होण्यासाठी खूप मोठी मोकळीक करुन दिल्याचेही स्पष्टपणे दिसून आल्याने अधिक संशय बळावला.


या प्रकरणाच्या सुरुवातीच्या माहितीत गुटख्याबाबत अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासनाला कळवण्यात आल्याचे व त्यांच्याकडूनच तक्रार दाखल होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र संध्याकाळपर्यंत विभागाचा कोणताही अधिकारी संगमनेरात पोहोचलाच नाही. त्यामुळे तालुक्याला कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब क्षीरसाठ यांना फिर्यादी करुन पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेतील कलम 123 या एकमेव गंभीर तरतुदीचा वापर करुन 274, 275, 223, 3 (5) प्रमाणे आरोपी सिकंदर रफिक शेख, अरमान निजाम शेख (दोघेही रा.जांबुत) व युसुफ दादा चौगुले (रा.घारगाव) यांच्यावर गुन्हा नोंदवून पद्धतशीरपणे या प्रकरणाचे गांभीर्यच संपवून टाकले.


अपघातग्रस्त वाहनात 32 मोठ्या आणि 43 छोट्या अशा एकूण 75 बॅगमधून आठ लाख 40 हजारांहून अधिक किंमतीचा गुटखा आणि सुगंधीत तंबाखू हस्तगत झाली होती. अन्न व औषध प्रशासनाच्या राज्यायुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांसह गुटख्याचे नेटवर्क उध्वस्त करण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी त्यांनी गुटखा साठवणूक, वाहतूक व विक्री करताना आढळणार्‍या आरोपींचा गेल्या दहा वर्षातील पूर्वेतिहास पडताळून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी निर्मूलन अधिनियमातंर्गत (मकोका) कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. त्याची प्रतही गेल्याच आठवड्यात पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांना सुपूर्द करण्यात आली होती. या प्रकरणातील सूत्रधार युसुफ दादा चौगुलेची पार्श्‍वभूमीच गुटखा तस्करीची आहे. त्यावरुन त्याच्यावर तालुका पोलिसांसह घारगाव पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल आहेत.


मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत तालुका पोलिसांनी संपूर्ण दिवस ‘अन्नसुरक्षा अधिकार्‍यां’च्या नावावर खपवल्यानंतर सायंकाळी उशिराने स्वतःच तक्रारदार होवून विषजनक पदार्थांच्या व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने भारतीय न्यायसंहितेत प्रविष्ट असलेल्या 123 या एकमेव गंभीर कलमाचा वापर करुन कारवाईचे सोपस्कार आटोपले. या प्रकरणातील सूत्रधाराची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, यापूर्वीही त्याच्यावर गुटखा तस्करीसह दाखल असलेले अन्य गंभीर गुन्हे, प्रत्येक गुन्ह्यातील जामीनानंतर अल्पावधीतच त्याच्याकडून होणार्‍या गंभीर गुन्हेगारी कारवाया या सर्वांचा सारासार विचार करुन या प्रकरणात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल होण्याची आणि तालुक्यातील गुटखा तस्करीचे संपूर्ण नेटवर्क उध्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र तालुका पोलिसांनी त्यावर पाणी फिरवले आहे. जिल्ह्याच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून तालुक्याच्या कारभारात लक्ष घालण्याची गरज आहे, अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.


गुरुवारी (ता.9) पुणे-नाशिक महामार्गावरील कर्‍हेघाटात झालेल्या अपघाताने संगमनेर तालुक्यातून सुरु असलेल्या मोठ्या प्रमाणातील गुटखा तस्करीचे बिंग फोडले आहे. या प्रकरणात वारंवार गुन्हेगारी कारवायांमध्ये सापडणार्‍या आणि बेरोजगार तरुणांनाही गुन्हेगारीच्या वाटेला लावणार्‍या, त्यातून मिळणार्‍या पैशांचा जातीय द्वेष वाढवण्यासाठी आणि धर्मांधता पसरवण्यासाठी वापर करणार्‍या, लव्ह जिहादासारख्या संगमनेरचे सामाजिक स्वास्थ बिघडवणार्‍या प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या घारगावच्या कुख्यात युसुफ दादा चौगुले याचे नाव समोर आल्यानंतर तालुका पोलिसांनी त्याचा पूर्वेतिहास पाहता सुरुवातीलाच ‘महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी निर्मूलन अधिननियमा’नुसार (मकोका) गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा मूळापासून तपास करण्याची गरज होती. मात्र दैनिक नायकने त्याबाबत गुरुवारच्या आपल्या अंकात व्यक्त केलेल्या गुजरात ते संगमनेर निर्धोक धावणार्‍या ‘गुटखा एक्सप्रेस’ला तालुक्याच्याही पाठबळाची शंका खरी ठरु लागली आहे. श्रेयवादासाठी भांडणार्‍या तालुक्याच्या दोन्ही नेतृत्वांसह वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देवून दुय्यम अधिकार्‍यांच्या मदतीने सरकारच्या धोरणांनाच फाट्यावर मारण्याचे शहर आणि तालुक्यात फोफावणारे हे प्रकार थोपवण्याची गरज आहे, अन्यथा संगमनेरातील अवैध व्यवसायातून शहराची सामाजिक शांतता पुन्हा एकदा बाधित होण्याचा गंभीर धोका आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 1894271

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *